पंतप्रधानांचा मातृसेवेचा आदर्श !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे गुजरात येथे २ दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आणि अंत्यविधी यांच्या वेळी नरेंद्र मोदी अन् मोदी कुटुंबीय यांचा साधेपणा जगाने अनुभवला. हिराबेन यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी कुठलाही बडेजाव नव्हता, तसेच मोठे नेते, प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित नव्हत्या. हिराबेन यांचा मृतदेह महानगरपालिकेच्या शववाहिनीतून नेण्यात आला. कुठलाही मोठा पोलीस बंदोबस्त नव्हता, पुष्कळ हार-तुरे नव्हते किंवा सहस्रो लोक नव्हते. अत्यंत साधेपणाने नरेंद्र मोदी आईच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. आईच्या पार्थिवाला खांदा दिला, नंतर अग्नी दिला आणि पुढच्या काही घंट्यांतच मोदी यांनी कोलकाता येथील मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. नरेंद्र मोदी आज जगातील शक्तीशाली आणि प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व यांपैकी एक आहेत, तसेच भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांनी ठरवले असते, तर आईच्या निधनानंतर ते अनेक मोठ्या सुविधा घेऊन तिच्या पार्थिवाला अग्नी देण्यापर्यंतचा प्रवास करू शकले असते; मात्र त्यांनी तसे केले नाही. नरेंद्र मोदी यांनी स्वत:चा उल्लेख ‘प्रधानसेवक’ म्हणून केला आहे. त्याप्रमाणे त्यांनी केवळ सार्वजनिक आयुष्यातच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यातही साधेपणाने जगत असल्याचे दाखवून दिले.

आईचे आशीर्वाद घेणे 

नरेंद्र मोदी यांचा गत २० वर्षांचा प्रवास हा ‘गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान’ असा झाला आहे. या प्रवासाच्या काळात मोदी यांचे सामथ्र्य सर्वच दृष्ट्या वाढतच गेले आहे. अशा वेळी मोदी त्यांच्या कुटुंबियांचा विचार करून त्यांच्यासाठी सुखसुविधा उपलब्ध करू शकले असते; मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यांची आई त्यांच्या भावाच्या साध्या आणि छोट्या घरात रहात होती. त्यांचे भाऊही छोटे-मोठे व्यवसाय करतात, तेही त्याच स्थितीत अजूनही आहेत. नरेंद्र मोदी गुजरातला जेव्हा जायचे, तेव्हा गांधीनगरला जाऊन आईला भेटून तिचे आशीर्वाद घ्यायचे. तिच्यासमवेत काही क्षण घालवत असत. नरेंद्र मोदी प्रथम मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून निवडून आल्यावर हा भाग भारतीय जनतेने वेळोवेळी अनुभवला. त्यांनी आईची पाद्यपूजा करून ते तीर्थ म्हणून स्वतःच्या डोळ्यांना लावले. मोदी यांनी त्यांच्या कुटुंबियांना देहलीतील त्यांच्या बडेजाव असणार्‍या निवासापासून दूर ठेवले होते. एकदाच त्यांनी आईला पंतप्रधान निवास दाखवण्यासाठी नेले होते. तेथे तिला चाकाच्या आसंदीवर बसवून आणि ती स्वतः ढकलून निवासस्थान अन् परिसर फिरवून आणला.

पंतप्रधान मोदी आणि त्यांची भावंडे यांचे बालपण अन् तारुण्य गरिबीत गेले. ‘मातीच्या आणि खिडकी नसलेल्या एका छोट्याशा खोलीत आईने ६ भावंडांना लोकांची धुणी-भांडी करून, तसेच सूत कातून कसे वाढवले ? आईने लहानपणी प्रामाणिकपणाचे आणि लोकांना साहाय्य करण्याचे संस्कार कसे केले ?’, याचा मोदी आवर्जून उल्लेख करतात. ‘त्या स्थितीत आईने भावंडांना कसलीच उणीव जाणवू दिली नाही’, असे मोदी सांगतात.

आईच्या निधनाविषयी केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदी लिहितात, ‘एका तेजस्वी शताब्दीचा ईश्वराच्या चरणी विराम ! आईमध्ये मी त्या त्रिमूर्तीची अनुभूती घेतली आहे. ज्यामध्ये एका तपस्विनीची यात्रा, निष्काम कर्मयोगाचे प्रतीक आणि मूल्यांप्रती कटीबद्ध जीवन हे सामावलेले आहे. मी त्यांना त्यांच्या १०० व्या वाढदिवशी भेटलो, तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितले, ‘काम करावे बुद्धीने आणि जीवन जगावे शुद्धीने !’’

कृतघ्न पिढी

सध्याचा काळ पाहिला, तर मुले मोठी होतात, उच्चशिक्षण घेतात, काही देशात आणि काही परदेशात नोकरीला जातात. ते कमावते झाले, पद आणि मान मिळू लागला की, त्यांना आई-वडिलांचा विसर पडतो. मुले-नातवंडे हयात असूनही त्यांना अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम यांचा आधार घ्यावा लागतो. सध्याच्या पिढीत तर आई-वडिलांचा उल्लेख ‘घरातील वृद्ध म्हणजे ‘डस्टबिन’, असा विशेषत: लग्न ठरवतांना किंवा बोलतांना केला जातो. त्यांना घरात वृद्ध व्यक्ती नकोशा वाटतात. आई-वडिलांनी वाढवतांना केलेले कष्ट, केलेली पदरमोड यांचा मुलांना विसर पडून त्यांच्या वर्तनात कृतघ्नताच दिसते. काहींना केवळ आई-वडिलांशी त्यांची संपत्ती मिळवण्यापुरताच संबंध ठेवायचा असतो. या पाश्र्वभूमीवर देशातील सर्वाेच्च पदावर असलेल्या आणि जगात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, अशी व्यक्ती आईच्या संदर्भात कशा प्रकारे कृतीतून कृतज्ञता, आत्मीयता आणि प्रेम व्यक्त करत वागते, हे सर्व आदर्शच आहे. मोदी यांच्या कुठल्याही मोठ्या स्वागत समारंभांना हिराबेन उपस्थित नव्हत्या. एका समारंभाला मोदी यांनी त्यांना बोलावल्यावर ‘देवामुळे तुला हे मिळाले आहे. माझे काय कर्तृत्व त्यात ?’, असे सांगून त्या आल्या नाहीत. त्यांनी नरेंद्र मोदी यांचे भावंडांमधील वेगळेपण जाणून त्यांच्या कार्याला कधीच विरोध केला नाही. राष्ट्रकार्यासाठी नरेंद्र मोदी यांना घर सोडून जाण्याच्या क्षणीही त्यांनी खंबीरपणा दाखवला आणि त्यांना जाऊ दिले. लोक जेव्हा मोदी यांच्याविषयी अभिमानाने सांगून हिराबेन यांना विचारत, तेव्हा त्या म्हणत, ‘‘मी निमित्तमात्र आहे. तो देवाचा आहे.’’ यामुळेच नरेंद्र मोदी यांनी आईला ‘तपस्विनी’ची उपमा दिलेली आहे. असे विचार तपस्विनीविना अन्य कुणाच्या मनात कधी येतील का ? यातून त्या आध्यात्मिक स्तरावर जगत होत्या आणि मोदी यांनाही त्याच दृष्टीने पहात होत्या, हे लक्षात येते. पंतप्रधान मोदी यांनी काही अशा योजना कार्यवाहीत आणल्या की, ज्यांचा लाभ घेण्यासाठी ज्या मुलांनी त्यांच्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवले होते, त्यांना पुन्हा घरी आणून त्यांची सेवा करावी लागली. आपण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाहवा करतो, त्यांचे कौतुक करतो, तेव्हा त्यांनी ठेवलेला मातृसेवेचा आदर्श अंगीकारला, तर आपण त्यांच्याकडून शिकलो, असे होईल !

देशाच्या सर्वाेच्च पदावर असूनही कृतज्ञताभावाने मातृसेवा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुण पिढीसाठी आदर्शच !