गांधी-नेहरूंची काँग्रेस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचा पहिल्यापासून द्वेष करणार्‍या काँग्रेसचे खरे स्वरूप जाणा !

‘विनायक दामोदर सावरकर या नावात भिण्यासारखे काय आहे ?’, ते कुणास ठाऊक; पण काँग्रेसवाले या नावापासून सतत दूर रहायचा प्रयत्न करत असतात. सावरकर जिवंत असतांना हे काँग्रेसवाले त्यांच्या नावाला जेवढे बिचकत असत, तेवढेच मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतीलाही घाबरतात, असे दिसते. संसदेत त्यांचे तैलचित्र लावणे असो, अंदमानात क्रांतीस्तंभावर कोरलेल्या त्यांच्या काव्यपंक्ती असोत कि जन्मदिनाच्या दिवशी संसदेतील त्यांच्या चित्राला अभिवादन करणे असो, काँग्रेसवाल्यांनी काही गडबड केली नाही, असे झाले नाही. ठिकठिकाणी निघणार्‍या ‘सावरकर यात्रां’च्या पार्श्वभूमीवर या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संबंधात गांधी-नेहरू आणि त्यांच्या काँग्रेसने केलेल्या काही दुर्व्यवहारांची उदाहरणे पाहूया !

श्री. संजय दि. मुळ्ये

संकलक : श्री. संजय दि. मुळ्ये, रत्नागिरी

१. क्रांतीकारकांपासून चार योजने (अनुमाने २५ किलोमीटर) दूर रहाणारे काँग्रेसवाले ! 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संबंधातील काँँग्रेसवाल्यांच्या वागण्यात गेल्या १०० वर्षांत एक सुसूत्रता दिसते. पूर्वसुरींचे सारे (अव)गुण सध्याच्या काँग्रेसवाल्यांच्यातही आले आहेत. गांधी-नेहरूंनी प्रारंभापासूनच सशस्त्र क्रांतीकारकांशी उभा दावा मांडला होता. सावरकर तर क्रांतीकारकांचे मुकुटमणी. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा सुवर्णमहोत्सव खुद्द लंडनमध्येच सावरकर यांच्या प्रेरणेने वर्ष १९०८ मध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. या समारंभास स्कॉटलंड, आयर्लंड, जर्मनी आणि फ्रान्स येथून पाच-सातशे हिंदी पुढारी आणि विद्यार्थी लंडनमध्ये आले होते. आले नव्हते ते लंडनमध्येच शिकत असलेले जवाहरलाल नेहरू ! विद्यार्थीदशेत सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्याकरता ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन !’, अशी प्रतिज्ञा घेतली, तर नेहरूंनी विद्यार्थीदशेपासूनच क्रांतीकारकांपासून चार हात नव्हे, तर चार योजने दूर रहाणे पसंत केले !

‘स्वातंत्र्यलढ्यात धारातीर्थी पडलेला वीर इहपरलोकी धन्य होतो’, असे सावरकर यांनी अनुयायांना सांगितले, तर परलोकातील स्वर्गापेक्षा इहलोकातील सत्तेवर येण्याचीच शिकवण काँग्रेसने कार्यकर्त्यांना दिली. हिंदुस्थानातील वर्ष १९४५ ची सार्वत्रिक निवडणूक ‘हिंदुस्थानची फाळणी होऊ देणार नाही’, असे अभिवचन देऊन काँग्रेसने जिंकली आणि वर्षभरातच सत्तेसाठी आतूर झालेल्या काँग्रेसवाल्यांनी फाळणीसह स्वातंत्र्य स्वीकारले. हिंदुस्थानच्या अखंडत्वासाठी धर्मांध मुसलमानांच्या डोळ्याला डोळा भिडवायला काँग्रेस घाबरली आणि सावरकरांसह सर्वच क्रांतीकारकांच्या घाम आणि रक्त यांच्यावर पाणी फिरवती झाली !

२. मदनलाल धिंग्रा यांना भेकड म्हणणारे गांधी !

सावरकर यांच्या प्रभावळीतील मदनलाल धिंग्रा यांनी १ जुलै १९०९ या दिवशी कर्झन वायली याला गोळ्या घातल्या. या प्रकरणाचा वाराही आपणास लागू नये, याची सर्वतोपरी काळजी नेहरूंनी त्या वेळी घेतलीच; परंतु पुढे बर्‍याच वर्षांनी लिहिलेल्या त्यांच्या आत्मचरित्रात लंडनमधील वास्तव्याचा सविस्तर उल्लेख आहे; पण मदनलालविषयी त्यात एक अक्षरही नाही !

