दिवसातून एक घंटा योगासाठी द्या ! – योगऋषी रामदेवबाबा

  • मिरामार समुद्रकिनारी योगऋषी रामदेवबाबा यांच्या योग शिबिराला प्रारंभ

  • शिबिराला प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती

शिवपिंडीवर अभिषेक करून शिबिराचे उद्घाटन करतांना डावीकडून प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि योगऋषी रामदेवबाबा

पणजी, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – प्रत्येकाने दैनंदिन कामांमध्ये कितीही व्यस्त असलो, तरी प्रतिदिन एक घंटा योगासने करण्यासाठी दिला पाहिजे. जीवनात आरोग्य सुदृढ रहाणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे आवाहन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले. मिरामार समुद्रकिनार्‍यावर ‘सनातन धर्म संघा’च्या वतीने आयोजित ३ दिवसीय  नि:शुल्क योग शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे आवाहन केले. महाशिवरात्रीच्या मंगलदिनी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला तपोभूमी, कुंडई पिठाधीश पद्मश्री प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक आदींची उपस्थिती होती.

प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि योगऋषी रामदेवबाबा यांनी प्रारंभी शिवलिंगावर अभिषेक केला. त्यानंतर योगऋषी रामदेवबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित सहस्रो शिबिरार्थींनी योगासने केली. योग शिबिराचा लाभ घेण्यासाठी शिबिरार्थी पहाटे ४.४५ वाजताच कार्यस्थळी उपस्थित होते. पहाटे ५ ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत योगासने करण्यात आली.

गोवा राज्य आध्यात्मिक पर्यटन केंद्र बनावे ! – योगऋषी रामदेवबाबा

गोवा राज्य ‘वेलनेस’ आणि आध्यात्मिक पर्यटन केंद्र बनावे, असे माझे स्वप्न आहे. पर्यटकांनी रक्तदाब, मधुमेह, ‘थायरॉईड’ आणि कर्करोग या रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गोव्यात यावे. यापूर्वी एक व्यक्ती हृदयाच्या ९० टक्के भागावर परिणाम झालेला असतांनाही योगासने करून पूर्णपणे रोगमुक्त झालेली आहे. सनातन जीवनशैली अंगीकारणे आणि नियमित योगासने करणे यांमुळे अन्य कोणत्याही औषधांची आवश्यकता नाही. भारत ‘वेलनेस’साठी जागातिक स्तरावरचे केंद्र बनावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे.’’

गोवा योगभूमी बनवण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा योगभूमी बनवण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३ दिवसीय शिबिराच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलतांना दिले. ते पुढे म्हणाले, ‘‘गोमंतकियांनी निरोगी जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे. गोमंतकियांनी अशा प्रकारच्या योग शिबिरात सहभागी झाले पाहिजे.’’

धार्मिक आणि सांस्कृतिक क्रांतीला गोव्यातून  प्रारंभ ! – प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी

गोव्यातील सर्व समुद्रकिनारे योगमय व्हावेत, तसेच सर्वांना योग आणि आयुर्वेद यांच्या माध्यमांतून सुदृढ आरोग्य लाभावे, यासाठी योगऋषी रामदेवबाबा, ‘पतंजलि योग समिती’ आणि कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठ यांचा प्रयत्न आहे. योगऋषी रामदेवबाबा हे सनातन धर्मानुसार जीवन जगणार्‍या व्यक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ऋषिमुनींनी दिलेल्या ज्ञानाचा जगभर प्रसार करत आहेत. गोव्यात आज समुद्रकिनार्‍यावर अमली पदार्थ आणि मद्यप्राशन करून जीवन नष्ट करणार्‍या पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. ‘व्यसन चांगले कि आरोग्य सुदृढ ठेवणे चांगले ?’, याचे प्रत्येकाने चिंतन करावे. गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला आम्ही चालना देत आहोत. धार्मिक आणि सांस्कृतिक क्रांतीला गोव्यापासून प्रारंभ झाला आहे, असे उद्गार प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांनी योगशिबिरानंतर पत्रकारांशी बोलतांना काढले.