|
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात ७० हून अधिक ठिकाणी गदापूजन करण्यात आले. निपाणी (जिल्हा कर्नाटक) येथील प्रशिक्षणवर्गात येणार्या युवतींनी २० हून अधिक मातीच्या गदा सिद्ध केल्या आणि त्याचे पूजन विविध ठिकाणी केले. उंचगाव येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने बजरंग आखाडा येथे उद्धव ठाकरे गट तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या हस्ते गदापूजन झाले. या प्रसंगी बजरंग आखाड्याचे वस्तादश्री जयवंत पाटील, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अजित पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य उपस्थित होते.
समर्थ रामदासस्वामी स्थापित ११ मारुति मंदिरांपैकी एक असलेले मनपाडळे (जिल्हा कोल्हापूर) येथील मारुति मंदिरात सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते गदापूजन पार पडले.
पुणे – येथे ५० हून अधिक ठिकाणी गदापूजन करण्यात आले, तर काही ठिकाणी मारुति मंदिरांत हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले. या कार्यक्रमांना विविध संघटनांचे पदाधिकारी, मंदिरांचे विश्वस्त, धर्मप्रेमी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता. या उपक्रमामध्ये हिंदु जनजागृती समिती, धर्मप्रेमी, हितचिंतक आणि भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
विशेष
१. पुणे येथील (कै.) प.पू. वसंत विष्णू पोंक्षे यांनी मागील ४० वर्षे पूजन केलेल्या गदेचे धर्मप्रेमींनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने पूजन केले. पुष्कळ भाविकांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली.
२. यमुनानगर, प्राधिकरण, निगडी येथे नगरसेवक श्री. एकनाथ पवार यांच्या हस्ते गदापूजन करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक श्री. सचिन चिखले, श्री. उत्तम केंदळे, देहू संस्थानचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम महाराज मोरे, दुर्गा वाहिनीच्या सौ. शिल्पा नगरकर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. नंदकुमार कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
सांगली – सांगली जिल्ह्यात २७ हून अधिक ठिकाणी गदापूजन करण्यात आले. मिरज येथे संत वेणास्वामी मठ येथे गदापूजन, मारुतिस्तोत्र पठण, सामूहिक नामस्मरण घेण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. माधवराव गाडगीळ, मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांसह अन्य उपस्थित होते.
सातारा – येथे एकूण ३१ ठिकाणी गदापूजन केले. सज्जनगड येथेही गदापूजन करण्यात आले. समर्थ रामदासस्वामी यांनी स्थापन केलेल्या ११ मारुति मंदिरांमध्येही गदापूजन करण्यात आले.
सोलापूर, लातूर, बीड येथे ९० हून अधिक ठिकाणी गदापूजन !
सोलापूर – सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये एकूण ९० हून अधिक ठिकाणी धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी गदापूजन केले. सोलापूर येथील श्री सिद्धगणेश हनुमान मंदिर येथे सनातन संस्थेच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या हस्ते गदापूजन करण्यात आले. सोलापूर येथील धर्मप्रेमी मूर्तीकार श्री. राजू बुंडला, श्री. व्यंकटेश कुरापाटी आणि श्री. नितीन बैरी यांनी त्यांचे काम बाजूला ठेऊन गदापूजनासाठी गदा विनामूल्य सिद्ध करून दिल्या.
बेळगाव जिल्ह्यात १९ ठिकाणी गदापूजन !
बेळगाव – बेळगाव जिल्ह्यात १९ ठिकाणी गदापूजन करण्यात आले.