सनातन धर्मावर दृढ निष्ठा असणारे आणि विद्यार्थ्यांवर धर्माचरणाचे संस्कार करणारे प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ‘रुद्र प्रयाग विद्यालया’चे व्यवस्थापक श्री. सत्येंद्र द्विवेदी (वय ४२ वर्षे) !
‘प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ‘रुद्र प्रयाग विद्यालया’चे व्यवस्थापक श्री. सत्येंद्र द्विवेदी हे त्यांच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांवर हिंदु धर्मानुसार संस्कार करण्यासाठी चांगले प्रयत्न करतात’, अशी माहिती आम्हाला समजली होती. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही त्यांच्या विद्यालयात गेलो होतो. त्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. विद्यालयाच्या परिसरात आणि कार्यालयात देवतांच्या मूर्ती पाहून भाव जागृत होणे
आम्ही विद्यालयात प्रवेश केल्यावर प्रवेशद्वाराच्या जवळच सात्त्विक श्री गणेशमूर्ती पाहून आमचा भाव जागृत झाला आणि आम्हा सर्वांचे हात नमस्कार करण्यासाठी आपोआप जोडले गेले. श्री. सत्येंद्र द्विवेदी यांच्या कार्यालयात प्रवेश केल्यानंतर तेथेही देवतांच्या मूर्ती पाहून आमचे मन पुष्कळ शांत झाले.
२. श्री. सत्येंद्र द्विवेदी यांची झालेली भेट आणि सनातन धर्म, परात्पर गुरु डॉक्टर अन् सनातन संस्थेचे कार्य यांप्रती त्यांनी व्यक्त केलेला आदर !
२ अ. ‘सनातन धर्माच्या रक्षणाचे कार्य करणे’, हीच मोठी ईश्वरभक्ती ! : श्री. सत्येंद्र द्विवेदी आम्हाला भेटायला आले. आम्हाला पाहून ते म्हणाले, ‘‘ईश्वरानेच तुम्हाला येथे पाठवले आहे. ‘आपण सनातन धर्माच्या रक्षणाचे कार्य करत आहात, ही सर्वांत मोठी ईश्वरभक्ती आहे’, असे मला वाटते.’’
२ आ. ‘भगवंत परात्पर गुरु डॉक्टरांच्या माध्यमातून कार्य करत आहे’, असे सांगून त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करणे : आम्ही त्यांना सनातन संस्थेचे माहितीपत्रक (ब्रोशर) दाखवून सर्व कार्य सांगितले. ते म्हणाले, ‘‘साक्षात् भगवंतच आपल्या गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) माध्यमातून कार्य करत आहे. त्यांचे दर्शन घेण्यासाठी मला गोवा येथे येण्याची इच्छा आहे.’’
आश्रमाच्या माहितीपत्रकातील ‘अहं निर्मूलनासाठी फलकावर चुका लिहिणारे साधक’, हा विषय त्यांनी अगदी लक्ष देऊन वाचला आणि म्हणाले, ‘‘आपला अहं न्यून व्हावा, यासाठीच ईश्वर आपल्याला शरण जायला सांगत असतो. ‘आपले गुरुदेव तुमच्याकडून योग्य तीच साधना करून घेत आहेत’, हे पाहून मला पुष्कळ चांगले वाटले.’’
२ इ. तन, मन आणि धन यांसह कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवणे : आम्ही त्यांना संस्थेचे अन्य कार्य सांगितले. तेव्हा ते पुष्कळच प्रभावित झाले. ते म्हणाले, ‘‘मी तन, मन आणि धन यांसह या कार्यात सहभागी होऊ इच्छितो. मला गोवा येथील तुमच्या आश्रमात येण्याची पुष्कळ इच्छा आहे.’’
३. ‘हिंदु धर्मानुसार आचरण व्हावे’, यासाठी आग्रही असलेले श्री. द्विवेदी !
श्री. द्विवेदी विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला कपाळावर टिळा लावायला सांगतात. विद्यालयाला भेट देण्यासाठी कुणी अतिथी आले, तर ते ‘अतिथींना नमस्कार करा’, असे विद्यार्थ्यांना सांगतात. त्यांच्या विद्यालयात कुणी प्रवेश घेवो किंवा न घेवो, ‘हिंदु धर्मानुसार आचरण व्हावे’, यासाठी ते नेहमीच आग्रही असतात.
४. श्री. द्विवेदी यांचा देवाप्रती भाव
४ अ. प्रत्येक एकादशीला वृंदावन आणि मथुरा येथे जाऊन प्रदक्षिणा घालणे : श्री. द्विवेदी प्रत्येक एकादशीला वृंदावन आणि मथुरा येथे जाऊन नियमित प्रदक्षिणा घालतात. कितीही मोठी अडचण असली, तरीही ते कधीच प्रदक्षिणा घालण्याचे चुकवत नाहीत.
४ आ. भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्याप्रती भाव ! : ‘भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी हेच ‘रुद्र प्रयाग विद्यालया’चे मालक आहेत’, असा त्यांचा भाव आहे. ते भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या नावाने गोशाळा अन् संतसेवा यांसाठी नियमित अर्पण करतात.
४ इ. ईश्वराला समर्पित होऊन कार्य करतांना ‘ईश्वर परिवाराचे रक्षण करत आहे’, याची अनुभूती घेणारे श्री. द्विवेदी ! : श्री. द्विवेदी म्हणाले, ‘‘आपण ईश्वराला जेवढे अधिक समर्पित होऊ, तेवढे अधिक ईश्वर आपले आणि आपल्या परिवाराचे दायित्व घेऊन रक्षण करतो’, हे मी अनुभवत आहे. मी विद्यालयाचे कार्य विशेष पहात नसूनही येथे प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या आपोआप वाढत आहे.’’
– श्री. गुरुराज प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), वाराणसी, उत्तरप्रदेश. (१३.२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |