‘१०.३.२०२३ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भजने म्हटली. या कार्यक्रमाचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
१. वातावरणात गुलाबी रंगाच्या दैवी फुलांची निर्मिती होणे आणि त्यामागील सूक्ष्म प्रक्रिया
भजनांचा कार्यक्रम चालू होताच वातावरणात गुलाबी रंगाच्या दैवी फुलांची निर्मिती झाली.
अ. सूक्ष्म प्रक्रिया : वातावरणात सत्त्व कण असतात. प.पू. भक्तराज महाराज यांनी लिहिलेल्या भजनांतील प्रत्येक शब्दांत भाव-भक्ती ओतप्रोत भरलेली आहे. त्यामुळे वातावरणातील सत्त्व कण प्रस्फुटित होतात आणि त्यातून गुलाबी रंगाच्या दैवी फुलांची निर्मिती होते.
आ. कार्य : दैवी गुलाबी फुलांमुळे भाव असलेल्या साधकांना दैवी ऊर्जा प्राप्त होते आणि त्यांच्या उत्साहात वाढ होते.
२. कुंडलिनीचक्रे जागृत होणे
भजने ऐकतांना माझी कुंडलिनी अनाहतचक्राच्या ठिकाणी पोचली. त्या वेळी माझा भाव जागृत झाला. त्यानंतर कुंडलिनी माझ्या विशुद्धचक्राच्या ठिकाणी पोचली. तेव्हा माझ्या तोंडात गोड चव निर्माण झाली.
३. गायनातील ‘रागा’शी संबंधित देवतांनी प्रसन्नतेने नृत्य करणे
गायनात विविध ‘राग’ असतात. रागांचा ‘राग’ हा पुरुष तत्त्वाशी संबंधित देव असतो आणि ‘रागिणी’ ही स्त्री तत्त्वाशी संबंधित देवी असते. ‘बाबांची भजने चालू होताच ‘राग’ आणि ‘रागिणी’ या देवता प्रसन्न होऊन नृत्य करत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दृश्य दिसले. साधक-कलाकारांनी पुष्कळ साधना केल्यावर या देवता प्रसन्न होतात. ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी लिहिलेली भजने ही सिद्धच आहेत. त्यामुळे रागाशी संबंधित देवता भजनांवर प्रसन्नतेने नृत्य करतात’, असे मला जाणवले.
४. सूक्ष्मातून ‘ॐ’कार दिसणे
‘मनवा भूल मत जय्यो । साईबाबा के चरण ।’ या भजनाच्या वेळी व्यासपिठावर मध्यभागी ठेवलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राखाली मला सूक्ष्मातून पांढर्या रंगाचा ‘ॐ’कार दिसला.
५. प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणांवर सूक्ष्मातून अनेक धार्मिक ग्रंथ नतमस्तक झाल्याचे दिसणे
‘वैराग्याचा पूर्ण ब्रह्म जो’ या भजनाच्या वेळी व्यासपिठावरील प.पू. भक्तराज यांच्या छायाचित्राखाली ‘सूक्ष्मातून अनेक धार्मिक ग्रंथ एकेक करून जमा होत आहे’, असे मला दृश्य दिसले. त्या वेळी ‘हे ग्रंथ म्हणजे ‘ज्ञाना’चे प्रतीक असून ते प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणांशी नतमस्तक झाले आहे’, असे मला जाणवले.
६. ‘कार्यक्रमाच्या वेळी व्यासपिठावर सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांच्या मागे परात्पर गुरु डॉ. आठवले हे उपस्थित आहेत’, असे मला सूक्ष्मातून दृश्य दिसले.
७. भजनात सहभागी असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांची वैशिष्ट्ये
७ अ. श्री. दीपक बिडवई : श्री. बिडवई यांनी भजने म्हटली आणि कार्यक्रमात हार्माेनियमद्वारे साथ-संगत केली. त्यांच्या स्वरांत ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयीचा आर्तभाव’, ‘प्रेम’ आणि ‘आध्यात्मिक गोडवा’ होता. या तिन्ही गुणांचा त्रिवेणी संगम, म्हणजे श्री. बिडवई यांनी गायलेली भजने होय. ‘श्री. बिडवई यांच्या जिभेवर श्रीसरस्वतीदेवीचा वास आहे. त्यामुळे त्यांच्या गायनात आध्यात्मिक गोडवा आहे’, असे मला जाणवले.
७ आ. श्री. भालचंद्र दीक्षित : श्री. दीक्षित यांनी टाळ वाजवून भजनांची साथ केली. त्या वेळी त्यांच्याकडे पाहून ‘साक्षात् प.पू. भक्तराज महाराज एका सिंहासनावर बसले आहेत आणि त्यांच्या चरणांशी बसून मी टाळ वाजवत आहे’, असा श्री. दीक्षित यांचा भाव आहे’, असे मला जाणवले.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०२३)
|