परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पद्यमय चरित्र

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे चरित्र विविध ग्रंथांतून सनातन संस्थेने प्रकाशित केले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एका भावसत्संगात त्यांनी मला काव्याद्वारे साधना करण्याचा आशीर्वाद दिला होता. तेव्हापासून काही कवितांचे लेखन मी करत आहे. परात्पर गुरुदेवांच्या आशीर्वादानुसार संत, गुरु, देवता आणि साधक यांच्यावर कविता लिहिण्याची स्फूर्ती होते. यासमवेतच ‘परात्पर गुरुदेवांच्या जीवनावर आधारित पद्यरचना मी करावी’, अशी इच्छा माझ्या मातेने प्रकट केली. बरेच दिवस मला त्यासंदर्भात काही सुचत नव्हते. ‘कुठल्या विषयाने आरंभ करावा ?’, हेही लक्षात येत नव्हते. १२.११.२०२२ या दिवशी मी विश्रांती घेत असतांना मला परात्पर गुरुदेवांच्याच कृपेने त्यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यावर काही कडवी सुचली आणि नंतर ग्रंथनिर्मिती हे प्रकरण लिहून पूर्ण झाले. त्यानंतर एकेका विषयावर पद्यरचना सुचू लागल्या. ही चरित्र लेखनाविषयीची भूमिका गुरूंच्या चरणी अर्पण करत आहे आणि गुरुदेवांनीच त्यांचे चरित्रलेखन पूर्ण करून घेण्याची कृपा मज पामरावर करावी’, अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करत आहे.’ – श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.११.२०२२)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ग्रंथनिर्मिती

सत्ययुगी अवतरले वेद ।
अपौरुषेय वदती त्यांस ।
वेदवाक्ये ती प्रमाण मानूनी ।
साधनारत असती सर्व ।। १ ।।

श्री. धैवत वाघमारे

स्मृती होत्या धर्मपालनार्थ ।
ऋषिमुनी सांगती त्यातूनी ।
कैसी चालावी वाट ।
प्राप्त करण्या पुरुषार्थ चारी ।। २ ।।

काळ पालटे सत्वर ।
अवतरे त्रेतायुग ।
धर्माचा पाद होय खंडित ।
पीडिले जन त्याकारणे ।। ३ ।।

दावावया वाट तयांसी ।
वाल्मीकि गाती रामायण ।
रामावतारे प्रजाजन असती साधनारत ।
जाती ते मोक्षास श्रीरामासंगे ।। ४ ।।

काळाची महती फार ।
अवतरे द्वापर ।
दूजा पाद तो धर्माचा होई खंडित ।
शील स्त्रीचे घेण्या जिवावर उठे मनुष्य ।। ५ ।।

तेणे लागून घडले महाभारत ।
रचिले ज्यास वेदव्यासे ।
व्यासोच्छिष्टं जगत् सर्वं ।
झाली वदंता जनी ।। ६ ।।

ऐसे ग्रंथकार्य तेणें केले ।
महाभारत अन् वेदविभाजन ।
अष्टादश पुराणांतूनी ।
सांगती इतिहास संस्कृतीचा ।। ७ ।।

कलियुग येताच ।
खंडित होई तिसरा पाद धर्माचा ।
कलियुगी होती भ्रष्ट जन ।
वाट तयां दाविण्या व्यासे
रचिले श्रीमद्भागवत ।। ८ ।।

तरी काळ तो आला कठीण ।
सर्व विसरती बोध व्यासांचे ।
ऐसे समयीं चाणक्य येती ।
नीती अन् अर्थशास्त्र सांगती ।। ९ ।।

शंकराचार्य ते अवतरले नंतर ।
केले विपुल ग्रंथलेखन ।
जना वाट दाविण्या ।
बसविली घडी वर्णाश्रमधर्माची ।। १० ।।

हेही न पुरे जनांसी म्हणूनी ।
संत ते अवतरले भूवरी ।
वाङ्मय तेणें रचिले ।
करण्या कृपा जनांवरी ।। ११ ।।

कलियुगातील कलियुगी ।
जने सोडिले धर्मग्रंथांस ।
प्रकोप तो होई अधर्माचरणाचा ।
दुर्धर झाले जीवन साधकांचे ।। १२ ।।

स्त्रियाही न बाळगती शील ।
करिती सर्व उद्घोष स्वातंत्र्याचा ।
नैतिकताही लोपली सर्वत्र ।
स्वातंत्र्य अतिरेके ।। १३ ।।

ऐशा दारूण समयीं ।
अवतार घेई महाविष्णु ।
सुखी करण्या जीवन व्यष्टी आणि समष्टीचे ।
प्रकटे लेखणी जयंतावताररूपी ।। १४ ।।

अध्यात्म शिकता संतांकडे ।
लिहिला ग्रंथ अध्यात्मशास्त्र ।
जो असे साररूपी ।
विशद केले ज्यात सर्व साधनामार्गांस ।। १५ ।।

केली प्रार्थना गुरूंसी ।
प्रत्येक प्रकरणावरी ।
विवेचनरूपी ग्रंथ निराळा ।
लिहूनी पुष्ट करण्या
अध्यात्मपाया साधकांचा ।। १६ ।।

ग्रंथ पाहोनी दिधला आशीर्वाद ।
सद्गुरु भक्तराजांनी ।
लाभला मज गुरूंचा आशीर्वाद ।
तोची देतो तुम्हां ग्रंथलेखनाकरिता ।। १७ ।।

सद्गुरूंचा आशीर्वाद लाभला ।
प्रवाहित होई ज्ञानगंगा ।
विवेचन केले अध्यात्मावरी ।
संगे राष्ट्र-धर्मही सांगती ग्रंथांतूनी ।। १८ ।।

कलियुगातील वेद जे ।
देती ज्ञानप्रकाश साधकां ।
अध्यात्म असे विज्ञान खरे ।
सांगती वैज्ञानिक भाषेतूनी ।। १९।।

धर्म राष्ट्र संस्कृती आचार-विचार साधना ।
व्यापिली जीवनाची सर्व अंगे ।
रहातील पाया जीवनाचा ।
कलियुगातील सत्ययुगाचा ।। २० ।।

महदाधार तयांचा साधकजना ।
दाविती वाट मोक्षपदाची ।
म्हणती कलियुगी एकची पुरुषार्थ श्रेष्ठ ।
चालण्या वाट मोक्षाची
लिहिले ग्रंथभांडार ।। २१ ।।

सतरा भाषांतूनी ।
पंचसहस्रग्रंथ लिहिण्याचा मानस तयांचा ।
जो ज्ञानयज्ञ आरंभिला येथ ।
नसे पार त्यास ।। २२ ।।

ऐशा ज्ञानसूर्यास ।
दंडवत एकसहस्र आठ ।
थोर उपकार तयांचे ।
साधक नि जन यांवरी ।। २३ ।।

कृतज्ञता राहो तया चरणी ।
करोनिया आचरण ।
तद् इच्छेपरी ।
त्यानेच लाभेल शांती जीवनी ।। २४ ।।

प्रकरण ते ग्रंथनिर्मिती झाले येथ पूर्ण ।
करोनिया कृतज्ञता व्यक्त ।
देवता गुरु अन् साधकांच्या चरणी ।
मी पामर घेतो विश्राम येथ ।। २५ ।।

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक