साधना आणि क्षात्रधर्म यांचे समन्वयक गुरु गोविंदसिंह !

१. भारतीय परंपरेमध्ये शस्त्र आणि शास्त्र यांना समसमान महत्त्व !

‘भारतीय परंपरेमध्ये शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचीही समान उपासना होत आली आहे. अथर्ववेदात शस्त्र आणि शास्त्र यांच्या माध्यमातून आक्रमण करणार्‍यांवर विजयी होण्याची प्रार्थना मिळते. तसेच उपनिषदच्या मंत्रांमध्येही ‘शरीरं मे विचर्षणम् ।’

प्रा. शंकर शरण

(तैत्तिरीयोपनिषद्, वल्ली १, अनुवाक ४, वाक्य १) म्हणजे ‘माझे शरीर ब्रह्मज्ञानासाठी (अमृतत्त्वाच्या प्राप्तीसाठी) सुयोग्य (पात्र) होवो’  अशी प्रार्थना दिलेली आहे. ती यासाठी की, ज्ञान आणि विद्या मिळवणे, तसेच आपले कुटुंब, समाज अन् धर्म यांचे रक्षण करणे यांसाठी शरीर बलवान असणे आवश्यक आहे. सुप्रसिद्ध नारद आणि सनतकुमार यांच्या संवादामध्ये बळाला विचारांच्याही आधी स्थान देण्यात आले आहे. त्याचे स्पष्ट कारण दिले की, ‘एक काठीवाला २० विद्वानांना मारून पळवून लावू शकतो.’ त्यामुळे भारतीय ज्ञान-परंपरा आणि संस्कृती यांमध्ये शक्ती अन् विवेक यांना सारखेच महत्त्व मिळाले आहे. ज्ञान आणि विवेक यांच्यासमवेतच शारीरिक, शस्त्र अन् सामाजिक बळ आवश्यक आहे. त्यामुळे महर्षि वाल्मीकि यांनी लिहिलेल्या ‘रामायणा’च्या जवळपास प्रत्येक पानावर वीरता, शत्रूदमन, क्षमता आणि अस्त्र-शस्त्र निपुणता यांसारख्या गुणांचा उल्लेख आहे. तोच संकेत महाभारत आणि अनेक पुराणांमध्येही आहे. आपले सर्व हिंदु देवीदेवता शस्त्रधारी आहेत. महाकवी संत तुलसीदास यांनी, तर ‘तुलसी मस्तक तब नवे, जब धनुष-बाण लो हाथ ।’, असे म्हटले आहे, म्हणजे त्यांनी विनाधनुष्य-बाण असणार्‍या रामाची अभ्यर्थना (प्रार्थना) करणेही स्वीकारले नाही.

२. धर्मप्रसार आणि दुर्जनांचा नाश यांच्यासाठी गुरु गोविंदसिंह यांचा अवतार

वास्तविक संपूर्ण भारतीय इतिहासात ठिकठिकाणी ज्ञानी आणि वीर होत आले आहेत, जे त्या परंपरा जिवंत ठेवतात. अलीकडच्या इतिहासातील गुरु गोविंदसिंह हेही त्याचेच एक अद्वितीय उदाहरण आहेत. त्यांना ‘संत सिपाही’ ही उपाधीही देण्यात आली आहे. त्यांनी त्यांची आत्मकथा ‘बिचित्र नाटका’चा आरंभ ईशवंदनेने नाही, तर खड्ग (तलवार) वंदनेने केला आहे. त्यानंतरच काल-अकाल स्तुती केली आहे. त्यानंतर ते ॐ काराने सृष्टीचा प्रारंभ, रामकथा आणि लव-कुश वंशाचा इतिहास सांगतात. ते हेही सांगतात की, लव-कुश यांच्या वंशजांनीच त्या दोघांच्या नावाने लाहोर आणि कसूर यांसारखी सुंदर नगरे वसवली. त्याच रामाच्या वंशात पुढे जाऊन गुरु नानक यांचा जन्म झाला, ज्यांनी कलियुगात धर्माचा प्रचार केला. गुरु नानक यांच्या उत्तराधिकार्‍यांनी ‘तिलक-जानवे’ यांच्या रक्षणासाठी बलीदान दिले. त्या हुतात्म्यांमध्ये गुरु गोविंदसिंह यांचे वडील गुरु तेगबहाद्दूरही होते. एवढे वर्णन केल्यानंतर गुरु गोविंदसिंह त्यांच्याविषयी सांगणे चालू करतात की, पूर्वजन्मात ते हेमकुंठमध्ये योग्याच्या रूपात रहात होते. ईश्वराने त्यांना दुर्जनांचा नाश आणि धर्मप्रसार यांच्यासाठी नवीन जन्मात पाठवले.

जहां जहां धरम बिथारो । दुसट दोखियनि पकरि पछारो ।
याही काज धरा हम जनमं । समझ लेहु साधू सभ मनमं ।
धरम चलावन संत उबारन । दुसट सबन को मूल उपारन ।

अशा प्रकारे गुरु गोविंदसिंह यांनी त्यांचा पूर्वजन्म धर्माचा प्रसार, दु:खितांचे रक्षण आणि दुर्जनांचा विनाश यांच्यासाठी झाल्याचे सांगितले आहे. येथे स्पष्टपणे गुरु गोविंदजी गीतेचे ‘यदा यदा हि धर्मस्य..’ आणि तुलसीदास यांच्या ‘जब जब होहिं धरम की हानी…’च्या सनातन शिक्षणालाच परत प्रस्तुत अन् स्थापित करतात. त्यांच्या रचना ‘चंडी दी वार’, ‘चउबीस अवतार’, ‘श्री शस्त्र नाममाला’ यांमध्ये त्यांनी त्याच आख्यानाला बळ दिले आहे.

३. गुरु गोविंदसिंह यांच्या दृष्टीने बाह्य गोष्टींपेक्षा ज्ञान, भक्ती आणि कर्म अधिक महत्त्वाचे

गुरु गोविंदसिंह यांच्या पूर्वीचे गुरुही तलवार धारण करत होते. मोगलांनी गुरु अर्जुनदेव यांना यातना देऊन मारले. त्यानंतरचे गुरु हरगोविंद सिंह यांनी दोन तलवारी ठेवणे चालू केले, ‘पीरी’ आणि ‘मीरी’ ! हे सरळ सरळ शास्त्रासह शस्त्रालाही संयुक्त महत्त्व असल्याचे प्रतीक होते. त्याच परंपरेत गुरु गोविंदसिंह यांनी धर्माच्या रक्षणासाठी ‘खालसा पंथ’ स्थापन केला. त्यामुळे खालसा शिखांचे एक विशिष्ट रूप आहे; परंतु एकच रूप नाही. वास्तविक आपल्या ‘बिचित्र नाटका’मध्ये गुरु गोविंदसिंह यांनी ‘पंथ’ शब्दाचा वापर दोन अर्थाने केला आहे. एक धर्म म्हणून आणि दुसरा मत विशेषसाठी; परंतु हेही नोंदवले पाहिजे की, त्यांनी केवळ चिन्ह, रूप, वेश आदी बाह्य गोष्टींना महत्त्व देणे तुच्छ समजले. असे करणार्‍यांना आपल्यापासून वेगळे ठेवतांना गुरु गोविंदसिंह यांनी स्पष्ट लिहिले की,

न जटा मुंडि धारौ । न मुंद्रका सवारौ ।
न डिमभं दिखाऊं । न भेखी कहाड ।

यासमवेत खरे ज्ञान, भाव आणि कर्म यांना सर्वाेपरी सांगून गुरु गोविंदसिंह यांनी लिहिले की,

सुआंगन मै परमेसुर नाही । खोजि फिरै, सभ ही को काही ।

अशा प्रकारे गुरु गोविंदसिंह यांनी ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा असाधारण समन्वय करून दाखवला. आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक वर्षी आनंदपूर साहिब (पंजाब) येथे पवित्र पर्वासह ३ दिवसापर्यंत ‘होला-मोहल्ला’ हा सण साजरा केला जातो. त्यात विविध युद्धकौशल्य प्रदर्शनांसह काव्य, भजन आणि कीर्तन यांचे कार्यक्रम चालतात. या विशेष कार्यक्रमांना गुरु गोविंदसिंह यांनी प्रारंभ केला होता.

४. कवि, तत्त्वज्ञानी, योद्धा आणि संत या ४ गुणकर्मांनी सुसज्जित गुरु गोविंदसिंह !

