‘लव्‍ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांविरोधात सहस्रावधी हिंदू रस्‍त्‍यावर उतरणार ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

२२ जानेवारी या दिवशी घाटकोपर येथे हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

डावीकडून रवींद्र नलावडे, वैद्य डॉ. उदय धुरी, तानाजी हांडे

मुंबई, २० जानेवारी (वार्ता.) – मुंबईसह देशभरात चालू असलेल्‍या लव्‍ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतर यांच्‍या घटना रोखण्‍यासाठी कठोर कायदे लागू करावेत, या मागण्‍यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांच्‍या वतीने २२ जानेवारी या दिवशी घाटकोपर येथे भव्‍य ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ काढण्‍यात येणार आहे. घाटकोपर (पश्‍चिम) येथील सर्वोदय हॉस्‍पिटल चौक (एल्.बी.एस्. मार्ग) येथून दुपारी ४.३० वाजता मोर्च्‍याला प्रारंभ होणार आहे. या मोर्च्‍यात सहभागी होण्‍यासाठी सहस्रावधी हिंदू रस्‍त्‍यावर उतरणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्‍ते डॉ. उदय धुरी यांनी दिली. याविषयी माहिती देण्‍यासाठी २० जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्‍यात आलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी घाटकोपर येथील भारत सोसायटी रहिवासी संघाचे अध्‍यक्ष श्री. तानाजी हांडे, श्री. रवींद्र नलावडे, सौ. सीमा वाईकर आणि सौ. सविता गलांडे उपस्‍थित होत्‍या.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्‍ह्यांतून विविध संप्रदायाचे प्रमुख, हिंदू संघटना आणि विविध ज्ञाती समाज या मोर्च्‍यामध्‍ये सहभागी होणार आहेत. विक्रोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात मोर्च्‍याचे रूपांतर सभेत होईल.

हिंदु युवती श्रद्धा वालकर हिचे लव्‍ह जिहादी आफताबने ३५ तुकडे करून तिची निर्घृण हत्‍या केली. मुंबईतील टिळकनगर येथील रूपाली चंदनशिवे, धारावी येथील यथोधरा खटिक, कोपरखैरणे येथील उर्वशी वैष्‍णव, अभिनेत्री तुनिषा शर्मा यांसारख्‍या अनेक तरुणी लव्‍ह जिहादला बळी पडल्‍या असून त्‍यांना स्‍वत:चा जीव गमवावा लागला. अशा असंख्‍य घटना यापूर्वीही घडल्‍या आहेत. आता जनतेमध्‍येही ‘लव्‍ह जिहाद’विषयी रोष व्‍यक्‍त होत आहे. महाराष्‍ट्रात २० सहस्र ६३० मुली आणि महिला गायब असण्‍याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. देशातील ११ राज्‍यांच्‍या धर्तीवर महाराष्‍ट्रातही ‘लव्‍ह जिहाद’ विरोधी कायदा तातडीने लागू करण्‍याची आमची मागणी आहे, असे या वेळी डॉ. उदय धुरी यांनी सांगितले.

विशेष

१. ‘मी मोर्च्‍यात सहभागी होत आहे, तुम्‍हीही सहभागी व्‍हा !’ असे आवाहन करणारे ‘सेल्‍फी पॉईंट’ मोर्च्‍यामार्गात गर्दीच्‍या ठिकाणी उभारण्‍यात येणार आहेत. या ठिकाणी स्‍वाक्षरी अभियानही राबवण्‍यात येणार आहे.

२. सामाजिक माध्‍यमांतून मोर्च्‍याचा प्रसार चालू आहे. हिंदूंना मोर्च्‍यात सहभागी होण्‍यासाठी ८०८०२ ०८९५८ या भ्रमणभाषवर संपर्क करता येणार आहे.

मोर्च्‍याद्वारे धर्मांतरबंदी कायद्याची मागणी करणार ! – डॉ. उदय धुरी

मालाड येथील मालवणी भागात अनधिकृत मशिदी उभारण्‍यात आल्‍या आहेत. धर्मांधांचा दबाव, छळ, मारहाण, युवतींची छेडछाड यांमुळे तेथील शेकडो हिंदु कुटुंबांनी मागील १० वर्षांत पलायन केले आहे. देशात अनेक ठिकाणी हिंदूंना बळजोरीने पलायन करण्‍यास भाग पाडले जात आहे. वक्‍फ मंडळही सरकारी आणि खासगी भूमी हडप करत आहे. हा काळा कायदासुद्धा रहित करणे आवश्‍यक आहे. महाराष्‍ट्रातील अनेक गडदुर्गांवर उभारण्‍यात आलेली अनधिकृत बांधकामे जमीनदोस्‍त करून त्‍यांना इस्‍लामी अतिक्रमणापासून मुक्‍त केले पाहिजे. देशात छळ, बळ, कपट यांद्वारे हिंदूंचे वाढते धर्मांतर रोखले जावे, यासाठी धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्‍याची मागणी आम्‍ही या मोर्च्‍यामध्‍ये करणार आहोत. ‘आज नाही, तर कधीच नाही’, असा निर्धार करून अधिकाधिक हिंदू मोर्च्‍यात सहभागी होणार आहेत.

घाटकोपर येथील अनधिकृत मदरशाविरोधात मोर्चा काढला ! – रवींद्र नलावडे

घाटकोपर येथील ‘लँड जिहाद’च्‍या विरोधात काढण्‍यात आलेल्‍या मोर्च्‍यासाठी पुढाकार घेणारे येथील रहिवासी श्री. रवींद्र नलावडे म्‍हणाले, ‘‘घाटकोपर (पश्‍चिम) येथील असल्‍फा व्‍हिलेजमधील भारत सोसायटी रहिवासी संघ येथे अनधिकृत मदरसा बांधण्‍यात आला आहे. मागील आठवड्यात या विरोधात आम्‍ही स्‍थानिक नागरिकांनी भव्‍य मोर्चा काढला. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करून हे अनधिकृत बांधकाम तोडावे, अशी आमची मागणी आहे.’’