अंजली चारचाकीखाली अडकल्याचे ठाऊक होते ! – आरोपींची स्वीकृती

देहली येथील अपघाताचे प्रकरण

नवी देहली – देहलीतील कंझावाला अपघात प्रकरणात मृत तरुणी अंजली ही चारचाकी गाडीखाली अडकली होती, हे आम्हाला ठाऊक होते, अशी स्वीकृती अटक करण्यात आलेल्या आरोपींना आता दिली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री अंजली हिच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिली होती. यात अंजली खाली पडल्यावर ती या गाडीच्या खाली अडकली आणि नंतर १२ किलोमीटर फरफटत गेल्याने तिचा मृत्यू झाला होता.


या अपघाताच्या वेळी अंजलीसमवेत तिची मैत्रीण निधी ही होती. अपघातानंतर ती पळून गेली होती. तिला २ वर्षांपूर्वी गांजा या अमली पदार्थाच्या तस्करीच्या प्रकरणात अटक झाली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. अपघाताच्या प्रकरणी आतापर्यंत मनोज मित्तल, दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा, मिथुन आणि आशुतोष यांना अटक करण्यात आली आहे, तर अंकुश खन्ना याला जामीन मिळाला आहे.

संपादकीय भूमिका

एका तरुणीची अशा प्रकारे अमानुष हत्या करणार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे !