यंदा माऊलींच्या अश्वाचे गोल रिंगण सोहळ्याचे तप:पूर्ती वर्ष !

२७ जानेवारीला पहिला गोल रिंगण सोहळा !  

आषाढी वारीतील माऊलींच्या अश्वाचे गोल रिंगण : तप:पूर्ती वर्ष !

सोलापूर, २४ जानेवारी (वार्ता.) – माघवारी पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा २७ जानेवारी या दिवशी होणार असून आषाढी वारीतील माऊलींच्या अश्वाचे गोल रिंगण होणार आहे. हा सोहळा अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागांतील भाविक वारकरी माघवारीच्या निमित्त पंढरपूर येथे पायी जातात. त्या सर्व दिंडीतील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा मार्गस्थ होतो. यंदा रिंगण सोहळ्याचे तप:पूर्ती वर्ष असल्याने उपस्थित दिंडी प्रमुख आणि पालखी प्रमुख यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. अधिकाधिक भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.