न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न त्यागपत्र देणार

पुढील निवडणूकही लढवणार नसल्याची घोषणा

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न

वेलिंग्टन (न्यूझीलंड) – न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी त्यागपत्र देण्याची आणि यापुढे निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. ७ फेब्रुवारीपर्यंत त्या त्यागपत्र देणार आहेत. न्यूझीलंडमध्ये यावर्षी ऑक्टोबर मासामध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

पक्षाच्या बैठकीत अर्डर्न म्हणाल्या की, आता मी निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. माझ्यात आणखी ४ वर्षे नेतृत्व करण्याचे धाडस नाही. उन्हाळ्याच्या सुटीत मी विचार केली की, माझ्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची शक्ती आहे का ? मला याचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मी त्यागपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान म्हणून साडेपाच वर्षे खडतर होती. राजकीय नेता हादेखील शेवटी माणूसच आहे. जोपर्यंत आमच्यावर दायित्व होते, तोपर्यंत ते चोखपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टी आम्ही केल्या. खरा नेता तो आहे, ज्याला पद सोडण्याची योग्य वेळ ठाऊक असते; मात्र याचा अर्थ ‘मी दुर्बल आहे’, असा मुळीच नाही.