‘मराठी’ लोप पावलेली साहित्‍य संमेलने !

अखिल मराठी बांधव ज्‍याची वर्षभर आतुरतेने वाट पहातात, असे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत वर्धा येथे होत आहे. साहित्‍य संमेलन म्‍हटले की, नामांकित साहित्‍यिकांच्‍या मुलाखती, विविध पुस्‍तकांची रेलचेल, मराठीच्‍या संवर्धनासाठी भरीव कार्यक्रम असे अपेक्षित आहे. वस्‍तूस्‍थिती मात्र निराळीच असून मागील काही दशकांतील साहित्‍य संमेलने पाहिल्‍यास प्रत्‍येक साहित्‍य संमेलनागणिक त्‍याचा दर्जा आणखीनच ढासळतांना दिसत आहे. गेल्‍या काही वर्षांपासून संमेलनात पारित केले जाणारे ठराव हे दिखाव्‍यापुरतेच केले जातात आणि संमेलन झाले की, ते बासनात गुंडाळून ठेवण्‍यात येतात. त्‍याचा शासनदरबारी कधीच पाठपुरावा केला जात नाही. सध्‍याच्‍या संमेलनांमधून साहित्‍याच्‍या मेजवानीऐवजी खाण्‍यापिण्‍याच्‍या मेजवानीवरच लक्ष केंद्रित केलेले आढळते. व्‍यासपिठावर सारस्‍वतांऐवजी राजकीय लोकप्रतिनिधींनाच मानाचे स्‍थान देण्‍यात येते. सर्वांत दु:खद गोष्‍ट म्‍हणजे ‘पुरोगामित्‍वाचा डांगोरा पिटणारे संमेलन’, असे स्‍वरूप संमेलनाला प्राप्‍त झाले आहे.

पांढरा हत्ती बनलेले साहित्‍य महामंडळ !

वर्ष १९६१ मध्‍ये स्‍थापन झालेल्‍या अखिल भारतीय साहित्‍य महामंडळाच्‍या ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’, ‘महाराष्‍ट्र साहित्‍य परिषद पुणे’, ‘विदर्भ साहित्‍य संघ’, ‘नागपूर आणि मराठवाडा साहित्‍य परिषद औरंगाबाद’ अशा ४ संस्‍थापक संस्‍था आहेत. प्रत्‍येक घटक संस्‍थेकडे महामंडळाचे व्‍यवस्‍थापकीय कार्यालय ३ वर्षांच्‍या कालावधीसाठी असते. मराठी भाषा, साहित्‍य आणि संस्‍कृती या क्षेत्रांत कार्य करणार्‍या संस्‍थांमध्‍ये एकसूत्रीपणा आणणे, मराठी भाषेचे अस्‍तित्‍व आणि संवर्धन यांसाठी कार्य करणे ही महामंडळाची प्रमुख उद्दिष्‍टे आहेत. साहित्‍य महामंडळाच्‍या वतीने आणि साहित्‍य संमेलनांमध्‍ये मराठीच्‍या संवर्धाच्‍या केवळ घोषणा होतात आणि वर्षभर नियमितपणे कोणतेच उपक्रम होतांना दिसत नाहीत. त्‍यामुळे सध्‍यातरी या साहित्‍य महामंडळाकडून विशेष असे कोणतेच कार्य घडतांना दिसत नसून ते एक पांढरा हत्ती बनलेले महामंडळ झाले आहे.

मुंबई-पुण्‍यासारख्‍या शहरात किती लोक शुद्ध मराठी बोलतात ? हा एक मोठा संशोधनाच विषय होईल. ‘मराठीचा अभिमान वृत्तपत्रे, साहित्‍य अशा प्रत्‍येक क्षेत्रातून घटत असून त्‍यावर नक्राश्रू ढाळण्‍यापलीकडे ही समेलने काही विशेष करत नाहीत’, असेच म्‍हणावे लागेल. अखिल भारतीय मराठी साहित्‍य मंडळातील पदाधिकारी ज्‍याप्रमाणे सांगतील, तसेच नियोजन मुख्‍य आयोजकांना करावे लागते. त्‍यामुळे ठरलेले साचेबद्ध कार्यक्रम आणि किचकट नियोजन यांमुळे स्‍थानिकांना विशेष काही करण्‍यासाठी वाव नसतो. सीमाप्रश्‍नावरून प्रत्‍येक संमेलनात घोषणाबाजी होते, लोकप्रतिनिधीही नेहमीप्रमाणे ‘आम्‍ही सीमावासियांच्‍या पाठीशी आहोत’, असे सांगून चमकोगिरी करतात; मात्र प्रश्‍न सोडवण्‍याच्‍या दृष्‍टीने संमेलन अथवा महामंडळ यांचे प्रयत्न तसे शून्‍यच म्‍हणावे लागतील.

