आताचा भारत प्रत्युत्तर देणारा देश आहे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

कंपाला (युगांडा) – ज्या शक्ती दशकांपासून भारताच्या विरोधात आतंकवादी कारवाया करत होत्या, त्यांना आता ठाऊक झाले आहे की, आताचा भारत वेगळा आहे, जो प्रत्युत्तर देणारा आहे, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे भारतीय वंशांच्या नागरिकांच्या कार्यक्रमात केले. या वेळी त्यांनी पाकच्या विरोधात केलेले लक्ष्यित (सर्जिकल) आणि हवाई (एअर) आक्रमण (स्ट्राईक) यांचाही उल्लेख केला.

डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, आजच्या भारताची धोरणे भारताबाहेरच्या लोकांच्या दबावाखालची नसतात. हा स्वतंत्र भारत आहे. भारत आता ‘तुम्ही कुणाकडून तेल विकत घ्या ? आणि कुणाकडून घेऊ नका ?’, हे त्याला सांगणार्‍या देशांच्या दबावाखाली रहात नाही. भारत नागरिकांचे हित लक्षात घेऊन अमेरिका आणि रशिया यांच्याशी तेलाच्या सूत्रावरून समतोलपणे वागत आहे. यातून भारत दोन्ही देशांकडून लाभ मिळवत आहे.