काणकोण रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांवबण्यासाठी आंदोलन

काणकोण – लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या काणकोण रेल्वेस्थानकावर थांबवण्यात याव्यात, यासाठी १३ जानेवारी या दिवशी सकाळी ९.३० वाजल्यापासून स्वाभिमानी जागृत काणकोणकर, ज्येष्ठ नागरिक मंच, जनसेना आदी संघटनांच्या वतीने काणकोण रेल्वेस्थानकावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काणकोणचे मामलेदार मनोज कोरगावकर यांनी या वेळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मडगाव येथील रेल्वे अधिकारी सचिन नारकर यांच्याशी संपर्क साधला आणि उपस्थित आंदोलनकर्त्यांना आवश्यक माहिती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. नारकर यांनी काणकोण रेल्वेस्थानकावर येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. रेल्वे अधिकारी सचिन नारकर यांनी ते वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून १९ जानेवारीला काणकोण येथे येऊन एक बैठक घेणार  असल्याचे उपस्थित आंदोलनकर्त्यांना सांगितले.

उपस्थित आंदोलनकर्ते

त्यामुळे सध्या हे आंदोलन १९ जानेवारीपर्यंत स्थगित ठेवण्यात आलेले असले, तरी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना काणकोण रेल्वेस्थानकावर थांबा मिळेपर्यंत हा लढा चालूच रहाणार असल्याचे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस फौजफाटाही ठेवण्यात आला होता.