गुरु गोविंदसिंह यांची ‘संत सिपाही’ उपाधीही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अपूर्ण चित्रण आहे, असे म्हटले पाहिजे; कारण या दोन पदांच्या व्यतिरिक्त गुरु गोविंदजी उच्च कोटीचे कवि आणि तत्त्वज्ञानी होते. त्यांनी ‘राम अवतार’, ‘कृष्ण अवतार’, ‘चंडी माहात्म्य’ आदी महत्त्वाचे ग्रंथ लिहिले आहेत. भागवत कथेला लोकभाषेत आणून जनतेच्या लाभासाठी पुन:प्रस्तुत केले. ‘दशम् कथा भगौत की भाखा करी बनाई ।’

याच ‘दशम् ग्रंथा’मध्ये गुरु गोविंदसिंह यांच्या रचना आहेत, ज्यांचा शीख ज्ञान-दर्शनाच्या मूळ स्रोतांमध्ये समावेश करण्यात येतो. गुरु गोविंदसिंह यांचा ब्रज, फारसी आणि पंजाबी भाषांवर समान अधिकार होता. ‘श्रीशस्त्र नाममाला’चे सहस्रांहून अधिक पद कृपाण, चक्र, तीर, पाश आदींचे देवशक्तींच्या रूपात वर्णन आहे. त्यांची शेवटची रचना ‘जफरनामा’ आहे, त्यात ते बादशहा औरंगजेबाला फटकारतात, तर हिंदूंना शिक्षण देतात. एवढे गहन ज्ञान आणि काव्यरचना यांच्या समवेतच गुरु गोविंदसिंह स्वत: महान योद्धा होते, जे ‘चिडिया को बाज से लडाने, गीदड को शेर बनाने, एक सैनिक को सवा लाख से लडाने’चे धैर्य ठेवत होते. त्यामुळे प्रा. कपिल कपूर यांच्या शब्दांमध्ये कवि, तत्त्वज्ञानी, योद्धा आणि संत या ४ गुणकर्मांनी सुसज्जित दुसरी विभूती संपूर्ण विश्वात आजपर्यंत दिसून आली नाही.

५. धर्म, जनता आणि शास्त्र यांच्या रक्षणासाठी शस्त्रांचा वापर करणे आवश्यक !

शास्त्र आणि शस्त्र ही भारताची सहज परंपरा आहे. योगेश्वर कृष्णापासून आद्यशंकराचार्य, गुरु गोरखनाथ, माधवाचार्य विद्यारण्य आणि समर्थ रामदासस्वामी यांच्यापर्यंत ही परंपरा त्याच भावात पहाता येते. आद्यशंकराचार्य यांनी महान टीका लिहिली, बौद्धांशी शास्त्रार्थ केले, ४ धाम आणि १०८ मंदिरे बांधली, शस्त्रपूजक दशनामी संप्रदाय उभा केला आणि देशभरात आखाड्यांची स्थापना केली. ही शास्त्र-शस्त्र यांची एकत्र परंपरेचीच एक महान प्रस्तुती आणि ठोस व्यावहारिक रूप होते.

येथे लक्षात घ्यायला हवे की, ‘शास्त्रात शस्त्राचा समावेश आहे’, हे संस्कृत भाषेचे अद्भुत सौंदर्य आहे, केवळ एका कानाच्या फरकाने ! मुळात शास्त्राला धारण, पालन आिण त्याचे रक्षण करण्यासाठी शस्त्र असतात. सर्व वैदिक ऋषींच्या वाणीमध्ये तेज आणि सामर्थ्य दिसून येते. त्यांचे साहित्य वाचल्याने आणि ऐकल्याने शक्तीची अनुभूती होते. त्या रचनांमध्ये दीनता किंवा जगाच्या उदासीनतेचा थोडाही अंश मिळत नाही. नेमकी तीच भावना भारतात लोकप्रिय असलेल्या रामायण आणि महाभारत या दोन्हींमध्ये आहे. त्यामुळे आज आपण धर्म आणि अहिंसा यांच्या खोट्या व्याख्यांमधून बाहेर आले पाहिजे की, ज्या अर्धकच्चे प्रचारक, स्वार्थी आणि भोगी राजकारणी यांनी प्रसारित केल्या आहेत. भारतीय ज्ञान परंपरेत केवळ अकारण द्वेषपूर्ण शस्त्राचा वापर करण्यालाच हिंसाचार म्हटले जाते. जेव्हा की, धर्म, जनता किंवा शास्त्र यांच्या रक्षणासाठी शस्त्राचा वापर अनिवार्य कर्तव्य आहे; म्हणून ती अहिंसा आहे.

