विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणारे जिल्हा परिषद प्रशासन !
पुणे – कात्रज परिसरातील गुजर-निंबाळकरवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक स्थितीत असून त्या ठिकाणी शाळा भरत आहे. वर्ष २०१८-१९ मध्ये ही इमारत ‘धोकादायक’ म्हणून अहवाल जिल्हा परिषद, पंचायत समितीला देण्यात आला आहे; परंतु त्याच ‘धोकादायक’ इमारतीमध्ये शाळा भरत असून विद्यार्थी भीतीच्या छायेतच शिक्षण घेत आहेत. शाळेची इमारत ही दुमजली असून पहिल्या मजल्यावर ३, तर दुसर्या मजल्यावर २ वर्गखोल्या आहेत. यातील दुसर्या मजल्यावरील २ वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून मुले खेळतांना इमारत कंप पावते. त्यामुळे ही सर्व इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र पुन्हा शाळा कुठे भरवायची ? हा प्रश्न अनुत्तरीत असल्याने इमारत पाडता येत नाही. त्यातून केवळ वेळकाढू भूमिका घेत उडवाउडवीची उत्तरे अधिकारी देतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत म्हणाल्या की, नव्याने समाविष्ट गावातील कोणतीही शाळा महापालिकेकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे त्यावर आम्हाला कोणतीही कार्यवाही करता येत नाही. हवेली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी नीलिमा म्हेत्रे म्हणाल्या की, शाळेमध्ये ५ वर्गखोल्या आणि ५ शिक्षक असून त्यातील २ वर्गखोल्या धोकादायक आहेत. त्यामुळे उर्वरित
३ वर्गखोल्यांमध्ये २ सत्रांमध्ये शाळा भरवण्यात येत आहे. आगामी काळात महापालिकेशी समन्वय करून इमारतीविषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल.