सांगली – साक्षीदार फितूर असतांनाही अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणार्या सद्दाम शहा याला २५ वर्षे सक्तमजुरी आणि १५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. ही शिक्षा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.एस्. हातरोटे यांनी सुनावली. या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील माधव बी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
१. पीडित मुलगी ही आरोपीची अज्ञान मेहुणी आहे. दोघे एका इमारतीमध्ये रहातात. वर्ष २०२० मध्ये आरोपी पीडितेच्या नात्याच्या कारणाने पीडितेच्या घरी सतत जात होता. त्याने पीडिता सभागृहात एकटीच बसली असता तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तसेच दीड मासानंतर परत याच घटनेची पुनरावृत्ती केली.
२. पीडितेस डिसेंबर २०२१ मध्ये दिवस गेल्यावर पीडितेने ही गोष्ट तिच्या आईस सांगितली. यानंतर पीडितेची ‘सोनोग्राफी’ करण्यात आल्यावर तेथील आधुनिक वैद्यांनी पीडिता गरोदर असल्याचे सांगितले. यानंतर आरोपी सद्दाम हुसेन शहा याच्या विरोधात ९ डिसेंबर २०२१ ला गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतरच्या कालावधीत पीडिता बाळंत झाली. सदरच्या अर्भकाचे डी.एन्.ए. नमुना आणि आरोपी सद्दाम याचा डी.एन्.ए. नमुना पडताळला असता आरोपी हाच अर्भकाचा जैविक पिता असल्याचे सिद्ध झाले.
३. नंतर प्रत्यक्ष खटल्याच्या प्रसंगी पीडिता, तिची आई, तसेच साक्षीदार फितूर झाले; मात्र अन्य मार्गी आलेल्या पुराव्यावरून न्यायालयाने आरोपीस दोषी धरून शिक्षा सुनावली.
४. या प्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळा यांच्याकडील तज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
संपादकीय भूमिकामुली आणि स्त्रिया यांच्यावर अत्याचार करणार्या सर्वांनाच कडक शासन तत्परतेने झाले, तर ते थांबतील ! |