कर्णावती (गुजरात) येथील ‘कार्निव्हल’मध्ये ‘सांताक्लॉज’ बनून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत धर्मांतराचा प्रयत्न

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर वाद आणि हाणामारी !

(‘कार्निव्हल’ म्हणजे रस्त्यावर नाच-गाणी करत उत्सव साजरा करण्याचा पाश्‍चात्त्य प्रकार)

‘कार्निव्हल’मध्ये ‘सांताक्लॉज’ बनून ख्रिस्ती धर्माचा प्रसार

कर्णावती (गुजरात) – येथील ‘काँगरिया कार्निव्हल’मध्ये ‘सांतक्लॉज’ बनून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना हिंदु संघटनांनी विरोध केला. या वेळी वाद होऊन हाणामारीही झाली. त्यानंतर सांताक्लॉज बनलेल्या व्यक्तीने ‘जय श्री राम’ आणि ‘हर-हर महादेव’ अशा घोषणा दिल्या. ही घटना ३० डिसेंबर या दिवशी घडली. या कार्निव्हलमध्ये एकूण १२ लाख लोक सहभागी झाले होते.

१. काही लोकांनी  हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांना ‘सांतक्लॉज बनलेले काही लोक ख्रिस्ती मिशनरींची पुस्तके वाटत होते’, अशी माहिती दिली. यावर हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर सांताक्लॉज हिंदूंना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप केला. यामुळे सांताक्लॉज आणि हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. या घटनेचा एक व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. हे कार्यकर्ते बजरंग दलाचे असल्याचे सांगितले जात आहे.

२. विश्‍व हिंदु परिषदेचे प्रवक्ते हितेंद्रसिंह राजपूत यांनी सांगितले की, गेल्या ४ दिवसांपासून कार्निव्हलमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारी पुस्तके विकली जात होती. सांताक्लॉज बनलेले लोक हिंदूंना धर्मांतरासाठी प्रोत्साहित करत होते. हे लक्षात आल्यावर त्यांना विरोध करण्यात आला.

संपादकीय भूमिका

  • बहुसंख्य हिंदूंच्या देशात उघडपणे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होतो आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • केंद्र सरकार धर्मांतरविरोधी कायदा कधी करणार ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात सतत उपस्थित होत आहे !