आम्ही येत आहोत !

पाकिस्तानला ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ची धमकी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तान आणि ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेमध्ये सशस्त्र संघर्ष चालू आहे. या पार्श्वभूमीवर या संघटनेकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यात पाक संसद दिसत आहे. एका व्यक्तीच्या हातात कागदाचा तुकडा दिसत आहे. त्यावर इंग्रजी आणि उर्दू भाषेत ‘आम्ही येत आहोत’, असा संदेश लिहिला आहे. या वेळी ही व्यक्ती पाकच्या संसदेकडे निर्देश करत आहे.

हा व्हिडिओ इस्लामाबादच्या मारगल्ला हिल्सवर बनवण्यात आला आहे. व्हिडिओत व्हिडिओ बनवणार्‍या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. पाकच्या ‘डॉन न्यूज’ संकेतस्थळाने ‘पोलिसांनी हा व्हिडिओ बनवणार्‍याला अटक केली आहे’, असा दावा केला आहे.

पाकच्या खैबर पख्तूनख्वामध्ये टीटीपीचे ७ ते १० सहस्र आतंकवादी !

पाकचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी ‘डॉन’ दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले की, अफगाणिस्तानला लागून असणार्‍या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये टीटीपीचे ७ ते १० सहस्र आतंकवादी लपलेले आहेत. यातील काही आतंकवाद्यांनी टीटीपीचे काम सोडले होते; पण गत काही दिवसांत ते पुन्हा सक्रीय झाले आहेत. या आतंकवाद्यांना त्यांच्या २५ सहस्र कुटुंबियांचीही साथ मिळत आहे. तसेच काही स्थानिकही या आतंकवाद्यांच्या साहाय्याने खंडणी उकळत आहेत. ब्लॅकमेल करत आहेत.