अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासाची इमारत विकत घेण्याच्या शर्यतीत इस्रायल आणि भारत आघाडीवर !

इस्लामाबाद – अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील पाकिस्तानी दूतावासाची इमारत विकत घेण्याच्या शर्यतीत इस्रायल आणि भारत येथील गट आघाडीवर आहेत. पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘द डॉन’च्या वृत्तानुसार या इमारतीसाठी सर्वाधिक बोली एका इस्रायली गटाने लावली असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे पाकिस्तानचा ‘रिअल इस्टेट’ समूह तिसर्‍या क्रमांकावर आहे.

१. इस्रायलच्या समूहाने पाकिस्तानी दूतावासासाठी ५४ कोटी ४० लाख रुपयांची बोली लावली आहे, तर भारताच्या गटाने ४० कोटी रुपयांची बोली लावली आहे. ३२ कोटी रुपयांची बोली लावणारा पाकिस्तानी गट तिसर्‍या क्रमांकावर आहे. या इमारतीत एकेकाळी अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे कार्यालय होते.

२. या इमारतीचा राजनैतिक स्थायी दर्जा वर्ष २०१८ मध्ये संपुष्टात आला. आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानने हा दूतावास विकण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

३. दूतावासाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, ही इमारत वॉशिंग्टनच्या प्रतिष्ठित परिसरात आहे. पाकिस्तानच्या शाहबाज सरकारच्या मंत्रीमंडळाने या इमारतीच्या विक्रीला संमती दिली आहे. पाकिस्तानवर सध्या ६० लाख कोटी रुपयांचे कर्ज असून हा नवा विक्रम समजला जात आहे.