सायकल वापरूया !

सायकल

देशात बंगाल राज्यात सायकल चालवणार्‍यांचे प्रमाण ७८.९ टक्के , महाराष्ट्रात २९.३ टक्के, तर गोवा येथे ३५.७ टक्के आहे. ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’नुसार बंगाल राज्यात सर्वाधिक लोक सायकल चालवतात.

सायकल म्हणजे वायू प्रदूषण न करता शारीरिक लाभ मिळवून देणारे वाहन आहे. सर्वसाधारण दुचाकी या इंधन, वीज (इलेक्ट्रिक) यांवर कार्य करतात. सध्या पेट्रोलवर चालणार्‍या दुचाकींचे प्रमाण अधिक आहे. काही आस्थापनांनी विजेवर चालणार्‍या दुचाकी काढल्या आहेत. त्यांचे मूल्य पेट्रोलवर चालणार्‍या दुचाकीपेक्षा अधिक आहे. पायी चालत १० – १५ मिनिटे अथवा त्याहूनही अल्प मिनिटांचे अंतर गाठायचे असेल, तर बहुतांश जण दुचाकीचाच उपयोग करतात. इतकी या वाहनांची सवय झाली आहे. जणू दुचाकी म्हणजे ‘पाय’च झाले आहेत. यामुळे साहजिकच शरिराची हालचाल करण्यावर आपण स्वतःहूनच बंदी घातली आहे; कारण काय ? तर  वेळेची बचत (?). असे असले, तरी किती वेळा हे कारण सत्य असते ? दुचाकीचा वापर अंगवळणी पडल्याने माणूस आळशी झाला आहे. वेळेच्या कारणाची ढाल पुढे करून त्याच्या शारीरिक क्षमतेचे तीन तेरा वाजले आहेत.

पेट्रोलचे दर चढे आहेत. विजेच्या वाढत्या दरांची टांगती तलवार कायम असतेच. या सर्वांत सुवर्णमध्य म्हणजे सायकल. ना पेट्रोलची कटकट ना वीज नसल्यावर दुचाकीच्या बॅटरी भारित (चार्ज) करण्याची चिंता. विजेवर चालणार्‍या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना तांत्रिक कारणास्तव आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. अर्थातच यांचे प्रमाण अल्प आहे. असे असले, तरी सायकलविषयी अशा अपघाती घटना शक्य नाही.

देशातील महानगरे, शहरे यांत वायू प्रदूषण वेगाने वाढत आहे. येथे शुद्ध हवा मिळणे अशक्यच झाले आहे. ‘दुचाकीचा वापर थांबवून सायकलचा उपयोग करावा’, असा पुसटसा विचारही येथील लोकांच्या मनाला स्पर्श करत नाही. आजच्या झगमगत्या युगात सायकलचा उपयोग केला, तर लोक काय म्हणतील ? याचा प्रथम विचार होतो. याला शुद्ध मूर्खपणा म्हणता येईल. प्रवाहाच्या विरुद्ध न जाता अयोग्य गोष्टींच्या प्रवाहासह वहात जाण्यास शहाणपणा समजला जातो. वायू प्रदूषणाने श्वास कोंडत असल्याचा अनुभव प्रतिदिन घेतला जात असला, तरी सायकलचा उपयोग करण्याच्या शहाणपणापासून दूर आहोत. सायकलचा उपयोग करून स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य उत्तम राखून निरोगी जीवन जगूया !

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.