मुली अत्यंत घाणेरडे कपडे घालून बाहेर पडत असल्याने त्या शूर्पणखा वाटतात ! – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय

. . . या मुलींमध्ये देवीचे रूप दिसत नाही. त्यांच्यात शूर्पणखा दिसते – कैलाश विजयवर्गीय

इंदूर (मध्यप्रदेश) – मी आजही बाहेर जातो, तेव्हा सुशिक्षित तरुण आणि तरुणी नाचतांना पाहून मला मला त्यांच्या थोबाडीत माराव्याशा वाटतात. असे केले, तर त्यांची नशा उतरेल. मुली अत्यंत घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतात. आपण महिलांना देवी म्हणतो; पण या मुलींमध्ये देवीचे रूप दिसत नाही. त्यांच्यात शूर्पणखा दिसते. खरेच देवाने त्यांना किती सुंदर शरीर दिले आहे. थोडे चांगले कपडे घाला. मुलांमध्ये संस्कार रुजवा. मला फार काळजी वाटते, असे विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केले. ते येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

(सौजन्य : ABP NEWS)

१. विजयवर्गीय यांच्या विधानावर टीका करतांना काँग्रेसचे मीडिया प्रमुख पियुष बबेले यांनी ‘आता मुली काय परिधान करणार, हेही भाजप ठरवणार’, असे म्हटले आहे.

२. स्वतःवर टीका होऊ लागल्यानंतर विजयवर्गीय यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. रस्त्यात घट्ट कपडे घातलेली एक तरुणी मद्यधुंद स्थितीत तमाशा करत होती. तिला शूर्पणखा नाही, तर काय म्हणावे ? मुलींना त्यांच्या पसंतीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे; पण मी जे काही पाहिले, ते इंदूर शहराच्या संस्कृतीला साजेसे नाही. या गोष्टींमुळे संपूर्ण शहर काळजीत पडले आहे.