सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृतीतून देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती स्मिता नवलकर (वय ७१ वर्षे) यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते आणि १४.१.१९९९ या दिवशी त्यांचा मला पहिला सत्संग मिळाला. तेव्हा त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे त्यांनीच माझ्याकडून लिहून घ्यावीत, अशी त्यांच्या सुकोमल चरणी प्रार्थना करते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सनातनशी संपर्क आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पहिला सत्संग

श्रीमती स्मिता नवलकर

१ अ. सनातनशी संपर्क : वर्ष १९९७ मध्ये मी वरळी (मुंबई) येथील एका मंदिरात लागलेल्या ग्रंथप्रदर्शनातून सनातनचे काही ग्रंथ विकत घेतले होते; परंतु मला ते समजत नसल्याने ते तसेच ठेवले होते.

वर्ष १९९८ मध्ये आमच्या इमारतीत रहाणार्‍या श्रीमती रेबा विश्‍वास यांच्याकडून मला सनातन संस्थेविषयी कळले. त्या नेहमी मला आग्रह करायच्या, माटुंगा येथे प्रत्येक शनिवारी सनातनच्या वतीने होणार्‍या इंग्रजी सत्संगाला चल; पण मला आमच्या व्यवसायातील आणि मित्र परिवारातील अन्य पंथांच्या सत्संगांविषयी ठाऊक होते. तिथे केवळ भजन आणि कीर्तन असायचे, तसेच थोडेफार तात्त्विक विषय चालायचे. त्या सत्संगाला जाणार्‍या लोकांचे सत्संगाच्या ठिकाणी वेगळे आणि घरच्यांशी अन् बाहेरच्यांशी वागणे विसंगत असायचे. त्यामुळे माझ्या मनात सत्संगाविषयी विकल्प निर्माण झाला होता.

माझ्या मनात सत्संगाविषयी विकल्प असल्याने मी प्रथम श्रीमती रेबाताईंकडून सनातनच्या कार्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मी त्या वेळी प्रकाशित होणार्‍या साप्ताहिक सनातन प्रभातची वार्षिक वर्गणीदार झाले.

मी रेबाताईंना म्हणाले, आधी मला तुमच्या गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) भेटायचे आहे. त्यांना भेटल्यानंतर मी सत्संगाला यायचे कि नाही ?, हे ठरवीन.

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रथम भेट !

१ आ १. भेटीला जातांना हार, नारळ, पेढे न नेता घरी बनवलेले तिळाचे लाडू नेणे : १४.१.१९९९ या दिवशी रेबाताई मला मुंबई येथील सनातनच्या सेवाकेंद्रात घेऊन गेल्या. तिथे जाण्यापूर्वी मी त्यांना म्हणाले, आपण हार, नारळ आणि पेढे घेऊया का ? तेव्हा त्या मला म्हणाल्या, तसले काही नको. तू तिळाचे लाडू बनवले आहेस ना ! तेच घेऊन चल.

१ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःला नमस्कार करवून न घेणे, त्या वेळी ते अध्यात्मातील अधिकारी असल्याचे जाणवणे आणि सत्संगाला जाण्याचे ठरवणे : तिथे गेल्यावर आधी भेटायला आलेले साधक बाहेर येईपर्यंत मी बाहेरच्या खोलीत बसले होते. त्या वेळी मला तेथील वातावरण शांत आणि चांगले वाटले. त्यानंतर आतील साधक बाहेर आल्यावर रेबाताईंनी मला आत नेले. आत गेल्यावर मी गुरुदेवांना पाहिले. मी त्यांना नमस्कार करायला वाकणार, इतक्यात ते मोठ्याने म्हणाले, नमस्कार काय करता ? ईश्‍वरप्राप्ती करायची आहे ना ? मोक्ष पाहिजे ना ? मग सूक्ष्मात जायला शिका. तेव्हा गुरुदेवांकडून भावनाशील न रहाता तत्त्वनिष्ठ रहायला हवे, हे मला शिकायला मिळाले. त्यांचे बोलणे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी ते अध्यात्मातील अधिकारी असल्याचे माझ्या लक्षात आले आणि मी सत्संगाला जायचे ठरवले.

