‘म्हादई वाचवा’ चळवळीच्या अंतर्गत विर्डी, सांखळी येथे १६ जानेवारीला होणार सभा

म्हादई जलवाटप तंटा

‘गोवा वाचवा म्हादई वाचवा’ (चित्रावर क्लिक करा) (सौजन्य : तरुण भारत)

सांखळी, १३ जानेवारी (वार्ता.) – ‘गोवा वाचवा म्हादई वाचवा’ आघाडीच्या वतीने विर्डी, सांखळी येथे १६ जानेवारी २०२३ या दिवशी सभा घेण्यात येणार असल्याची घोषणा १३ जानेवारीला पणजी येथील आझाद मैदानात करण्यात आली. ही सभा पूर्वी सांखळी येथे होणार होती; परंतु सांखळी पालिकेने १६ जानेवारी हा सांखळीच्या बाजाराचा दिवस असल्याचे कारण सांगून सभेला अनुमती नाकारली होती. या पार्श्वभूमीवर सभेच्या स्थळात पालट करण्यात आला असून ही बैठक विर्डी आमोणा पुलाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात घेण्यात येणार आहे.

कर्नाटक सरकारने म्हादईचे पाणी वळवल्याचा निषेध करण्यासाठी गोव्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन ‘गोवा वाचवा म्हादई वाचवा’ ही आघाडी स्थापन केली आहे. ‘देहली येथे गेलेले शासनाचे शिष्टमंडळ ‘आंदोलन करणार्‍यांचा आवाज दाबून टाकावा’, अशी सूचना गृहमंत्र्यांकडून घेऊन आले आहेत’, असा आरोप म्हादईसाठी आंदोलन करणार्‍यांनी केला आहे. म्हादई प्रश्नावर लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्यास सर्वोच्च न्यायालयातील गोव्याविषयीच्या खटल्याला बळकटी येईल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

मुख्य अधिकार्‍यांनी दबावाखाली येऊन सभेची अनुमती रहित केल्याचा नगराध्यक्षांचा दावा

सांखळी –  नगरपालिकेच्या मुख्य अधिकार्‍याने दबावाखाली येऊन १६ जानेवारीला होणार्‍या ‘म्हादई वाचवा’ सभेची अनुमती रहित केली’, असा दावा सांखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी केला आहे.

Rajesh Sawal 
I welcome all my Goans brother and sisters to my village – Virdi …pls joint us in large no to save our mother 

ते म्हणाले, ‘‘ही सभा घेण्यास नगरपालिकेला कोणतीच समस्या नव्हती. कुणाच्या दबावाखाली येऊन त्यांनी ही अनुमती रहित केली, तेच आम्हाला कळत नाही. मुख्य अधिकार्‍याने लोकांना याविषयीचे स्पष्टीकरण द्यावे.’’

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा