‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे निवासस्थान असलेल्या मुंबई येथील सेवाकेंद्रात मी सेवेसाठी जात असे. तेव्हा अनुमाने १२ वर्षे (वर्ष १९९० ते २००१) मला सद्गुरु सत्यवान कदम यांचा सत्संग मिळाला. त्या कालावधीत परात्पर गुरु डॉक्टर माझ्यासारख्या अध्यात्मातील अज्ञानी साधकांना घडवत होते. ते आम्हाला अध्यात्म आणि साधना शिकवून सत्सेवा करून घेत होते. आम्हाला शिकवण्यासाठी ते सद्गुरु सत्यवानदादांचा आदर्श पुढे ठेवत होते. त्या वेळच्या काही प्रसंगांतून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि सद्गुरु सत्यवानदादांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. अंतर्मुखता
मुंबई येथील सेवाकेंद्रात आम्ही अनुमाने २० साधक सेवा करत होतो. साधक एकमेकांशी अनावश्यक बोलायचे किंवा एकमेकांचे गुणदोष पहायचे; परंतु सद्गुरु सत्यवानदादा नेहमी परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या सेवा करण्यात मग्न असायचे. ‘इतरांचे गुण-दोष पहाण्यात वेळ न घालवता ते सर्वांकडे साक्षीभावाने पहात होते’, असे मला वाटते. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी सद्गुरु सत्यवानदादा आणि एक पुष्कळ सेवा करणारा साधक यांना साधकांसमोर उभे करून ‘‘दोघांकडे पाहून काय वाटते ?’’ असे विचारले. तेव्हा सर्वांना सद्गुरु सत्यवानदादा यांच्याकडे पाहून चांगले वाटले, तर दुसर्या साधकाकडे पाहून त्रास जाणवला. यावरून सद्गुरु सत्यवानदादा यांची अंतमुर्खता आणि त्यांच्याकडून येणारी सात्त्विक स्पंदने यांची सर्वांना जाणीव झाली.
२. सेवाभाव
अनुमाने वर्ष १९९४ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांचा मुंबई येथील रूपारेल कॉलेजच्या सभागृहात अभ्यासवर्ग होत असे. एकदा जुने साधक आणि नवीन जिज्ञासू मिळून अनुमाने १५० जण अभ्यासवर्गात होते. तेव्हा माझी चूक सांगण्यासाठी मला उभे केले आणि परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘वटकरांचे कार्यालय व्ही.टी.च्या (छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकाच्या) जवळ आहे; म्हणून त्यांना एक पार्सल सेवाकेंद्रातून घेऊन जाण्यास सांगितले होते; पण ते आले नाहीत. त्यामुळे सत्यवानला त्यासाठी पाठवावे लागले.’’ त्या वेळी मी ‘शिपिंग कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया’ या आस्थापनात एका मोठ्या पदावर नोकरी करत होतो. त्यामुळे माझ्या अहंला ठेच पोचली आणि मला वाईट वाटले. सद्गुरु दादांनी मात्र याविषयी माझ्याकडे कसलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण केली. यातून मला माझी चूक लक्षात आली. तेव्हा ‘सद्गुरु सत्यवानदादांनी आम्हा सर्व साधकांपुढे सेवाभाव कसा असावा ? याचा आदर्श निर्माण केला होता’, असे मला वाटते.
३. गुर्वाज्ञापालन
सनातनच्या वतीने वडाळा, मुंबई येथील बाँबे पोर्ट ट्रस्टच्या वसाहतीत इंग्रजीमधून साप्ताहिक सत्संग घेतला जायचा. काही कारणांमुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ‘‘पुढील आठवड्यापासून तेथील दायित्व असलेल्या साधिकेने सत्संग घेऊ नये. तो सत्संग वटकर आणि सत्यवान हे दोघे घेतील. वटकर अभ्यास म्हणून इंग्रजीतून सत्संग घेतील आणि तेथील साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी सत्यवान त्यांच्या समवेत जाईल.’’ ‘सद्गुरु सत्यवानदादांचे शिक्षण १० वीपर्यंत झाले होते. त्यांना सत्संग घेण्याएवढे इंग्रजी येत नव्हते, तरीही त्यांना माझ्या समवेत इंग्रजी सत्संग घेण्यास का सांगितले ?’, याचे सर्वांना आश्चर्य वाटले. गुर्वाज्ञापालन म्हणून मी आणि सद्गुरु सत्यवानदादांनी तो सत्संग घेतला. ‘सद्गुरु सत्यवानदादांनी मनात कसलाही विकल्प न आणता गुर्वाज्ञापालन केले’, हे मला शिकायला मिळाले.