१ आ ३. गुरुदेवांनी तुम्ही सत्संगाला जा, नाम घ्या आणि काही अडले, तर मला विचारा, असे सांगितल्यावर त्यांनी मनातील विचार ओळखल्याचे जाणवून आनंद होणे : त्यानंतर मी रेबाताईंची वाट पहात आतील खोलीत जाऊन बसले. थोड्या वेळाने गुरुदेव आत येऊन मला भेटले आणि कपडे वाळत घालत घालत मला म्हणाले, तुम्ही सत्संगाला जा. नाम घ्या. काही अडले, तर मला विचारा. त्या वेळी त्यांच्यातील प्रीती मला अनुभवायला मिळाली, तसेच काठीने कपडे कसे वाळत घालायचे ?, हे मला शिकायला मिळाले. गुरुदेवांनी माझ्या मनातील त्यांना पाहिल्याविना सत्संगाला येणार नाही, हे विचार ओळखल्याने मला पुष्कळ आनंद झाला. त्या दिवशी गुरुवार आणि संक्रांतीचा दिवस होता. गुरुदेवांच्या भेटीच्या वेळी तीळ गुळाला चिकटला आणि गुरुचरणी अर्पण झाला, असे मला जाणवले.

२. परात्पर गुरु डॉक्टरांनी केवळ स्वतःसाठी नव्हे, तर सेवाकेंद्रातील सर्व साधकांसाठी खीर आणायला सांगणे

वर्ष १९९९ च्या गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी मी आणि रेबाताई सेवाकेंद्रात गेलो असता मी गुरुदेवांना विचारले, मी खीर करून आणू का ? त्या वेळी ते मला म्हणाले, मी एकटा नाही. इतरही साधक असणार. सर्वांसाठी आणावी लागेल. त्यावर मी हो म्हटले. त्याप्रमाणे मी खीर करून नेल्यावर ते म्हणाले, छान ! तुम्ही सर्वांसाठी खीर आणली. त्यांना मी आणलेली खीर पुष्कळ आवडली. त्या वेळी त्यांच्यातील व्यापकता आणि साधकांवरील प्रेम दिसून आले.

३. साधिकेने स्मरणिकेसाठी विज्ञापने आणण्याची सेवा वेळेवर चालू केल्याने प्रथमच गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्मरणिका प्रकाशित होणे आणि त्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेचे कौतुक करणे

वर्ष १९९९ मध्ये गुरुपौर्णिमेच्या वेळी माझी विज्ञापने आणण्याची सेवा चालू झाली. त्या वेळी सनातनच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त स्मरणिका प्रकाशित होत असे; परंतु ती स्मरणिका गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रकाशित न होता नंतर प्रकाशित होत असे. वर्ष १९९९ मध्येही स्मरणिका प्रकाशित व्हायला विलंब झाला होता; म्हणून आम्ही वर्ष २००० च्या स्मरणिकेच्या विज्ञापनांची सेवा वेळेवर चालू केली. त्यामुळे वर्ष २००० मध्ये गुरुपौणिमेच्या दिवशी स्मरणिकेचे प्रकाशन झाले. त्या वेळी माझे कौतुक करत गुरुदेव म्हणाले, इतक्या वर्षांत प्रथमच गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्मरणिका प्रकाशित होत आहे. हे तुमच्यामुळे झाले. हे सर्व त्यांनीच माझ्याकडून करून घेतले, याबद्दल मला कृतज्ञता वाटली. त्या वेळी साधकांनी चांगली कृती केल्यावर त्यांचे कौतुक करणे, हे गुरुदेवांकडून मला शिकायला मिळाले.

४. साधकांना सांगितलेल्या प्रत्येक कृतीचे स्वतः आचरण करणारे परात्पर गुरु डॉक्टर !

एकदा गुरुदेव गोव्याहून देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्या वेळी साधक श्री दुर्गादेवीचा वैखरीतून जप करत होते. मी गुरुदेवांना भेटायला गेले. त्या वेळी ते स्वतःचे कपडे स्वतः श्री दुर्गादैव्यै नमः ।, हा जप वैखरीतून करत धुवत होते. त्या वेळी ते जे साधकांना सांगायचे, ते स्वतःही करायचे, हे माझ्या लक्षात आले. त्यांनी साधकांना व्यायाम करायला सांगितले होते. ते स्वतः व्यायाम करायचे. मीसुद्धा त्या दिवसापासून आजपर्यंत नियमित व्यायाम करत आहे.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील प्रीती !

