रामनाथी आश्रमातील युवा शिबिरात सहभागी होण्याविषयी कोल्हापूर येथील कु. संजना कुराडे हिला आलेल्या अनुभूती !

कु. संजना कुराडे

१. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी वडिलांनी अनुमती न देणे आणि सकारात्मक राहून नामजपादी उपाय केल्याने वडिलांनी अनुमती दिल्याने भावजागृती होणे

‘मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या युवा शिबिरात सहभागी होण्याचा निरोप मिळाला; परंतु पूर्वी मी कधीच एकटी राहिले नव्हते. त्यामुळे शिबिराला जाण्यासाठी माझ्या वडिलांची मला अनुमती नव्हती. तेव्हा काही वेळ मला ताण आला होता. त्यानंतर मी सकारात्मक राहून ‘व्यष्टी साधना पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, शरणागतभावाने प्रार्थना करणे’ इत्यादी उपाय करण्यास आरंभ केला. मी पुष्कळ शरणागतीने प्रार्थना केली. त्यानंतर बाबांमधील नकारात्मकता न्यून झाल्याचे मला जाणवले आणि गुरुकृपेने त्यांनी मला शिबिराला जाण्यासाठी अनुमती दिली. त्याच क्षणी माझी भावजागृती झाली.

२. कलियुगात श्रीकृष्णाप्रमाणेच परात्पर गुरु डॉ. आठवले आपत्काळासाठी मार्गदर्शन करणार असल्याचे जाणवणे

माझ्या मनात विचार आला, ‘ज्याप्रमाणे द्वापरयुगामध्ये महायुद्धाच्या काळात श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली होती, तसेच कलियुगातही परात्पर गुरु डॉक्टर आम्हा सर्वांना आपत्काळासाठी मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याला सतत अर्जुनाप्रमाणे भावस्थितीत रहायचे आहे.’

३. घरी अडचण असूनही कुटुंबियांनी दुसर्‍या एका कार्यशाळेसाठीही आश्रमात रहाण्याची अनुमती देणे

रामनाथी आश्रमामध्ये जाण्याचा दिवस आला. त्या वेळी ‘आपण साक्षात् भूवैकुंठात जाणार आहोत’, याविषयी मला कृतज्ञता वाटत होती. प्रवासामध्ये असतांनाच ‘नंतर होणार्‍या प्रशिक्षण शिबिरासाठीही तू आश्रमात काही दिवस थांबू शकतेस का ?’, असे मला विचारण्यात आले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी घरी अडचण असूनही प्रशिक्षण शिबिरासाठी थांबण्याविषयी विचारल्यावर मला अनुमती मिळाली. तेव्हा मला कुटुंबियांकडून ‘सकारात्मकता आणि इतरांचा विचार करणे’, हे गुण शिकायला मिळाले.

गुरुकृपेने दोन्ही शिबिरांमध्ये सहभागी होण्याचे माझे नियोजन झाले. ‘आपण साधनेत कितीही न्यून पडलो, तरी गुरुमाऊली आपल्याला सतत आनंद देत असतात. त्यांची कृपा आपल्यावर सदैव असते’, हे मला अनुभवता आले.’

– कु. संजना संजय कुराडे (वय १८ वर्षे), कोल्हापूर (नोव्हेंबर २०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक