सांगली – दैनिक ‘ललकार’चे संस्थापक आणि ज्येष्ठ संपादक बापूराव दत्तात्रय खराडे (वय ९३ वर्षे) यांचे ६ फेब्रुवारीला वृद्धापकाळाने पत्रकारनगर येथील रहात्या घरी निधन झाले. बा.द. खराडे यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, नातू, भाऊ असा मोठा परिवार आहे. शाळा सोडून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेणार्या बा.द. खराडे यांनी स्वातंत्र्यलढ्यात विविध पातळ्यांवर स्वत:चे योगदान दिले. सडेतोड पत्रकारिता करतांना त्यांना आम्ल आक्रमणाचाही त्यांना सामना करावा लागला; पण ते मागे हटले नाहीत. स्वत:च्या अखेरच्या श्वासापर्यंत ते पत्रकारितेच्या धर्माला खर्या अर्थाने जागले.
राज्य आणि जिल्हा पातळीवर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नासाठी काम करणार्या विविध संघटनांवर पदाधिकारी म्हणून काम केले. त्यांना ‘पत्रकारितेतील भीष्माचार्य’ ही पदवी, तसेच श्री. ल.वि. तथा बाळासाहेब गलगले, प्रतिष्ठा प्रतिष्ठान यांचे पुरस्कार, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा ‘पत्रकार भूषण पुरस्कार’ यांसह अन्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.