नगर – येथील तक्रारदार शेतकरी यांनी शासनाच्या गाय गोठा योजनेअंतर्गत अनुदानासाठी पंचायत समिती कर्जत (जिल्हा नगर) येथे प्रकरण सादर केले होते; मात्र हे प्रकरण संमत करून देण्यासाठी चांदे खुर्द येथील ग्रामसेवक ओंकार आवटे यांनी तक्रारदाराकडे ७ सहस्र रुपयांची मागणी केली. यातील प्रथम ५ सहस्र रुपये द्यावेत आणि काम झाल्यानंतर उर्वरित २ सहस्र रुपये देण्याचे सांगितले. या संदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाल्यावर त्यांनी सापळा रचून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना आरोपीला पकडले. मिरजगाव येथील पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. नागरिकांनी कोणताही शासकीय अधिकारी-कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कुणीही खासगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन नगर येथील भ्रष्टाचारविरोधी पथकाने केले आहे.
संपादकीय भूमिकालाचखोरी संपुष्टात येण्यासाठी संबंधितांना तात्काळ कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे ! |