शासन म्हादई प्रश्नावर अभ्यास न करता लवादासमोर जाण्याची चूक करत आहे ! – पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर

माशेल येथे झालेल्या सार्वजनिक सभेला संबोधित करतांना पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर

पणजी, १३ जानेवारी (वार्ता.) – गोवा शासन म्हादई प्रश्नावर अभ्यास न करता म्हादई पाणी लवादासमोर जाण्याची चूक करत आहे, असे वक्तव्य पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी म्हादई प्रश्नावर माशेल येथे झालेल्या सार्वजनिक सभेत केले.

ते म्हणाले, ‘‘म्हादईसंबंधीचा लढा जिंकायचा असेल, तर म्हादई नदीसंबंधी शास्त्रीय अभ्यास सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवावा लागेल. भूतकाळात कर्नाटक सरकारने ‘म्हादई नदीच्या पात्रातील पुष्कळ पाणी अरबी समुद्रात जाते’, असा दावा केंद्राकडे केला होता. हा दावा केल्यानंतर केंद्रीय जल मंडळाने अभ्यास केल्यानंतर म्हादई नदीत १८८ टीएमसी फूट पाणी आहे, अशी चुकीची माहिती दिली. या चुकीच्या माहितीमुळे आता आमच्यासमोर समस्या निर्माण झाली आहे.

(सौजन्य : Goan Reporter News) 

गोव्याने पाणीवाटप प्रश्न म्हादई लवादासमोर नेण्याविषयी विरोध करणारे लेख मी प्रसिद्ध केले. शासनाने लवाद कायदा वाचण्याची आवश्यकता होती; परंतु त्या वेळी माझे कुणी ऐकले नाही. आता लवादाने त्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर वर्ष १९९९ मध्ये म्हादई आणि नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य घोषित झाल्यानंतर म्हादईचे पाणी वळवण्याचे थांबवण्यासाठी त्यांचा ढालीसारखा उपयोग करण्यात गोवा सरकार अपयशी ठरले आहे. याविषयी आमदारांना माहिती देण्यासाठी २ दिवसांच्या विधानसभा अधिवेशनाची आवश्यकता आहे.’’

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा