|
उत्तरप्रदेश येथे ‘काशीविश्वनाथ कॉरिडॉर’, तसेच मध्यप्रदेश येथे उज्जैन येथे ‘महाकाल कॉरिडॉर’ प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. यातून तेथील तीर्थक्षेत्रांचा कायापालट केला आहे. तोच धागा पकडून पंढरपूरचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्यशासन ‘पंढरपूर कॉरिडॉर’ प्रकल्प करत आहे. ‘या प्रकल्पामुळे वारकर्यांना सुविधा मिळतील. राज्यात धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल’, असे शासनाचे म्हणणे आहे. शहरातील गल्ल्या, रस्ते, घाट, मठ आणि छोटी-मोठी मंदिरे यांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे २ सहस्र कोटी रुपयांचा व्यय अपेक्षित आहे. या प्रकल्पाला काही वारकरी संघटना, स्थानिक, तसेच व्यापारी यांचा विरोध आहे. वर्ष १९८१ मध्ये पंढरपूर विकास आराखडा करण्यात आला असून त्या वेळी रुंदीकरण आणि प्रशस्तीकरण झाले होते. कॉरिडॉरद्वारे होणार्या विकासाला विरोध नाही; मात्र हा आराखडा झाल्यास वर्षानुवर्षे व्यवसाय करणार्या व्यापार्यांचे काय होणार ? येथील प्राचीन वास्तू, मंदिरे यांचे अपेक्षित असे जतन होणार का ? यांसह अन्य काही प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
१. संभाव्य पंढरपूर कॉरिडॉर असा असेल !
अ. चंद्रभागा नदीपात्राच्या वाळवंटापासून नामदेव पायरीपर्यंत सध्या रस्ता ४० फूट असून तो ३८० फूट करण्यात येणार आहे.
आ. पहिल्या टप्प्यात मंदिर समितीकडे असलेल्या श्री विठ्ठल मंदिरासह अन्य मंदिरांत सुधारणा करण्यात येणार आहेत. सध्या मुख्य मंदिराच्या बाहेर वर्ष १९८७ मध्ये दर्शन मंडप म्हणून ७ मजली इमारत बांधण्यात आली आहे. इमारतीत उद्वाहन (लिफ्ट) नाही. त्यामुळे याचा अपेक्षित असा लाभ होत नसल्याने ती पाडण्यात येऊन तिथे सुसज्ज असे कार्यालय, वाहनतळ, रुग्णवाहिका, अग्नीशमन, तसेच अन्य विभाग करण्यात येणार आहेत.
२. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाड्या’चे जतन करणे आवश्यक !
प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉरमध्ये ‘चंद्रभागेच्या काठावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाड्याचे जतन करा’, अशी सूचना पुरातत्व विभागाने जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे केली आहे. चंद्रभागा नदीकडे जाणारा महाद्वार घाट मोठा करण्याचा प्रस्ताव असून या घाटावर श्रीमंत होळकर वाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांना हे पत्र दिले आहे.
या पत्रात म्हटले आहे, ‘‘अहिल्यादेवी होळकर चॅरिटेबल ट्रस्ट’ हा खासगी ऐतिहासिक वाडा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट केला असून महाद्वार पोलीस चौकी ते घाट रस्ता रुंदीकरणात अहिल्यादेवी यांचे वास्तव्य असणारा होळकर वाडा बाधित होणार आहे. या ऐतिहासिक वारसा वास्तूचे महत्त्व विचारात घेऊन त्याची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, याची काळजी घेऊन कार्यवाही व्हावी.’’ होळकर वाड्याचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपूरकर यांनी ‘केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागास या वास्तूविषयी सविस्तर माहिती देत तो बाधित होऊ नये’, यासाठी निवेदन दिले आहे.
३. ‘वारकरी संप्रदाय पाईक संघा’ने कॉरिडॉरविषयी मांडलेली भूमिका !
