ठाणे येथे पोलीस भरतीच्या परीक्षेत अपप्रकार करणार्‍या परीक्षार्थीला अटक

परीक्षार्थी ‘डमी’ असल्याचे उघड

ठाणे – येथे पोलीस भरतीच्या परीक्षेच्या वेळी अपप्रकार करणार्‍या परीक्षार्थीला अटक करण्यात आली आहे. तो ‘डमी’ परीक्षार्थी होता. परीक्षार्थी बालाजी कुसळकर याच्या जागी तो परीक्षा देत होता. यासाठी त्याने १० सहस्र रुपयेही घेतले होते. परीक्षेमध्ये भ्रमणभाषद्वारे नक्कल (‘कॉपी’) करतांना तो पकडला गेला. त्याच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक छायायाचित्र

कानात गव्हाच्या आकाराचा ‘इअरफोन’ घालून तो कॉपी करत होता, तर त्याने भ्रमणभाष गुडघ्याच्या भोवती लावण्यात येणार्‍या घट्ट पट्ट्यात (‘नी कॅप’मध्ये) लपवला होता. पर्यवेक्षकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी वरील कारवाई केली.

संपादकीय भूमिका

  • अशांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
  • असे नकली परीक्षार्थी बसवून उत्तीर्ण होणारे पोलीस काय कामाचे ?