६. धर्माच्या रक्षणासाठी गुरु गोविंदसिंह यांचे बलीदान हीच गुरु गोविंदसिंह यांची शिकवण आहे.

त्यांच्या३ पिढ्यांनी धर्मासाठी बलीदान केले आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा सामान्य हिंदु जनतेच्या रक्षणासाठी धर्मांध बादशाह औरंगजेबासमोर मोठ्या व्यक्तीने जाण्याची वेळ आली, तेव्हा ९ वर्षांचे बालक असतांना स्वत: गोविंदसिंह यांनीच त्यांचे वडील गुरु तेगबहाद्दूर यांना बलीदान देण्यासाठी प्रेरित केले होते. नंतर गुरु गोविंदसिंह यांच्या चारही मुलांना मोगलांच्या हातांनी वीरगती मिळाली. त्यांची दोन्ही लहान मुले ५ वर्षीय फतेह सिंह आणि ८ वर्षीय अजीत सिंह यांना भिंतीमध्ये जिवंत गाडून ठार करण्यात आले; कारण त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला होता.

अशा प्रकारे गुरु गोविंदसिंह यांच्या सर्व मुलांचे बलीदान झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या शिष्यांनी विचारले, ‘‘तुमच्या नंतर गुरु कोण होतील ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘यापुढे ग्रंथालाच गुरु समजा.’’ याचा खरा अर्थ असा की, ग्रंथ हे केवळ स्थूल रूप नसून ते गुरूंची महान वाणी आणि त्यांची शिकवण आहे. त्यामुळे तेच मुख्य मार्गदर्शक आहे. प्रा. कपिल कपूर यांच्या शब्दांमध्ये ‘ग्रंथांवरील आवरण (मुखपृष्ठ) किंवा त्यात दिलेले शब्द गुरु नाहीत, तर त्यात जे ज्ञान आहे, ते तुमचे गुरु आहेत.’ ते ज्ञान लोकांचे कल्याण आणि लोकसंग्रह यांसाठी आहे.’ त्यामुळे ज्ञान, भक्ती आणि नि:स्वार्थ कर्माची प्रेरणा हीच ग्रंथाला गुरु समजण्याचा आशय आहे. हेच ‘गुरुग्रंथ साहेब’ आणि ‘दशम् ग्रंथ’ यांची शिकवण आहे.

७. हिंदूंनी सनातन शिकवणीनुसार शास्त्र आणि शस्त्र यांची जोपासना करणे आवश्यक !

गुरु गोविंदसिंह यांच्यानंतर आधुनिक युगातही आपल्या विद्वानांनी नवीन भाषेत तेच सर्व सांगितले आहे. स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांनी योग वेदांत समवेत सिंहासारखी निर्भिडता आणि शक्ती संपन्नता यांवरही सतत जोर दिला होता. त्यांचे संपूर्ण लिखाण आणि व्याख्याने यांमध्ये हे दिसून येते. स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते, ‘बलवान शरीर असल्यावरच तुम्हाला गीतेचा संदेश अधिक समजेल.’ श्री अरविंद यांनी हिंदूंच्या चिंतन र्‍हासाला दुर्बलतेशीच जोडून पाहिले होते. त्यांच्या शब्दांमध्ये ‘आम्ही शक्तीला सोडून दिले आहे; म्हणून शक्तीने आम्हाला सोडले आहे.’

