पाकच्या गावांमध्ये विनामूल्य शिधा वाटपात होत आहे जनतेची फसवणूक ! – गावकर्‍यांचा आरोप

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या मनसेहरा गावातील लोकांनी विनामूल्य शिधा वाटपावरून प्रशासनावर फसवणुकीचा आरोप केला आहे. गावकर्‍यांचे म्हणणे आहे की, सरकार गरजवंतांना विनामूल्य शिधा वाटते; मात्र काही जण चुकीच्या पद्धतीने याचे वाटप करत आहे.

१. जुल्लो गावाच्या परिषदेचे मौलाना (इस्लामचा अभ्यासक) वकार अहमद यांनी सांगितले की, काही लोक प्रशासनाच्या साहाय्याने काम करत आहेत; त्यामुळे गावातील ४०० कुटुंबांना शिधा मिळालेला नाही. गावातील लोक जेव्हा शिधा घेण्यासाठी गेले, तेव्हा वितरकांनी सांगितले, ‘तुम्ही तुमच्या वाट्याचा शिधा आधीच नेला आहे.’ यामुळे जुल्लो, बोहराज, बसुंद आणि शेजारच्या काही गावांमध्ये शिधा मिळालेला नाही.

२. कराचीमध्ये १ एप्रिल या दिवशी विनामूल्य शिधा घेण्याच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता.

संपादकीय भूमिका

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकमध्ये लोकांची अशीच फसवणूक होत राहिली, तर ते उद्रेक केल्याविना रहाणार नाहीत !