ठाणे जिल्‍ह्यातील श्री मलंगगडाच्‍या पायथ्‍याशी ५ मार्चला श्री मलंगजागरण सभेचे आयोजन !

ठाणे, १ मार्च (वार्ता.) – हिंदूंचे श्रद्धास्‍थान असलेल्‍या श्री मलंगगडावर मागील काही वर्षांपासून गडाचे इस्‍लामीकरण करण्‍याचे नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहेत. मलंगगडमुक्‍तीसाठी हिंदूंनी अनेक आंदोलने केली. श्री मलंगगड या तीर्थक्षेत्राचे जागरण आणि त्‍याचा प्रसार होणे हेही तेवढेच आवश्‍यक आहे. यासाठी सकल हिंदु समाजाकडून श्री मलंगगडाच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या नेवाळी पाडा येथील क्रीडांगणावर ५ मार्च या दिवशी दुपारी ४ वाजता श्री मलंगजागरण सभेचे आयोजन करण्‍यात आले आहे. या सभेला उपस्‍थित राहून प्रत्‍येकाने आपले धर्मकर्तव्‍य बजावावे, असे आवाहन सकल हिंदु समाजच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

या श्री मलंगजागरण सभेला अनंत श्री विभूषित जगद़्‍गुरु रामानंदाचार्य प.पू. स्‍वामी नरेंद्राचार्य महाराज, तेलंगाणा येथील श्री राम युवा सेनेचे अध्‍यक्ष तथा आमदार श्री. राजा सिंह ठाकूर, संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, विश्‍व हिंदु परिषदेचे केंद्रीय संयुक्‍त मंत्री श्री. महेंद्र (दादा) वेदक हे उपस्‍थित असणार आहेत. या सभेत सकल हिंदु समाजाच्‍या वतीने ठराव पारित केले जाणार असून ते महाराष्‍ट्र शासनाकडे सुपूर्द केले जाणार आहेत.

ठाणे जिल्‍ह्यातील मलंगगडावर नवनाथांपैकी एक असलेल्‍या मच्‍छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांची मंदिरे आहेत. यासह जालिंदरनाथ, कानिफनाथ यांसह नवनाथांपैकी अन्‍य ५ नाथांच्‍या समाध्‍या आहेत. गडावर शिव, गणेश आणि श्री दुर्गादेवी यांची मंदिरेही आहेत; मात्र सध्‍या येथे मोठ्या प्रमाणावर मुसलमानांकडून अतिक्रमण करण्‍यात आले आहे.

सामाजिक माध्‍यमे, कीर्तन, प्रवचने यांच्‍या माध्‍यमातून सभेला येण्‍याचे आवाहन !

सभेच्‍या आयोजनाची माहिती सध्‍या सामाजिक माध्‍यमांद्वारे तसेच कीर्तन, प्रवचन यांसह गावागावांत जाऊन तरुणांकडून नागरिकांपर्यंत पोचवली जात आहे. श्री मलंगगड भागातील ४१ गावांमध्‍ये धर्मसभेच्‍या निमंत्रणाचे काम पूर्ण झाले असून आता आजूबाजूच्‍या जिल्‍ह्यांमध्‍येही धर्मसभेचे जागरण करण्‍यात येत आहे.