२२ जुलै १९०९ ला सावरकर मदनलाल यांना कारागृहात भेटावयास गेले आणि म्हणाले, ‘‘मी आपल्या दर्शनासाठी आलो आहे !’’ ब्रिटीश पोलीस आणि गुप्तहेर यांच्या उपस्थितीत पूज्य व्यक्तींच्या संदर्भात वापरला जाणारा ‘दर्शन’ हा शब्द २६ वर्षांच्या सावरकरांनी निर्भिडपणे उच्चारला, तर त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असणारे गांधीजी म्हणाले, ‘‘मदनलाल भेकडाप्रमाणे वागला. न पचलेल्या फालतू वाङ्मयाच्या वाचनामुळे तो हे कृत्य करण्यास प्रवृत्त झाला. त्याला चिथावणार्‍याला शिक्षा झाली पाहिजे.’’ गांधीजींचा हा वाग्बाण स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाला उद्देशून होता. हा ग्रंथ, क्रांतीकारकांची ही गीता, गांधीजींना फालतू वाङ्मय वाटली !

३. स्वातंत्र्यानंतर सरकारने सावरकर यांचे घर परत केले नाही !

आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील अनेक जण फाशीच्या वाटेवर आहेत, हे पाहून फ्रान्सला निघून गेलेले सावरकर स्वत:हून इंग्लंडला परत आले. १३ मार्च १९१० या दिवशी लंडनमधील व्हिक्टोरिया स्थानकात पोचताच त्यांना अटक करण्यात आली. लगोलग गाय आल्ड्रेड यांच्या नेतृत्वाखाली ‘सावरकर रक्षण समिती’ स्थापन होऊन निधीसंकलन चालू झाले. केंब्रिजमध्ये शिकत असलेल्या गर्भश्रीमंत नेहरूंनी या निधीला एक ‘पेनी’ही (चलनी नाणे) दिली नाही. उलट निधी मागण्यासाठी आलेल्या निरंजन पाल यांना त्यांनी हाकलून लावले ! या अटकेनंतर सुप्रसिद्ध रशियन कादंबरीकार मॅक्झीम गॉर्की यांनी ‘क्रांतीकारकांचा युवराज’ या शब्दांत सावरकर यांचा गौरव केला, तर लेनिनने त्यांच्या अटकेच्या निषेधाचा ठराव आंतरराष्ट्रीय समाजवादी अधिवेशनात मांडला !

हिंदुस्थानातील न्यायालयाने दोन जन्मठेपांची शिक्षा दिल्यावर सावरकर यांना डोंगरीच्या कारागृहातून ठाण्याच्या कारागृहात नेण्यात आले. त्यांची सर्व मालमत्ता राजहृत (जप्त) करण्याच्या न्यायालयाच्या आदेशामुळे भगूरची त्यांची मालमत्ता आणि घर यांचा लिलाव करून ते पैसे (त्या वेळचे २७ सहस्र रुपये) सरकारकडे जमा करण्यात आले. ठाण्याच्या कारागृहात त्यांच्या कपड्यांचाही लिलाव करण्यात आला. एवढेच नव्हे, तर त्यांचा चष्माही जप्त करण्यात आला. दुसर्‍या दिवशी सरकारी वस्तू म्हणून तो चष्मा त्यांना परत देण्यात आला. दयाळू इंग्रज सरकारने चष्मा तरी परत केला; पण हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर तरी शासनाने सावरकरांचे भगूर येथील घर त्यांना परत करावे कि नाही ? हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर काही देशभक्तांनी तशी मागणी केंद्रशासनाकडे केली. केंद्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि वर ‘ब्रिटिशांनी त्या मालमत्तेचा लिलाव केला’, असे उत्तर दिले. कम्युनिस्ट सदस्य विठ्ठलराव देशपांडे आणि जनसंघ सदस्य रामभाऊ म्हाळगी यांनी मुंबई विधीमंडळात जानेवारी १९५९ मध्ये या संदर्भात सरकारला प्रश्न विचारले, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले, ‘‘ती जप्ती हायकोर्टाने दिलेल्या शिक्षेत मोडते. म्हणून ती मालमत्ता परत करता येणार नाही.’’ गांधी-नेहरूंपैकी कुणाचेही घरदार, कपडेलत्ते, चष्मा ब्रिटिशांनी जप्त केला नव्हता आणि सावरकर यांचा तो केला, यातच त्यांच्या चळवळीचा दरारा अन् ब्रिटिशांनी घेतलेला त्यांचा धसका दिसून येतो !

४. सावरकर यांच्या बंधमुक्ततेसाठी काँग्रेसने काय केले ?