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नुकताच पंढरपूरचा नवीन विकास आराखडा सिद्ध करण्यात आलेला आहे. विकास करण्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरची निवड केल्याविषयी आम्ही शासनाचे आभारी आहोत ! आमचा ‘विकासा’ला विरोध नसून ‘विनाशा’ला विरोध आहे.
अ. ज्या वारकरी भाविक-भक्तांसाठी हा प्रकल्प राबवला जात आहे, पिढ्यान्पिढ्या पंढरपूर येथे वास्तव्य करणार्या नागरिकांचे मत लक्षात न घेता, तसेच त्यांच्या सूचना, समस्या जाणून न घेता हा प्रकल्प बळजोरीने राबवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न चालू आहे.
आ. पंढरपूर शहरात स्वच्छतेच्या अनेक समस्या आहेत. वाराणसीच्या धर्तीवर स्वच्छतेचा आदर्श न घेता वाराणसीप्रमाणे कॉरिडॉरचा अट्टहास अधिकारी का करत आहेत ?
इ. कॉरिडॉरमुळे पंढरपूरची मूळ आणि हिंदु संस्कृती नष्ट होऊ शकते. हिंदु संस्कृतीच्या संवर्धनासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले, अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीमंत अहिल्यादेवी होळकर संस्थानचा वाडा, श्रीराममंदिर, तसेच वैकुंठवासी मल्लप्पा वासकरांचे शिष्य म्हणजेच पंढरीचे वारकरी असणारे तथा श्रीमंत सरकार महादजी शिंदे यांचा ऐतिहासिक वाडा, द्वारकाधीश मंदिर हेही यात नष्ट होणार असतील, तर हे संस्कृती संवर्धनाचे नव्हे, तर यातून हिंदु, तसेच पंढरपूरची संस्कृती यांचे हनन होण्याची शक्यता आहे.
ई. पंढरपूरमध्ये येणारा भाविक सर्वसामान्य वर्गातील आहे. तो शेकडो किंवा सहस्रो रुपये मोजून वारीचे ४-५ दिवस अधिक व्यय होईल, अशा ठिकाणी मुक्काम करू शकत नाही. मंदिर परिसरात आजही सहस्रो भाविकांना अत्यल्प दरात रहाण्याची सोय घरोघरी केली जाते. ही घरे पाडल्यास इतक्या भाविकांची रहाण्याची सोय शासन करू शकणार आहे का ? आजही शासनाच्या मंदिर समितीने बांधलेल्या भक्तनिवासाचे दर पाहून सामान्य वारकरी तिकडे फिरकतही नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.
उ. पहिला दर्शन मंडप पाडून दुसरा मंडप स्मशानभूमीजवळ बांधला जात आहे, हे योग्य आहे का ? वास्तविक मंदिराच्या मागील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात ४-५ एकर जागा उपलब्ध असतांना इतक्या दूर दर्शन मंडप कशासाठी ? मंदिर परिसरही रिकामा करण्याची घाई कशासाठी ? सुलभ दर्शन व्यवस्थेसाठी ‘टाईम टोकन’ (वेळ घेऊन दर्शन घेण्याची) पद्धत अवलंबली गेल्यास मंदिर परिसरात अनावश्यक गर्दीही होणार नाही आणि सध्याचे उपलब्ध दर्शन मंडप पुरेसे होतील.
ऊ. चंद्रभागा नदीवर २ किलोमीटर अलीकडे आणि २ किलोमीटर पलीकडे, असा दोन्ही तीरांवर चंद्रभागेचा काठ मोकळा आहे. तेथे नाशिक येथील गोदावरी पार्कसारखा अत्यंत विलोभनीय प्रकल्प उभा केला जाऊ शकतो, तसेच मंदिरापासून १ किलोमीटरच्या अंतरावर २५० एकरचा निसर्गाचे वैभव लाभलेला यमाई तलाव आहे. त्याचा घेर ५ किलोमीटरचा आहे. तिथेही शेगाव ‘आनंद सागर’सारखा एखादा भव्य प्रकल्प उभा केल्यास गर्दीचे विकेंद्रीकरण होईल. त्यामुळे सर्व गर्दी मंदिरालगत न येता विभागली जाईल.
ए. वारकरी संप्रदायाच्या विनंतीला मान देत हा प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्प तात्काळ मागे घ्याल, ही निश्चिती आहे. आपण सर्वजण मिळून श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि संतमहात्म्य यांना अपेक्षित असे पंढरपूर तीर्थक्षेत्राचे नवनिर्माण नक्कीच करू शकतो, हा विश्वास वाटतो !
५. कॉरिडॉर करतांना शासनाने कोणती काळजी घ्यावी ?
सर्वसामान्य नागरिक वा वारकरी असो, विकास हा प्रत्येकालाच हवा आहे. त्यामुळे कॉरिडॉरसंबंधी विकासाला विरोध नाही, तर विकासकामे करतांना कोणत्याही ऐतिहासिक वास्तूची मोडतोड होऊ नये, मंदिर परिसरातील कोणत्याही उपदेवतेला धक्का पोचू नये, कोणतेही पारंपरिक उपचार बंद पडू नयेत, हीच भाविकांची प्रामाणिक इच्छा आहे.
६. भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना !
अ. पंढरपूरनगरी श्री विठ्ठलाच्या अस्तित्वाने पावन झालेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे येथे मांस आणि मद्य विक्री, तसेच गुटखाबंदी असणे आवश्यक आहे.
आ. या तीर्थक्षेत्रात प्रवेश करताच भाविकांच्या मनात भक्तीभाव निर्माण व्हावा, असे वातावरण असायला हवे. विविध संतांच्या भक्तीचा वारसा, त्यांच्या भक्तीची उदाहरणे लिखित स्वरूपात शहरात दर्शनी भागात लावल्यास भाविकांमधील भक्तीभाव वाढण्यास साहाय्य होईल. शहरात ठिकठिकाणी ‘नामजप करत पंढरपूर या पवित्र तीर्थक्षेत्रातील चैतन्य ग्रहण करा’, ‘तीर्थक्षेत्रातील पावित्र्य जपण्यासाठी आपली प्रत्येक कृती श्री विठ्ठलाला आवडेल, अशी आदर्श करा’, असे फलक लावण्यात यावेत, त्यांची कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न असायला हवेत.
इ. पंढरपूर येथे वर्षभरातील ४ मुख्य वारी भरवल्या जातात. या वेळी लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भक्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. वारीच्या काळात सर्व दिंड्यांचे सुयोग्य नियोजन, रस्त्यावर कचरा पडणार नाही, यादृष्टीने उपाययोजना असायला हवी.
ई. चंद्रभागा नदीच्या विकासाचा विचार करण्यापूर्वी प्रथम नदीचे प्रदूषण १०० टक्के रोखणे आवश्यक आहे. नदीची नियमित स्वच्छता होणे, वाळवंट परिसराची स्वच्छता होणे आवश्यक आहे. चंद्रभागेच्या पात्रात सर्रास अवैध वाळू उपसा चालू आहे. या उपशामुळे पडलेल्या खड्डयांमुळे अनेक भाविकांचा मृत्यू झाला आहे. हा वाळू उपसा सरकारने तात्काळ थांबवावा.
उ. कोणत्याही परिस्थितीत भाविकांकडून पैशांची लूट होता कामा नये. वाहन ‘पार्किंग’च्या नावाखाली, तसेच खासगी रिक्शाचालकांकडून भाविकांची लूट होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.
ऊ. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू केल्यास तीर्थक्षेत्राचे पावित्र्य टिकून रहाण्यास साहाय्य होते. त्यामुळे श्री विठ्ठल मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात यावी. संपूर्ण हिंदु समाज मंदिराशी जोडला जावा, यासाठी सण-उत्सव सामूहिकरित्या मंदिरांमध्ये साजरे केले जावेत, म्हणजे त्यांच्यामध्ये धर्मपरंपरांचे जतन करण्याचा संस्कार होईल.
ए. भाविकांना निवासस्थान सहज उपलब्ध व्हावे. त्यांना शोधाशोध करायला लागू नये.
७. पंढरपूर पर्यटनस्थळाच्या ऐवजी भक्तांच्या आत्मोन्नतीचे ठिकाण व्हावे !
‘जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर’, अशी सहस्रो वर्षांची परंपरा लाभलेले पंढरपूर हे श्री विठ्ठलाच्या भक्तीने पावन असलेले पवित्र ठिकाण आहे. पंढरपूर हे महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री विठ्ठलाचे मंदिर आणि तेथे दर्शनासाठी भक्त यांचे नाते अतूट असते. त्यामुळे या ठिकाणाला विकासाची जोड देऊन पर्यटनस्थळ न करता देशभरातील कानाकोपर्यातून येणार्या भक्तांच्या आत्मोन्नतीचे ठिकाण म्हणून सिद्ध व्हायला हवे. त्या दृष्टीनेच कॉरिडॉर कार्यवाहीत आणण्यात यावा.
संकलक : वर्षा कुलकर्णी, सोलापूर आणि श्री. अजय केळकर, कोल्हापूर (१.३.२०२३)
कॉरिडॉरविषयी मान्यवरांची मतेसरकारने कॉरिडॉरऐवजी येथील पायाभूत सुविधांचा विकास आधी करायला हवा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, खासदार, भाजपपंढरपूर येथे सर्व देशवासियांचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठल मंदिर आहे. कॉरिडॉरऐवजी येथील पायाभूत सुविधांचा सरकारने आधी विकास करायला हवा. येथे विमानतळ होणे आवश्यक आहे; कारण देशभरातून लाखो भाविक पंढरपूर येथे येतात. येथील चंद्रभागा नदी अतिशय प्रदूषित झाली आहे. आधी तिची स्वच्छता होणे आवश्यक आहे. ‘वारकरी’ हाच केंद्रबिंदू ठेवून कॉरिडॉर होणार ! – ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष, धर्मवीर आध्यात्मिक सेना (शिवसेना)पंढरपूरचा पुढील १० वर्षांचा विचार करून कॉरिडॉर होत आहे. वारकर्यांना केंद्रबिंदू ठेवूनच होणार आहे. याची कार्यवाही करतांना तो वारकरी-स्थानिकांशी समन्वय साधूनच होणे अपेक्षित आहे. ‘कॉरिडॉर’ होत असतांना येथील पुरातन परंपरांचेही जतन होणे आवश्यक आहे, तसेच यात वारकर्यांचे हितही पहाणे आवश्यक आहे. ‘कॉरिडॉर’च्या माध्यमातून शासन हे वारकरी, तसेच पंढरपूरचे तीर्थक्षेत्र यांच्या विकासासाठी कटीबद्ध आहे. ‘कॉरिडॉर’मुळे नेमक्या कोणत्या समस्यांचे निराकरण होणार आहे ? – गणेश लंके, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती‘कॉरिडॉर’मुळे नेमक्या कोणत्या समस्यांचे निराकरण होणार आहे ? हे शासनाने अगोदर स्पष्ट करणे आवश्यक आहे. येथील सर्व दुकाने हटवल्यावर परत त्या ठिकाणी अन्य कुणाचे अतिक्रमण होणार नाही, याची शाश्वती कोण देणार ? चंद्रभागा नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित असून ती शुद्ध करणे आवश्यक आहे. शासनाची संकल्पना चांगली आहे; मात्र कोट्यवधी रुपयांचा निधी व्यय करतांना समन्वय साधणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष योजना कागदावर येण्यास मार्च मास उजाडेल ! – नेताजी पवार, नगरविकास विभाग, पंढरपूरशासनाने अद्याप कागदोपत्री काहीही घोषित केलेले नाही. सध्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास चालू असून प्रत्येकाची मते जाणून घेण्यात येत आहेत. प्रत्यक्ष योजना कागदावर येण्यास मार्च मास उजाडेल. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री – कॉरिडॉर करतांना कोणत्याही परिस्थितीत पुरातन वास्तूंचे जतन केलेच जाणार आहे. वारकर्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. |