वास्‍तविक परिसंवाद हे मराठी जनांसमवेत थेट संवाद साधण्‍याचे एक उत्तम साधन असते. यातून चांगले आणि अभ्‍यासू साहित्‍यिक, लेखक, कवी यांना बोलावून वैचारिक मंथन झाल्‍यास त्‍यातून काहीतरी साध्‍य होईल. सध्‍या मात्र परिसंवांदांची गुणवत्ता अत्‍यंत खालावलेली असल्‍याने पहिला दिवस झाल्‍यावर मुख्‍य मंडप आणि जवळपास सर्वच परिसंवादांमध्‍ये केवळ रिकाम्‍या आसंद्याच पहायला मिळतात. गर्दी वाढण्‍यासाठी चित्रपटगीते, लावणी, तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्‍याइतकी वाईट स्‍थिती साहित्‍य संमेलनांवर येत आहे !

वास्‍तविक साहित्‍यिकांना ‘सरस्‍वतीपुत्र’ म्‍हटले जाते; पण इथे मात्र गेल्‍या काही संमेलनांपासून सरस्‍वतीपूजनालाच डावलण्‍यात येत आहे. परिसंवादासाठी, तसेच ज्‍यांना पाहुणे म्‍हणून बोलावण्‍यात येते, त्‍यांनी त्‍यांच्‍या भाषणांमधून ‘महाराष्‍ट्र हा कसा पुरोगामी आहे ?’, हेच ठासून सांगण्‍याचा प्रयत्न केला. त्‍यामुळे या संमेलनात तरी किमान सरस्‍वतीपूजन घडावे, अशी अपेक्षा मराठीजन बाळगून आहेत.

संमेलनाचे ढिसाळ नियोजन !

वर्धा येथे होणार्‍या साहित्‍य संमेलनासाठी २२ जानेवारीपर्यंत राज्‍यशासनाकडून संमेलनासाठी घोषित केलेले ५० लाख रुपयांचे अनुदानच प्राप्‍त झाले नव्‍हते. संमेलन तोंडावर आले, तरी संमेलनाची निमंत्रणपत्रिका सिद्ध झाली नव्‍हती. खरे पहाता मंडळाकडील एकूण यंत्रणा आणि संमेलनाचा आवाका पहाता या निमंत्रणपत्रिका किमान ३ आठवडे अगोदर सिद्ध होऊन त्‍या मान्‍यवरांपर्यंत पोचणे अपेक्षित होते. निमंत्रणपत्रिकाच नसतील, तर येणार्‍यांनी त्‍यासाठी आरक्षण तरी कसे करायचे ? महामंडळाचा बहुतांश कारभार पुणे येथून चालतो. त्‍यामुळे महामंडळातील पदाधिकार्‍यांनी वर्धा येथून जाऊन प्रत्‍यक्षात किती माहिती घेतली असेल ?, यावर प्रश्‍नचिन्‍हच आहे.

मराठी भाषेला अद्याप अभिजात दर्जा मिळालेला नसणे, मराठी शाळांना पुरेसे अनुदान न मिळणे, शासकीय स्‍तरावर अजूनही म्‍हणावा असा अपेक्षित मराठीचा वापर वाढलेला नसणे, पुरेशा दर्जेदार-सृजनशील नवसाहित्‍य निर्मितीला प्रोत्‍साहन नसणे, मराठी भाषा भवन नसणे, मराठीचा वाचकवर्ग अल्‍प होणे यांसह अनेक समस्‍या सध्‍या साहित्‍य आणि मराठी भाषा यांच्‍यासमोर आहेत. त्‍यामुळे या प्रश्‍नांवरही संमेलनात सांगोपांग चर्चा होऊन त्‍यावर उपाययोजना काढण्‍याच्‍या दृष्‍टीने पावले टाकणे अपेक्षित आहे, तरच ‘इतक्‍या मोठ्या प्रमाणात व्‍यय करून भरवण्‍यात येणार्‍या संमेलनातून काहीतरी साध्‍य झाले’, असे म्‍हणता येईल ! तसे मंथन या संमेलनातून घडण्‍यासाठी सारस्‍वतांना श्री गणेश आणि श्री सरस्‍वतीदेवी सद़्‍बुद्धी देवो, हीच प्रार्थना !

ज्‍या संमेलनांमध्‍ये श्री सरस्‍वतीदेवीलाच नाकारले जात असेल, तेथे मराठीच्‍या उत्‍कर्षाची अपेक्षा काय ठेवणार ?