वर्ष १९१० पासून अंदमानात झिजत असलेल्या सावरकर यांना लवकर हिंदुस्थानात आणावे, अशी तोंडी वा लेखी मागणी काँग्रेसने कधीच केली नाही. ६ जानेवारी १९२४ या दिवशी सावरकर यांना कारागृहातून मुक्त करून रत्नागिरी जिल्ह्यात ५ वर्षे राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर स्थानबद्ध करण्यात आले. ही कालमर्यादा वाढवत वाढवत वर्ष १९३७ पर्यंत नेण्यात आली. वर्ष १९३५ मध्ये सावरकर यांच्या मुक्ततेची मागणी करणारे पत्रक सरकारकडे पाठवण्यासाठी चळवळ करण्यात आली. लक्षावधी लोकांनी त्या पत्रकावर आनंदाने स्वाक्षर्‍या केल्या; मात्र गांधींनी या पत्रकावर स्वाक्षरी केली नाही, तर नेहरूंनी ते पत्रकच भिरकावून दिले !

वर्ष १९३७ मध्ये महाराष्ट्राच्या प्रांतिक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले; पण तिने मंत्रीमंडळ बनवणे नाकारले. यानंतर आलेल्या कूपर मंत्रीमंडळातील बॅ. जमनादास मेहता यांच्यामुळे सावरकर त्याच वर्षी स्थानबद्धतेतून मुक्त झाले. काँग्रेसने सत्ताग्रहण केले असते, तर सावरकर यांच्या सुटकेचे कसे तीन-तेरा वाजले असते, त्याचा अंदाज कुणीही बांधू शकेल !

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानबद्धतेतून मुक्त झाल्यावर सावरकर मुंबईत रहाण्यास गेले. १६ मार्च १९४५ या दिवशी सावरकर यांचे थोरले बंधू बाबाराव निधन पावले. याचे दुखवट्याचे पत्र गांधीजींनी ‘गेली ८ वर्षे मुंबईत वास्तव्यास असणार्‍या सावरकर यांना रत्नागिरीच्या पत्त्यावर पाठवले; मात्र याच गांधीजींनी निजामाची आई वारल्यावर लगेचच त्याला तार पाठवली होती. मुंबईतील जिनांच्या निवासस्थानी त्यांच्या नाकदुर्‍या काढण्यासाठी वर्ष १९४४ मध्ये गांधी त्यांच्याकडे सलग १७ दिवस चर्चेसाठी जात होते; पण हिंदुस्थानची फाळणी टळावी; म्हणून रान उठवणार्‍या सावरकर यांच्या घरी जाणे सोडाच, चर्चेसाठी त्यांना बोलावणेही गांधीजींना कधी जमले नाही ! ‘राष्ट्रद्रोह्यांचा सन्मान आणि राष्ट्रभक्तांचा अपमान’, हेच काँग्रेसचे ब्रीदवाक्य आहे कि काय ? अशी शंका कुणालाही येईल !

५. पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही नाही !

कोणत्याही काँग्रेसवाल्यापेक्षा घाम, रक्त, मालमत्ता, मित्र, वहिनी, बंधू, पुत्र, पत्नी आदींचा पुष्कळ त्याग अथवा विरह सहन केलेल्या सावरकर यांच्या हस्ते पहिल्या स्वातंत्र्यदिनानिमित्तचा देहलीतील लाल किल्ल्यावरील तिरंगा फडकवायला हवा होता. ते घडले नाही. सावरकर त्या वेळी मुंबईत होेते. दादरच्या शिवाजी उद्यानाजवळून ‘सावरकर सदन’ हाकेच्या अंतरावर आहे; परंतु शिवाजी उद्यानावरील पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही काँग्रेसने सावरकर यांना दिले नाही.

२२ नोव्हेंबर १९५७ या दिवशी राजा महेंद्रप्रताप यांनी लोकसभेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद यांचे बंधू बारींद्र घोष आणि स्वामी विवेकानंद यांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त या क्रांतीकारकांचा बहुमान करावा’, असा प्रस्ताव मांडला; मात्र बहुमतात असलेल्या नेहरू सरकारने हा प्रस्ताव फेटाळून या देशासाठी रक्त सांडणार्‍या असंख्य क्रांतीकारकांचा अवमान केला !

मे १९६४ मध्ये नेहरूंचे निधन झाले. आयुष्याच्या अखेरीस म्हणजे वर्ष १९६५ पासून केंद्रशासनाने वीर सावरकरांना तुटपुंजे मासिक ३०० रुपये मानधन चालू केले.