पंजाबमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होण्यापासून सरकारने रोखावे ! – ज्ञानी हरप्रीत सिंह, श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार (प्रमुख)

श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार (प्रमुख) ज्ञानी हरप्रीत सिंह यांचे आवाहन

श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार (प्रमुख) ज्ञानी हरप्रीत सिंह

अमृतसर (पंजाब) – राजकीय हितासाठी पंजाबमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यापासून सरकारने रोखले पाहिजे. सरकारने लोकशाहीमध्ये रहाणार्‍यांना आणि स्वतःचे म्हणणे मांडणार्‍यांना अवैधरित्या कह्यात घेण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे; कारण पंजाबने यापूर्वी पुष्कळ सोसले आहे, असे आवाहन श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार (प्रमुख) ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी केले आहे. ‘आताची वेळ चांगल्या भविष्याकडे जाण्याची आहे. पंजाबमध्ये मागील सरकारांच्या अत्याचारांचे घाव भरण्यासाठी कोणत्याही सरकारने गांभीर्याने पाहिलेले नाही’, असा आरोपही त्यांनी केला.

ज्ञानी हरप्रीत सिंह पुढे म्हणाले की,  

१. मागील सरकारांनी भेदभाव आणि अत्याचार केल्याचा परिणाम शीख युवकांच्या मानसिकतेवर झाला असून त्यांच्यात असंतोष आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अशा तरुणांना दिशाहिन बनवून त्यांच्या भावनांशी खेळले जात आहे. शीख तरुणांनी संघर्षाचा मार्ग चोखळण्याऐवजी विचारवंतांवर विश्‍वास ठेवावा. शीख युवकांवर अत्याचार करण्याची सरकारला संधी मिळेल, अशा कोणत्याही आमीषापासून युवकांनी स्वतःला रोखले पाहिजे.

२. शिखांमध्ये फुटीरतेची भावना निर्माण करण्यात राजकीय भेदभावांची मोठी भूमिका आहे; मात्र आज आम्ही आवाहन करतो की, भूतकाळात सरकारकडून झालेल्या चुकांतून शिखांनी शिकून धार्मिक, राजकीय आणि आर्थिक सूत्रांना सोपे बनवले पाहिजे, तसेच फुटीरतेची भावना नष्ट केली पाहिजे. सत्तेसाठी सरकारांनीही अल्पसंख्यांक युवकांच्या मनात फुटीरतावादाची भावना निर्माण होण्यापासून रोखले पाहिजे.