बांगलादेशात पैगंबर यांच्या कथित अवमानावरून हिंदु संघटनेच्या नेत्याला ७ वर्षांचा कारावास !

  • हिंदूंच्या धर्मांतराचा करत होते विरोध !

  • बनावट फेसबुक खाते निर्माण करून त्याद्वारे पैगंबरांचा अवमान करणारे लिखाण प्रसारित करण्यात आल्याचा हिंदु नेत्याचा आरोप !

बांगलादेशातील ‘जातिया हिंदु महाजोते’ या हिंदु संघटनेचे नेते राकेश रॉय

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील ‘जातिया हिंदु महाजोते’ या हिंदु संघटनेचे नेते राकेश रॉय यांना महंमद पैगंबर यांच कथित अवमान केल्याच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची आणि १ लाख टका (८० सहस्र रुपये) दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वर्ष २०१७ मध्ये फेसबुकवरून त्यांनी पैगंबर यांचा अवमान केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्या वेळी त्यांच्या विरोधात देशभरात निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर रॉय यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. रॉय यांचे अधिवक्ता इश्तियाक अहमद चौधरी यांनी, ‘या शिक्षेच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत’, असे सांगितले.

राकेश रॉय यांच्या म्हणण्यानुसार, ‘वर्ष २०१७ मध्ये अब्दुल अजीज नावाची व्यक्ती जाकीगंज या भागात हिंदूंचे धर्मांतर करत होती. याचा विरोध केला असता काही लोकांनी माझ्या नावाने बनावट फेसबुक खाते बनवून त्याद्वारे पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण केले आणि नंतर माझ्या अटकेची मागणी केली.’

संपादकीय भूमिका

इस्लामी देशांत हिंदूंच्या धर्मांतराचा विरोध करणार्‍यांना एक तर ठार केले जाते किंवा त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते, हेच ही घटना स्पष्ट करते !