महामार्गावर ‘चिपलुन’, ‘पेन’ असे अशुद्ध भाषेत गावांच्या नावांचे फलक !


रत्नागिरी – अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे रखडलेले काम चालू आहे. या महामार्गावर जागोजागी महामार्गाचे अंतर आणि त्या त्या ठिकाणाची ओळख सांगणारे फलक उभारले जात आहेत; परंतु या फलकांवर शहरांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहिली जात आहेत. चिपळूणचे ‘चिपलुन’ किंवा पेणचे ‘पेन’ असे नामफलक काही ठिकाणी आहेत.

मराठी भाषा जतन करण्यासाठी अनेक प्रयत्न चालू असतांना महामार्गावर मात्र मराठीची मोडतोड केल्याचे दिसून येत आहे. मराठी भाषेचा अभिमान असणारे, राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी यांनी याविषयी महामार्ग विभागाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांना जाब विचारायला हवा, अशी अपेक्षा मराठीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

महामार्गावरील गावांच्या नावांविषयी राष्ट्रीय महामार्ग विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे ! – आशिष खातू, भाजप

चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील फलक तयार करणारे हिंदी भाषिक आहेत. गावांच्या नावाचे भाषांतर ‘ॲप’वरून करण्यात आले असल्याचे लक्षात येते. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग विभागाने याविषयी गांभीर्याने लक्ष देऊन गावांच्या नावांत वेळीच सुधारणा करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, अशी चेतावणी येथील भाजपचे शहराध्यक्ष आशिष खातू यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रशासकीय अधिकारी, हेच मराठीचे मारेकरी आहेत, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !