‘चांगल्या हवेचे शहर’, अशी काही वर्षांपूर्वी असलेली पुण्याची ओळख आता पालटत चालली आहे. पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खराब नोंदवण्यात आला असून प्रदूषित शहरांच्या सूचीत त्याचे नावही जोडले गेले आहे, हे पुणेकर आणि प्रशासन यांच्यासाठी चिंताजनक अन् गंभीर आहे. धुलिकणांचे प्रमाण वाढले असून ‘पी.एम्. २.५’ची मात्राही अधिक आहे. एकूणच आरोग्याच्या दृष्टीने पुण्यातील हवेची पातळी धोकादायक बनत आहे. एवढेच नव्हे, तर पुण्यासमवेत भारतातील अनेक शहरांची स्थितीही अशीच आहे. ‘भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटल्यानंतरही जनतेला शुद्ध हवा मिळत नाही, हे एक प्रकारे प्रशासनाचे अपयश नव्हे का ?’, असा विचार कुणाच्याही मनात आल्यास चूक ते काय ?
बांधकाम प्रकल्प, वृक्षतोड, विकासकामे आणि अनियंत्रित वाहतूक यांमुळे हवेतील सूक्ष्म, अतीसूक्ष्म धूलिकण यांमध्ये वाढ झाली आहे. अतीसूक्ष्म धूलिकण श्वसनावाटे थेट फुफ्फुसापर्यंत जात असल्याने हवेतील त्यांचे वाढते प्रमाण नागरिकांच्या आरोग्यासाठी त्रासदायक होत आहे. हवेची गुणवत्ता वाईट पातळीवर असतांना अधिक काळ घराबाहेर रहाणे अपायकारक ठरते. ‘हवेचे प्रदूषण माणसाच्या स्मरणशक्तीला बाधा आणते, त्यांना वैफल्यग्रस्त करते’, असे ‘ओहियो स्टेट विद्यापिठा’च्या शास्त्रज्ञांनी शोधले आहे. प्रदूषित हवेत श्वास घेतल्याने माणसाच्या मेंदूतील जडणघडणीवर विपरीत परिणाम होतो. माणसाच्या वाढत्या चंगळवादामुळे, तसेच हिंदु संस्कृती आणि त्या अनुषंगाने प्रचलित प्रथा-परंपरा यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने हवेचे प्रदूषण होत आहे अन् आपण स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत.
पूर्वीच्या काळी देशात विश्वकल्याणासाठी विविध यज्ञ केले जात असत. आज देशात यज्ञांविषयी उपेक्षेने बोलले जात असले, तरी ‘नासा’सारख्या जगन्मान्य संशोधन संस्थेने यज्ञांविषयी संशोधन केले आहे. यानुसार यज्ञामुळे त्या परिसरातील विषाणू आणि जिवाणू नष्ट होऊन वातावरणाची शुद्धी होते. पूर्वीच्या काळी अग्निहोत्रालाही बरेच महत्त्व होते, आज त्याकडेही कुचेष्टेने बघितले जात आहे. त्यामुळे याचा विचारही अग्रक्रमाने व्हायला हवा. प्रशासनाने इच्छाशक्ती वाढवून शहरातील प्रदूषण वाढण्यामागील नेमकी कारणे शोधून त्यावर कार्यवाही करणे, प्रदूषकांच्या स्रोतांवर काम करणे अशा उपाययोजना युद्धस्तरावर केल्या, तर हवेची गुणवत्ता सुधारणे अशक्य नाही !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे