सातारा, ७ मार्च (वार्ता.) – छत्रपती संभाजीनगर येथील एका राजकीय सभेत काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची चित्रे झळकावली. ही चित्रे झळकावणार्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचे गुन्हे नोंद करण्यात यावेत, अशी मागणी सातारा येथील भाजपचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. (आमदारांना मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? – संपादक)
आमदार भोसले म्हणाले की, औरंगजेबाने त्याच्या काळात लक्षावधी हिंदूंची हत्या केली. महत्त्वाच्या देवस्थानांना मोठा उपद्रव केला. अशा औरंगजेबाचे कुणी उदात्तीकरण करत असेल, तर मी त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या जुलमी कारकीर्दीला प्रखर विरोध केला. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात असे घडत असेल, तर औरंगजेबाची चित्रे झळकावणार्यांनी महाराष्ट्र सोडून निघून जावे.