५ अ. साधिकेने परात्पर गुरु डॉक्टरांना आईस्क्रीम बनवून दिल्यावर त्यांनी तिला सर्व साधकांसाठी आईस्क्रीम बनवण्यास सांगणे : गुरुदेवांना सीताफळे आवडतात; म्हणून मी रामनाथी आश्रमात एकदा सीताफळे घेऊन गेले. सीताफळाचा गर काढून मी त्यांना मिल्कशेक बनवून दिला. त्या वेळी त्यांनी तुम्हाला आईस्क्रीम बनवता येते का ?, असे मला विचारल्यावर मी त्यांना आईस्क्रीम बनवून दिले. ते त्यांना पुष्कळ आवडले. दुसर्‍या दिवशी मी सेवेसाठी बाहेर गेले होते. संध्याकाळी आल्यावर त्यांनी मला आईस्क्रीम आवडल्याचे सांगितले. त्या वेळी ते मला म्हणाले, आता सर्व साधकांसाठीही आईस्क्रीम बनवा. तेव्हा त्यांच्यातील सर्वांचा विचार करणे आणि साधकांवरील प्रीती मला अनुभवायला मिळाली.

५ आ. साधिकेला सेवेसाठी दूर अंतरावर दुचाकीवरून पाठवल्याची चूक उत्तरदायी साधकाला सांगणे आणि साधिकेची क्षमा मागणे : एकदा रामनाथी येथे असतांना विज्ञापने गोळा करण्यासाठी जातांना मी श्री. सुरजित माथूर यांच्या समवेत दुचाकीने पणजीला निघाले होते. मी दुचाकीवरून जात असतांना गुरुदेवांनी मला पाहिले. तेव्हा त्यांनी आश्रमाच्या उत्तरदायी साधकाला बोलावून त्याची साधिकेला दुचाकीवरून दूर अंतरावर सेवेसाठी पाठवले, ही चूक दाखवून दिली. नंतर त्यांनी माझी क्षमा मागितली आणि मला म्हणाले, साधकांच्या लक्षात आले नाही. त्यांनी तुम्हाला एवढ्या दूर दुचाकीवरून पाठवले. तेव्हा मला पुष्कळ ओशाळल्यासारखे झाले.

५ इ. साधक उकाड्यात सेवा करत असल्याने गुरुदेवांनी स्वतःच्या खोलीत वातानुकूलन यंत्र लावण्यास नकार देणे : एकदा एका आस्थापनाने रामनाथी आश्रमासाठी ५ वातानुकूलन यंत्रे अर्पण दिली होती. तेव्हा गुरुदेव मला म्हणाले, यांतील एक यंत्र तुमच्या खोलीत लावूया. माझे साधक उकाड्यात सेवा करणार आणि मी ए.सी.त बसणार ? त्या वेळी मी त्यांना पुष्कळ विनवण्या केल्या, तुम्हाला नको; पण तुम्हाला भेटायला येणार्‍या पाहुण्यांसाठी तरी वातानुकूलन यंत्र लावूया. तेव्हा त्यांनी ते मान्य केले आणि त्यांच्या खोलीत वातानुकूलन यंत्र लावून घेतले.

६. अर्पणात आलेले कपडे स्वतः वापरणे

आम्ही फोंडा (गोवा) येथील सेवाकेंद्रात सेवा करत बसलो असतांना बाजूच्या खोलीत अर्पणात आलेले कपडे ठेवले होते. काही वेळाने गुरुदेव त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांतून स्वतःच्या मापाची एक विजार शोधली आणि ते ती घेऊन गेले. त्या वेळी मला पुष्कळ आश्‍चर्य वाटले; कारण मी कधीच माझी आई किंवा बहीण यांचे कपडे वापरत नसे, तसेच जर कुणी माझी साडी नेसली, तर मी ती परत नेसत नसे. गुरुदेवांची कृती पाहिल्यावर त्या दिवसापासून मी आईची किंवा बहिणीची साडी नेसू लागले.

(क्रमश : पुढील रविवारी)

– श्रीमती स्मिता सुबोध नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.१.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक