स्वतः आदर्श वागून साधकांपुढे आदर्श ठेवणारे आणि योग्य कृती, विचार अन् दृष्टीकोन यांतून साधकांना साधनेविषयी दिशा देणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ
सौ. श्रेया प्रभु

१. प्रत्येक भेटीत उलगडत गेलेली सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची गुणवैशिष्ट्ये !

१ अ. नीलेशदादांना पहिल्यांदा पाहिल्यावर ‘ते अगदी शांत आणि स्थिर साधक आहेत’, असा विचार मनात येणे : ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना मी वर्ष २००२ मध्ये गोवा येथे एका फेरीला संबोधित करतांना सर्वप्रथम पाहिले. माझी आणि त्यांची ओळख नसतांनाही त्यांना पाहून ‘हे वेगळेच अन् अगदी शांत आणि स्थिर साधक आहेत’, असा विचार माझ्या मनात आला.

१ आ. उज्जैन येथे कुंभमेळ्याच्या सेवेला गेल्यावर सद्गुरु नीलेशदादांचा सत्संग लाभणे आणि त्यांच्यातील ‘मनमोकळेपणा’ अन् ‘प्रेमभाव’ या गुणांचे दर्शन होऊन सेवा आणि साधना यांचे योग्य दृष्टीकोन निर्माण होऊ लागणे : त्यानंतर वर्ष २००४ मध्ये मला उज्जैन येथे कुंभमेळ्याच्या सेवेला जाण्याची संधी मिळाली. सद्गुरु नीलेशदादांकडून मला ‘आज्ञापालन, तत्त्वनिष्ठता, अनुशासन, परिपूर्ण सेवा कशी करायला हवी ?’, असे अनेक गुण शिकायला मिळाले. पूर्वी मला अनुशासनात रहायला आवडायचे नाही. ‘अनुशासन म्हणजे रुक्ष आणि गंभीर रहाणे अन् तसे वागणे’, असा माझा अपसमज होता; पण सद्गुरु नीलेशदादा यांच्यामधील अनुशासन पाहिल्यावर माझा हा अपसमज दूर झाला. ‘ईश्वरप्राप्तीसाठी स्वतःशी प्रामाणिक आणि कठोर राहून स्वतःमध्ये अपेक्षित असे पालट घडवण्यासाठी प्रयत्न करणे’, म्हणजे अनुशासन’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले आणि त्यांच्याविषयी माझ्या मनात पुष्कळ आदरभाव निर्माण झाला.

उज्जैन येथे असतांना दिवसभरातील सेवेचे चांगले-वाईट अनुभव मी त्यांना आनंदाने सांगत असे आणि तेही तेवढ्याच उत्साहाने ऐकत असत. त्या वेळी मला त्यांच्यातील ‘मनमोकळेपणा’ आणि ‘प्रेमभाव’ या गुणांचे दर्शन झाले. सद्गुरु दादांमुळे ‘सेवा चांगली आणि परिपूर्ण करायला हवी’, हा संस्कार माझ्यावर होण्यास आरंभ झाला.

१ इ. सद्गुरु नीलेशदादांमुळे आश्रम जीवनाची गोडी निर्माण होणे : जानेवारी २००५ मध्ये मी वाराणसी आश्रमात सेवेसाठी गेले. त्या वेळी सद्गुरु नीलेशदादा तेथे सेवा करत होते. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. आरंभी मला आश्रमजीवनाचा कोणताच अनुभव नव्हता. सद्गुरु दादा मला साधनेविषयी मार्गदर्शन करायचे. त्यांच्यामुळे माझ्यात आश्रम जीवनाविषयी गोडी निर्माण झाली.

२. वाराणसी आश्रमात सद्गुरु नीलेशदादांच्या आदर्श कृतींचे झालेले दर्शन !

२ अ. आश्रमाप्रती भाव असल्याने कोणत्याही सेवा सहजतेने आणि भावपूर्ण रितीने करणे : आश्रमात रहातांना सद्गुरु नीलेशदादांनी आमच्या मनावर संस्कार केला की, ‘आश्रम म्हणजे आश्रमातील केवळ ४ भिंती नव्हेत, तर आश्रम म्हणजे आश्रमात रहाणारे साधक आणि आश्रमातील प्रत्येक वस्तू !’ सद्गुरु दादांनी हे स्वतःच्या आचरणातून आम्हाला शिकवले. आरंभी आश्रमात साधक संख्या अगदी अल्प असायची. त्या वेळी कोणतीही सेवा ते अगदी सहजतेने आणि भावपूर्ण रितीने करत असत. कोणतीही सेवा करतांना त्यांच्यामध्ये कर्तेपणाचा लवलेश असलेला मी कधी पाहिला नाही.

२ आ. प्रत्येक सेवा एकाग्रतेने आणि गंभीरतेने करणे : सद्गुरु दादा प्रत्येक सेवा एकाग्रतेने आणि गंभीरतेने करतात. त्या सेवेशी त्यांची पूर्ण एकरूपता असते. कोणत्याही साधकाशी बोलतांना ते साधकांचे बोलणे मन लावून ऐकतात. त्यामुळे त्या साधकाला त्यांचा आधार आणि त्यांच्याविषयी प्रेम वाटते.

२ इ. प्रत्येक कृती आदर्श असणे : सद्गुरु दादांची प्रत्येक कृती, प्रत्येक सेवा व्यवस्थित आणि आदर्शच असते. त्यांनी ठेवलेले साहित्य व्यवस्थित आणि जागच्या जागी असते. ते बाहेरगावी असतांना ‘कपाटाच्या नेमक्या कुठल्या खणात कितव्या क्रमाकांची धारिका (फाईल) आहे’, हे आम्हाला ते अचूक आणि नेमकेपणाने सांगतात.

२ ई. मितभाषी आणि आदर्श वागणे : मला सद्गुरु दादांच्या सान्निध्यात राहून साधना करण्याची संधी मिळाली आहे. त्यांना मी आतापर्यंत एकदाही अनावश्यक बोलतांना किंवा वेळ वाया घालवतांना पाहिले नाही. त्यांचे वागणे-बोलणे साधनेच्या अनुषंगाने आणि संयमी असते.

प्रार्थना

सद्गुरु नीलेशदादा म्हणजे सर्व प्रकारच्या आदर्शांचे मूर्तीमंत रूप असल्याने त्यांच्या गुणांचे वर्णन करू, तेवढे अल्प आहे. हे परम पूज्य गुरुदेव, ‘सद्गुरु दादांचे गुण पूर्णपणे शिकून मला आत्मसात करता येऊ देत आणि तशी कृती माझ्याकडून होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे !’

– सौ. श्रेया प्रभु (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४६ वर्षे), वाराणसी आश्रम, वाराणसी. (जुलै २०२२)