वास्तविक आज हिंदू आणि शीख वेगळे होण्यात हे एक प्रमुख कारण आहे. दुर्बलासमवेत कुणालाच पहायचे नसते. मागील १०० वर्षांमध्ये खोटे शिक्षण आणि अहंकारी नेते यांच्यात वाढ झाल्याने हिंदूंनी स्वत:ला अकर्मण्य, आळशी, परमुखापेक्षी (साहाय्यासाठी दुसर्‍याच्या तोंडाकडे पहाणारा), भित्रा आणि अवडंबरयुक्त प्रचारक किंवा वाचाळ नेते यांच्या मागे चालणार्‍या शेळ्यामेंढ्यांमध्ये परावर्तित केले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी देश-विदेशात एक कनिष्ठ समुदाय अशी प्रतिमा बनली आहे. जी गोष्ट श्री अरविंद यांना दिसली होती, तीच गोष्ट सहजपणे विस्टन चर्चिल, आयजनहावर आणि माओ त्से तुंग यांनीही पाहिली होती. हिंदू मुख्यत: त्यांचे नेते, शासक, संपादक, साहित्यिक आदीही केवळ मोठमोठ्या गोष्टी सांगणे, खोटे आचरण, अवडंबर दाखवणे, दुसर्‍यांना दोष देत रहाणे, ज्याला त्याला सल्ले देणे यांमध्येच पुढे रहातात. ठोस काम हातात न घेणे, समोर आलेले आव्हान स्वीकारून काही करण्याची वेळ आल्यावर विविध कारणे सांगणे, दुसर्‍यांचे तोंड पहाणे, स्पष्टीकरणे देऊन निघून जाणे आणि सत्याचा खोटेपणा करून दायित्व टाळण्यात कुशल आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय जगत आणि भारतातही हिंदूंचा कुणी मित्र नाही. छोट्या मोठ्या गोष्टींशी मैत्री काही आकर्षक गोष्ट नाही.

म्हणून हिंदूंना आधी आपल्या पायावर उभे रहाणे, आपल्या बाहुबलावर विश्वास करणे, राजेशाहीची योग्य समज ठेवून त्याचे चातुर्याने; परंतु दृढतेने शिकणे, शत्रूंच्या डोळ्यांत डोळे मिळवून बोलणे, सत्याचे महत्त्व समजणे आणि आपल्या बुद्धी विवेकाचा प्रयोग करणे शिकावे लागेल. हे सर्व सोडून बलवान पूर्वज किवा सध्याच्या शेजार्‍याला ‘आपला’ समजून बालीश पराक्रमी बनण्याचे चातुर्य आणि विश्वगुरु बनण्याच्या बढाया मारणे सोडावे लागेल. दुसर्‍या शब्दांत हिंदूंना सनातन शिकवणीनुसार शास्त्र आणि शास्त्र या दोन्हींचे माहात्म्य परत स्वीकारावे लागेल, जे त्यांच्या हातून दोन्ही निघून गेले आहेत.

८. हिंदु आणि शीख यांनी शस्त्रांसमवेत साधनेचे बळ बाळगणे आवश्यक !

दुसरीकडे शिखांनाही त्यांचे गुरु आणि ज्ञान परंपरा यांवर योग्य पकड ठेवावी लागेल, अन्यथा शीख गुरूंचा बळी घेणारा साम्राज्यवादी हिंसक मतवाद आजही त्याच रांगेत आहे आणि भारतासमवेत जगभरात पसरत आहे. त्याचा सामना करण्याऐवजी लोकशाही देशाचे शासनकर्ते जिहादकडे दुर्लक्ष करणे आणि खर्‍या खोट्या गोष्टी करून जनतेची अन् स्वत:चीही फसवणूक करण्यात मग्न आहेत. जेव्हा की याचा अर्थ अनेक शतकांचा अनुभवी, सतत विस्तारवादी आणि जिहादी मतवाद यांना चांगला ठाऊक आहे.

त्यामुळे शस्त्र धारण करणार्‍यांना शास्त्राने दिलेले विवेकाचे बळही समवेत ठेवणे आवश्यक आहे. नाही तर आज हिंदु आणि शीख यांच्यावर सांस्कृतिक विनाशाचा सारखाच धोका समोर ठाकलेला आहे. त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी सर्व नाटके, तमाशे, धन, वैभव, संख्या आदी काहीही उपयोगाचे नाही. मागील ८ दशकांमधील काश्मीर आणि पंजाब या दोघांच्याही परिणामांवरून हे लक्षात येऊ शकते.’

– प्रा. शंकर शरण, देहली (जानेवारी २०२३)

(राजकारणशास्त्राचे प्राध्यापक आणि ज्येष्ठ लेखक)