गोहत्या थांबली, तर पृथ्वीवरील सर्व प्रश्‍न संपतील ! – तापी जिल्हा सत्र न्यायालय

तापी (गुजरात) जिल्हा सत्र न्यायालयाची स्पष्टोक्ती !

तापी (गुजरात) – गायीतून धर्माचा जन्म झाला असून गोहत्या थांबली, तर पृथ्वीवरील सर्व प्रश्‍न संपतील, असे मत तापी जिल्हा सत्र न्यायालयाने व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गायींची तस्करी करणार्‍या महंमद आमीन आरिफ अंजुम या २२ वर्षीय गोतस्कराला जन्मठेपेची शिक्षा सुनावतांना न्यायालयाने हे मत नोंदवले. जुलै २०२० मध्ये महाराष्ट्रातून एका ट्रकमधून १६ गायी आणि गोवंश घेऊन जात असतांना त्याला अटक करण्यात आली होती.

न्यायालयाने म्हटले की,

१. धर्माचा जन्म गायीतून झाला आहे; कारण धर्म वृषभच्या रूपात आहे आणि गायीच्या मुलाला वृषभ म्हणतात. गायीचे अस्तित्व संपले, तर हे ब्रह्मांडही संपेल. वेदांच्या सर्व ६ भागाची निर्मिती गायीमुळे झाली आहे. त्यामुळे गोहत्या अस्वीकार्य आहे.

२. वर्तमानामध्ये गोधन ७५ टक्के नष्ट झाले आहे आणि आता केवळ २५ टक्के गोधन शिल्लक राहिले आहे. एक वेळ अशी येईल की, लोक गायींचे चित्र काढणेच विसरतील.  स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात गोहत्या बंद झालेली नसून ती सर्वांत टोकाला पोचली आहे.

३. चिडचिड आणि संताप वाढत आहे. त्यामुळे आजचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यामागचे एकमेव कारण म्हणजे गोहत्या आहे. जोपर्यंत संपूर्णपणे गोहत्या बंद होत नाही, तोपर्यंत सात्त्विक जलवायूचा प्रभाव होणार नाही. गोहत्या आणि गोतस्करी या घटना सभ्य समाजासाठी लज्जास्पद आहेत.

४. गोरक्षण आणि गोपालन यांविषयी पुष्कळ चर्चा होते; मात्र प्रत्यक्ष त्या संदर्भात कृती होत नाही. विज्ञानानेही सिद्ध केले आहे की, गायीच्या शेणामुळे बनवण्यात आलेल्या घरांवर अणूबाँबमुळे निघालेल्या अतीनील किरणांचा कोणताही परिणाम होत नाही. तसेच गोमूत्राचा वापर अनेक आराजांवर उपचारासाठी केला जातो.

५. गाय केवळ प्राणी नाही, तर ती माता आहे. यामुळेच तिला गोमाता म्हटले जाते. गायी इतका कुणीही कृतज्ञ नाही. एक गाय ६८ कोटी पवित्र स्थाने आणि ३३ कोटी देवता असलेले जीवित ग्रह आहे.

.. त्या दिवशी पृथ्वीवरील सर्व प्रश्‍न संपतील आणि पृथ्वीचे कल्याण होईल ! 

गोहत्येविषयी सांगतांना न्यायाधिशांनी संस्कृत श्‍लोक सांगितला. तसेच अन्य २ श्‍लोकांचाही उल्लेख केला. या श्‍लोकांमध्ये म्हटले आहे की, जिथे गाय सुखी रहाते तिथे धन आणि संपत्ती मिळते. जिथे गाय दुःखी आहे, तेथून धन आणि संपत्ती जाते. गाय रुद्राची आई, वसुची मुलगी, अदितीपुत्रांची बहिण आणि ध्रुरूप अमृताचा खजिना आहे. ज्या दिवशी गायीच्या रक्ताचा एक थेंबही पृथ्वीवर पडणार नाही, त्या दिवशी पृथ्वीवरील सर्व प्रश्‍न संपतील आणि पृथ्वीचे कल्याण होईल.

संपादकीय भूमिका 

सरकारने भारतभर गोहत्याबंदी कायदा बनवून गोहत्या थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असेच हिंदूंना वाटते !