शबरी घरकूल योजनेअंतर्गत अर्ज करणार्‍या सर्वांना घरे देऊ ! – डॉ. विजयकुमार गावित, आदिवासी विकासमंत्री

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – चालू वर्षात शबरी घरकुल योजनेच्या अंतर्गत ८५ सहस्र घरकुले संमत करण्यात आली आहेत. यासाठी अधिकाधिक अर्ज स्वीकारण्याची सूचना प्रकल्प अधिकार्‍यांना देण्यात आली आहे. या योजनेत अर्ज करणार्‍या सर्वांना घरे देण्यात येतील, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत दिले. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या स्थलांतराच्या समस्येविषयी आमदार राजेश पाडवी यांनी सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर मंत्री महोदयांनी वरील आश्वासन दिले.

या वेळी डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, ‘‘आदिवासी भागांत अनेक ठिकाणी जलसिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे स्थलांतर होते. हे रोखण्यासाठी आदिवासी भागात जलसिंचन योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना अवजारे आणि शेळ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नाबार्डच्या माध्यमातून आदिवासी भागातील गावांचा विकास केला जाणार आहे. बिर्सा मुंडा कृषी योजनाही राबवण्यात येत आहे.’’