विविध पैलूंनी भगवान श्रीकृष्णांचे व्यक्तिमत्त्व उलगडणार
पुणे – श्रीमद़्भगवद़्गीतेच्या अनुषंगाने भगवान श्रीकृष्ण चरित्राचा अभ्यास आजवर अनेकांनी केला आहे; मात्र भगवद़्गीतेपलीकडे कुशल राजनीतीतज्ञ, उत्तम प्रशासक, चतुर मुत्सद्दी असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत. हेच पैलू समोर आणण्याच्या उद्देशाने ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थे’च्या वतीने ‘गीतेविना श्रीकृष्ण’ हा संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
यातून चालू वर्षामध्ये ग्रंथाची निर्मिती करण्यात येणार आहे. भगवान श्रीकृष्णांचा आजवरचा अभ्यास हा प्रामुख्याने भगवद़्गीतेला केंद्रस्थानी ठेवून झाला. परंतु त्यांचे व्यवहार कौशल्य, बुद्धीचातुर्य आदी पैलूंवर पुरेसा प्रकाश पडलेला नाही. त्यादृष्टीने संशोधन प्रकल्प हाती घ्यावा, अशी सूचना मुंबईतील उद्योजक आणि श्रीकृष्ण भक्त श्रीकांत पारेख यांनी संस्थेला केली होती. ते या प्रकल्पाला अर्थसाहाय्य करत आहेत. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचा आरंभ झाला आहे. त्यांना प्रतिभा वामन या सहकार्य करत आहेत.