सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांची चित्रे आणि मूर्ती यांची रचना पालटण्यापूर्वी अन् पालटल्यानंतर सनातनचे साधक आधुनिक वैद्य भिकाजी भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘माझ्याकडे काही वर्षांपासून सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील सायंकाळची आरती करण्याची सेवा आहे. त्यामुळे मी प्रतिदिन ध्यानमंदिरात सेवेसाठी जात असतो. तेव्हाचे ध्यानमंदिर आणि आता रचना पालटलेले ध्यानमंदिर यांच्या संदर्भात मला पुढील सूत्रे जाणवली आणि पुढील अनुभूती आल्या.

ध्यानमंदिरातील पूर्वीची रचना

१. पूर्वीच्या ध्यानमंदिराच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

पूर्वी ध्यानमंदिरातील रचना (छायाचित्र क्र. १) पाहून तेथे सात्त्विकता जाणवत होती; परंतु देवतांची चित्रे आणि मूर्ती यांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांच्या रचनेतून निर्माण होणारी स्पंदने एकमेकांत मिसळत होती. त्यामुळे मला ती स्पंदने चांगली वाटत नव्हती आणि मनाला आनंदही जाणवत नव्हता. देवतांच्या मूर्तींची मांडणी करतांना त्यांची उंची न्यून किंवा अधिक असल्यामुळे त्यांना पाहून माझे मन एकाग्र होत नव्हते. सर्व देवतांच्या मूर्ती सात्त्विकच होत्या; परंतु त्यांच्या रचनेकडे पाहून चांगले वाटत नव्हते आणि मनाला शांती जाणवत नव्हती. याचे कारण मला तेव्हा समजले नाही.

ध्यानमंदिरातील नवीन रचना

२. आधीची रचना पालटून नवीन रचना केलेल्या ध्यानमंदिराच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

आता ध्यानमंदिरातील देवतांची चित्रे आणि मूर्ती यांची संख्या न्यून करून त्यांची रचना सात्त्विक पद्धतीने केली आहे. त्यामुळे नवीन पालटलेल्या रचनेतील (छायाचित्र क्र. २) ध्यानमंदिरात आरती करण्यासाठी गेल्यावर मला चांगले वाटले. नंतर मी देवतांच्या चित्रांकडे आणि श्रीमत् परमहंस चंद्रशेखरानंद, प.पू. अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपरंपरेतील छायाचित्रांकडे पाहिल्यावर माझे मन चटकन एकाग्र झाले, माझ्या मनाला आनंद आणि शांती जाणवली. ‘ध्यानमंदिरातील नवीन रचनेकडे पहातच रहावे’, असे मला वाटले. देवतांच्या चित्रांच्या डाव्या बाजूला असलेली पंचमुखी हनुमानाची संगमरवरी मूर्ती आणि उजव्या बाजूला श्रीदुर्गादेवीची सिंहावर आरूढ झालेली पितळी मूर्ती पाहून माझ्याकडे दोन्ही बाजूने चांगल्या शक्तीचा प्रवाह येतांना जाणवला.

आधुनिक वैद्य (डॉ.) भिकाजी भोसले

३. ध्यानमंदिराच्या रचनेच्या संदर्भात वरील अनुभूती येण्यामागील कार्यकारणभाव

मला ‘ध्यानमंदिरातील पालटलेल्या रचनेसंदर्भात अशा अनुभूती येण्यामागे काय कारण असावे ?’, असा विचार माझ्या मनात आल्यावर मला असे जाणवले की, सर्वांत वरील रांगेत ठेवलेली गुरुपरंपरेतील परात्पर गुरूंची छायाचित्रे एकाच मापाची आहेत, त्यांची रंगसंगती आणि रचनाही एकसारखी असल्यामुळे त्यांच्याकडे पाहून मला पुष्कळ चैतन्य जाणवले अन् मनाला शांती लाभली. त्यांच्या खालच्या रांगेतील सनातन-निर्मित अष्टदेवतांची सात्त्विक चित्रेसुद्धा समान आकाराची असल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये समान अंतर असल्यामुळे त्यांच्याकडे पाहून मनाला चांगले वाटते. यावरून ‘देवघरात देवतांची चित्रे किंवा मूर्ती यांची कमीत कमी संख्या असेल आणि त्यांची रचना योग्य प्रकारे केलेली असेल, तर देवघरातून पुष्कळ प्रमाणात चांगली स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे त्यांच्याकडे पहातांना मनाला आनंद आणि शांती यांची अनुभूती येते’, हे सूत्र मला पालटलेल्या रचनेतून शिकायला मिळाले. ध्यानमंदिरात मध्यभागी गुरुपरंपरेतील परात्पर गुरूंची छायाचित्रे, त्यांच्या खालील रांगेत देवतांची चित्रे आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना समान उंचीच्या देवतांच्या मूर्ती (एका बाजूला पंचमुखी हनुमानाची संगमरवरी मूर्ती आणि दुसर्‍या बाजूला श्रीदुर्गादेवीची पितळी मूर्ती) ठेवून नवीन रचना केलेली आहे. ही नवीन रचना दोन्ही बाजूला एकसारखी केलेली असल्यामुळे या रचनेतून पुष्कळ चांगली स्पंदने येतात, मन लवकर एकाग्र होते आणि मनाला शांती मिळते’, असे मला जाणवले. (पालटलेल्या रचनेत प.पू.भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राखाली त्यांच्या पादुका असून त्या पादुकांच्या खाली परात्पर गुरु डॉक्टरांच्या पादुका ठेवल्या आहेत. – संकलक)

४. शिकायला मिळालेले सूत्र

‘केवळ देवतांची चित्रे किंवा मूर्ती सात्त्विक असून उपयोगाचे नाही, तर त्यांची संख्या अल्प असणे आणि त्यांची मांडणी (रचना) योग्य आणि सात्त्विक असणे किती महत्त्वाचे आहे’, हे सूत्र मला ध्यानमंदिरातील पालटलेल्या नवीन रचनेतून शिकायला मिळाले. यासाठी मी परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– आधुनिक वैद्य भिकाजी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक