१. प्रवासामुळे जागरण होऊन पुष्कळ थकवा आलेला असतांना पू. वामन यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या चैतन्यमय अस्तित्वाने शारीरिक त्रास न्यून होणे
‘महालक्ष्मी (गौरी-गणपति) सोहळ्यानिमित्त ४ ते ८.९.२०२२ असे ५ दिवस मी गोवा येथे मुक्कामी होतो. मी आणि माझे मोठे बंधू ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक राजंदेकर (वय ८० वर्षे) ४.९.२०२२ या दिवशी ‘गोवा एक्सप्रेस’ने गोवा येथे पोचलो. प्रवासात जागरण झाले असल्यामुळे मी पुष्कळ दमलो होतो आणि माझे अंग दुखत होते. आम्हा दोघांना थकवाही जाणवत होता. आम्ही आमचा पुतण्या श्री. अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन राजंदेकर यांचे वडील, वय ३९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के) आणि सौ. मानसी (सून आणि पू. वामन राजंदेकर यांची आई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्या घरी पोचलो. लगेचच पू. वामन आमच्याजवळ येऊन बसले. मी त्यांना बर्याच दिवसांनी बघत होतो. मला त्यांच्या अस्तित्वाचा परिणाम लगेच जाणवला. त्यांच्यातील चैतन्यामुळे आम्हाला पुष्कळ चांगले वाटू लागले. मी आणि माझे बंधू श्री. विनायक यांची स्थिती पू. वामन यांच्या लक्षात आली असावी; कारण ते बराच वेळ आमच्याशी खेळत होते. त्यांच्यामुळे मला आध्यात्मिक लाभ होत होता. अध्र्या घंट्यातच माझा त्रास न्यून झाला. तेव्हा लगेच पू. वामन तेथून निघून गेले.
२. नाशिक येथे ३ घंटे रेल्वे थांबणे, गाडीत दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत असतांना पू. वामन यांच्या छायाचित्राकडे गाडीतील मुलगी आकृष्ट होणे आणि तिच्या मनात साधनेविषयी जिज्ञासा उत्पन्न होणे
८.९.२०२२ या दिवशी ‘मडगाव-नागपूर’ रेल्वेने आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आगगाडी नाशिक येथे आल्यावर ती बाजूच्या ‘लाईन’वर बराच वेळ थांबणार होती; म्हणून मी पू. वामन यांचा लेख असलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक वाचू लागलो. बराच वेळ झाल्यानंतर माझ्या लक्षात आले की, माझ्या समोरच्या वरच्या आसनावर ‘बर्थ’वर बसलेली मुलगी पू. वामन यांचे छायाचित्र पाहून त्याकडे आकृष्ट झाली आहे.
तिने जिज्ञासेने विचारपूस केली आणि ‘या सुंदर मुलाचे (पू. वामन यांचे) छायाचित्र मला देता का ?’, अशी विचारणाही केली. तिच्या बोलण्यातून मधून-मधून ‘दैवी बालक’ असा उल्लेख होत होता. मी तिला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक दिला. ३ घंटे आमची गाडी त्याच स्थानकात उभी होती. तेवढ्या वेळात त्या मुलीने पूर्ण दैनिक वाचून काढले. पुढे अकोला येईपर्यंत आमची तिच्याशी चांगली ओळख झाली. नवरात्रोत्सव झाल्यावर ती गोव्याला परत जाणार होती. गोव्याला गेल्यावर ‘तेथील साधकांना भेटून मी खरी साधना जाणून घेणार आहे’, असे तिने आम्हाला सांगितले.
पू. वामन यांच्या केवळ छायाचित्रामुळे ‘साधना करण्यास इच्छुक असलेला जीव कसा पटकन आकृष्ट झाला आणि सनातनच्या संतांच्या चैतन्यामुळे लोक कसे जोडले जातात’, याची मला अनुभूती आली.’
– श्री. श्यामसुंदर राजंदेकर, अकोला (१२.९.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |