श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

‘पुरोहितांनी निरपेक्षपणे धर्मशास्‍त्राच्‍या आधारे हिंदु संस्‍कृतीचा विश्‍वात प्रसार करणे’, हीच त्‍यांची साधना असणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

 १. पुरोहितांनी निरपेक्ष भावाने यज्ञकर्म न केल्‍यास त्‍यातून त्‍यांची समष्‍टी साधना होत नसणे

‘एका राज्‍यातील एका पुरोहितांना आता यापुढे संपर्क करण्‍याची आवश्‍यकता नाही’, असे परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले. सनातन संस्‍थेच्‍या आश्रमात केलेल्‍या एका विधीसाठी या पुरोहितांनी पुष्‍कळ दक्षिणा घेतली होती. हे पुरोहित निरपेक्ष भावाने, त्‍यागी वृत्तीने, सेवाभावाने कार्य करत नाहीत; म्‍हणून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी असे सांगितले असावे. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना केवळ कार्य नको आहे, तर यज्ञकर्म करण्‍यातून पुरोहितांची साधना होणे अपेक्षित आहे. यातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यातील सर्वांप्रती असलेल्‍या अप्रकट प्रीतीचे सुंदर दर्शन होते. त्‍यांच्‍या जागी दुसरे कुणी असते, तर त्‍यांनी आपला लाभ पाहून अमाप दक्षिणा देऊन या पुरोहितांकडून यज्ञ-याग करवून घेतले असते; पण परात्‍पर गुरु डॉक्‍टर हे ‘लाभ-हानी’ असे न पहाता केवळ ‘त्‍या व्‍यक्‍तीची त्‍यातून साधना कशी होईल ?’ हेच पहातात. ‘आजच्‍या आपत्‍काळात पुरोहितांकडे असलेल्‍या वैदिक ज्ञानाचा लाभ समष्‍टीला व्‍हावा आणि त्‍यातून पुरोहितांंचीही साधना व्‍हावी’, हाच यामागील श्री गुरूंचा खरा उद्देश आहे.

२. ‘समष्‍टी साधनेतून स्‍वतःला मिळालेला अनमोल मनुष्‍यजन्‍म सार्थकी लावावा’, अशी पुरोहितांची विचारप्रक्रिया असणे आवश्‍यक !

खरे गुरु हे ‘प्रत्‍येक व्‍यक्‍तीची साधना कशी होईल ?’, हेच पहातात. ‘एखाद्या व्‍यक्‍तीकडे असलेल्‍या ज्ञानाचा उपयोग समष्‍टीच्‍या कल्‍याणासाठी कसा होईल ?’, अशीच त्‍यांची भूमिका असते. शेवटी तन, मन आणि धन यांच्‍या त्‍यागातूनच देवप्राप्‍तीच्‍या दिशेने वाटचाल करता येते. समाजातील पुरोहितांना मंत्र ठाऊक आहेत; परंतु ते ‘या मंत्रशक्‍तीच्‍या माध्‍यमातून समाजात धर्मक्रांती कशी होईल ?’, असा विचार करतांना दिसत नाही. समाजातील अनेक पुरोहित आता व्‍यावहारिक दृष्‍टीने विचार करतात. प्रत्‍येकाला स्‍वतः केलेल्‍या कर्मातून दक्षिणा मिळण्‍याची अपेक्षा आहे. अपेक्षेसहित केलेले कर्म मानवाला भावनेत अडकवते. अल्‍प कालावधीसाठी मिळणारा मनुष्‍यजन्‍म असा व्‍यर्थ घालवून कसा चालेल ?; परंतु याचे भान आज-कालच्‍या बहुतांश पुरोहितांना नाही.

३. अर्थलाभाचा विचार करून व्‍यावहारिक भावनेने केलेल्‍या यज्ञातून चैतन्‍य निर्माण होऊ न शकणे

खरे पहाता पुरोहितांनी अगदी निरपेक्षपणे धर्मशास्‍त्राच्‍या आधारे हिंदु संस्‍कृतीचा प्रसार सार्‍या विश्‍वात करायला हवा; परंतु बहुतांश पुरोहित असे करतांना दिसत नाहीत. निःस्‍वार्थभावाने सेवा करणार्‍या आणि अनेक पूर्ण वेळ साधक असणार्‍या सनातन संस्‍थेसाठी काही विधी करायचा असेल, तरीही पुरोहित दक्षिणेविषयी तडजोड करतांना दिसत नाहीत. येथेही ते त्‍यांच्‍या कर्माचे मूल्‍य आकारल्‍याविना रहात नाहीत. व्‍यावहारिक भावनेने केलेल्‍या अशा कर्माला कधीतरी चैतन्‍य प्राप्‍त होईल का ?’