४. शिकण्याची वृत्ती
आरंभीच्या काळी परात्पर गुरु डॉक्टर, मी आणि एक साधक यांनाच चारचाकी चालवायला येत होती. अनुमाने वर्ष १९९३ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी इतर साधकांना चारचाकी शिकून घेण्यास सांगितले होते. त्यावर लगेच सद्गुरु सत्यवानदादा आणि श्री. दिनेश शिंदे यांनी चारचाकी चालवण्यास शिकून घेतले. त्यानंतर सद्गुरु दादांनी संगणक, अध्यात्मप्रसार सेवा, सत्संगात मार्गदर्शन करणे, नामजपादी उपाय करणे इत्यादी सेवा शिकून त्यांत प्राविण्य मिळवले.
५. त्यागी वृत्ती
परात्पर गुरु डॉ. आठवले आमचा अभ्यासवर्ग दादर, मुंबई येथील बालमोहन शाळेतील एका वर्गात घेत असत. एकदा ते ‘सद्गुरु सत्यवानदादा कसे तन, मन आणि धन यांचा त्याग करून साधना करत आहेत ? वेळ देऊन तळमळीने सेवा करत आहेत’, याविषयी सांगून त्यांचे कौतुक करत होते. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणालो, ‘‘सत्यवानदादांचे लग्न झालेले नाही. त्यांना संसार, नोकरी असे काही दायित्व नाही. त्यामुळे त्यांना सेवा आणि साधना करणे शक्य आहे; पण मला शक्य नाही.’’ त्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘तुम्ही लग्न केले, संसार केला आणि सर्व उपभोग घेतला आहे. तरीही तुम्हाला साधनेसाठी संसार आणि व्यवहार सोडवत नाही. सत्यवानने तसे काही केलेले नसतांना लहान वयातच साधनेसाठी संसाराचा त्याग केला आहे; म्हणून त्याचा त्याग, साधना आणि सेवा कौतुकास्पद आहे.’’ यावरून मला सद्गुरु दादांची त्यागी वृत्ती आणि समर्पणभाव शिकायला मिळाला.
६. व्यष्टी प्रकृतीतून समष्टी प्रकृती होण्यासाठी प्रयत्न करणे
सद्गुरु सत्यवानदादा हे अबोल वृत्तीचे आणि व्यष्टी प्रकृतीचे होते. त्यांच्यात भिडस्तपणा होता आणि लढाऊ वृत्ती अल्प होती. ते नेहमी स्वतःची साधना आणि सेवा यांमध्ये व्यस्त असायचे. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना सेवाकेंद्रातील साधक आणि तेथे येणार्या नवीन व्यक्ती यांच्याशी बोलायला सांगितले. त्यानुसार सद्गुरु दादांनी प्रयत्न केले. सेवाकेंद्रात सद्गुरु दादांचे नातेवाईक असलेले एक साधक पुष्कळ चुका करायचे. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर सद्गुरु दादांना म्हणाले, ‘‘त्या साधकाला त्याच्या चुका सांग.’’ गुर्वाज्ञापालन म्हणून सद्गुरु दादांनी तसे केले. त्यानंतर त्यांना अध्यात्मप्रसार करण्याची सेवा देण्यात आली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने सद्गुरु दादांनी प्रयत्न करून समष्टी प्रकृती घडवण्यासाठी आणि स्वतःमध्ये व्यापकता आणण्यासाठी प्रयत्न केले.
७. अहंशून्यता आणि संतांप्रती भाव असणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सद्गुरु सत्यवानदादांना प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज, प.पू. काणे महाराज, प.पू. विजय जोशीबाबा इत्यादी संतांचा सत्संग लाभला. त्यांनी संतांची मनोभावे सेवा करून संतांची मने जिंकली. एकदा प.पू. भक्तराज महाराज यांच्या समवेत मी होतो. तेव्हा ते त्यांच्या मुंबई येथील भक्तांना म्हणाले, ‘‘डॉक्टरांची मुले लाख मोलाची आहेत.’’ यावरून ‘सद्गुरु सत्यवानदादांनी त्यांच्यातील अहंशून्यता आणि सेवाभावी वृत्ती यांच्यामुळे संतांची मने जिंकली होती’, असे मला वाटते.
सद्गुरु सत्यवानदादांच्या आदर्श वागण्यातून मला शिकायला मिळून साधनेसाठी आतापर्यंत प्रेरणा मिळत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातन संस्थेच्या आरंभीच्या कालावधीत आम्हा साधकांना घडवले आणि त्यासाठी सद्गुरु सत्यवानदादा या संतरत्नाचा आदर्श आमच्या पुढे ठेवला. त्याबद्दल साक्षात् विष्णुस्वरूप मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या चरणी मी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.३.२०२३)