निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १३१
‘पुण्याचे सुप्रसिद्ध कै. वैद्य प.य. वैद्य खडीवाले यांचे काही वर्षांपूर्वी वयाच्या साधारण ८६ व्या वर्षी निधन झाले; परंतु त्या वयात ते तरुणांपेक्षाही अधिक ऊर्जेने कार्य करायचे. ते नियमितपणे अंगाला तेल लावत असत आणि हेच त्यांच्या कार्यक्षमतेमागील रहस्य होते. ते विविध कार्यक्रमांमधून लोकांना अंगाला नियमित तेल लावण्याचे महत्त्व पटवून देत असत. वेळप्रसंगी ते स्वतः कृती करूनही दाखवत असत.
१०० वर्षे निरोगी जीवनासाठी प्रतिदिन सकाळी अंघोळीपूर्वी अंगाला तेल लावावे. हे शक्य न झाल्यास आठवड्यातून दोनदा आणि तेही शक्य नसेल, तर आठवड्यातून एकदा तरी प्रत्येकाने सर्वांगाला तेल लावावेच. यासाठी कोणतेही खाद्य तेल चालते. तेल लावणे आणि अंघोळ यांमध्ये न्यूनतम १५ मिनिटांचे अंतर असावे. भरल्या पोटी, म्हणजे खाऊन तेल लावू नये. शक्य असल्यास व्यायामापूर्वी तेल लावावे. तेल लावून व्यायाम केल्याने शरीर बळकट होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०२३)