देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला असतांना श्री. प्रकाश राऊत यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती

‘मी १.१२.२०१८ या दिवशी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर मे २०१९ पासून मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहायला आलो. आश्रमात वास्तव्यास असतांना मला स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

श्री. प्रकाश राऊत

१. स्वतःमध्ये जाणवलेले पालट

१ अ. स्वभावदोषांवर मात करता येऊन आनंदाने आश्रमात रहाता येणे : मी आश्रमात रहायला जाण्याच्या वेळी पत्नी मला म्हणाली, ‘‘आश्रमात शारीरिक कष्टाच्या सेवा असतात. तुम्हाला ते जमणार नाही.’’ मी ‘जमेल ती सेवा करायची आणि कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणायचे नाही’, असा पूर्ण सकारात्मक विचार करून आश्रमात रहायला आलो. त्यामुळे ‘मला आश्रमजीवन जमणार नाही किंवा आता घरी जायला हवे’, असे विचार मनात कधी आले नाहीत. आश्रमात असतांना माझ्यातील ‘प्रतिमा जपणे आणि ‘अपेक्षा करणे’ या स्वभावदोषांमुळे आरंभी मला सर्व साधकांमध्ये मिसळणे अन् साधकांशी बोलणे जमत नसे. त्यानंतर हळूहळू माझे सर्व साधकांशी बोलण्याचे प्रयत्न होऊ लागले. मी आनंदाने आश्रमात रहात होतो. ‘वैयक्तिक आवरणे, प्रसाद-महाप्रसाद यांच्या वेळा पाळणे आणि सेवा, यांत सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत वेळ कसा जायचा ?’, हे माझ्या लक्षातही यायचे नाही.

१ आ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी घेतलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे ‘आश्रमजीवन जगत असतांना लहान लहान कृतीतून साधनेचे गुण कसे मिळवायचे ?’, हे लक्षात येणे : काही दिवसांनी मला सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेल्या साधकांच्या व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगात बसण्याची संधी मिळाली. ‘ते सांगत असलेल्या सूत्रांतून साधकांची प्रज्ञा जागृत होते आणि साधनेचे प्रयत्न करण्यासाठी बळ मिळते’, असे मला वाटते. सद्गुरु दादा ‘आश्रमजीवन जगत असतांना साधकांनी साधनेचे गुण कसे मिळवायचे ?’, याविषयी विवेचन करायचे. त्यांनी साधकांना ‘लहान लहान कृतीतून साधनेचे गुण कसे मिळवायचे ?’, हे शिकवले. त्यामुळे साधक ‘स्वतःची साधना वाया जाणार नाही’, याकडे कटाक्षाने लक्ष देत असत. मला वयस्कर साधकांना लहान लहान गोष्टींत साहाय्य करणे, अनावश्यक चालू असलेला विजेचा दिवा बंद करणे, साधकांच्या अयोग्य वर्तनाविषयी त्यांना जाणीव करून देणे, यांसारख्या गोष्टी सहजतेने जमू लागल्या.

१ इ. काही मासांतच माझ्या तोंडवळ्यामध्ये सकारात्मक पालट झाला, तसेच ‘मला सूक्ष्म स्तरावर किती लाभ झाला ?’, हे सांगणे कठीण आहे.

२. अनुभूती

२ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘‘आज थकलेले दिसता, शारीरिक श्रम केलेत का ?’, असे विचारल्यावर भाव जागृत होऊन थकवा नाहीसा होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे : अनेक वेळा सद्गुरु दादा साधक सेवा करत असलेल्या ठिकाणी सहज जायचे. साधकांना त्यांच्यातील भावाप्रमाणे सद्गुरु दादांमधील चैतन्याचा लाभ होत असे आणि सेवा करण्यासाठी उत्साह येत असे. एकदा मी आणि एक साधक बाहेरून आलेले साहित्य आश्रमात आणत होतो. ते उन्हाळ्याचे दिवस होते. मला शारीरिक श्रम करायची सवय नसल्यामुळे थोडेसे थकायला झाले होते. एवढ्यात दुपारी महाप्रसादाची वेळ झाली. मी महाप्रसाद घेण्यासाठी भोजनकक्षात आलो असतांना सद्गुरु दादा आले आणि मला म्हणाले ‘‘आज थकलेले दिसता. शारीरिक श्रम केलेत का ?’’ सद्गुरु दादांचे बोलणे ऐकून माझा भाव जागृत झाला आणि माझा थकवा नाहीसा झाला. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले संतांच्या माध्यमातून साधकांची किती काळजी घेतात !’, असे वाटून माझी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. आश्रमातील सर्व संत माझी मायेने आणि आपुलकीने विचारपूस करायचे. ते माझी साधना आणि कुटुंबीय, यांविषयी विचारपूस करायचे.

२ आ. आमचे घर जे अनेक मास विक्री होत नव्हते, ते विकले गेले.

२ इ. माझ्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे वेळापत्रक जुळून आले अन् त्यामध्ये नियमितता आली. माझ्या मनात ‘आश्रमजीवन हे माझ्यासाठी योग्यच आहे’, असा विचार येऊ लागला.

विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मला आश्रमात राहून सेवा करता आली आणि शिकण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी कोटीश: कृतज्ञ आहे. ‘हे गुरुमाऊली, मला साधनेच्या पथावर सतत पुढे घेऊन चला’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’

– श्री. प्रकाश राऊत, फोंडा, गोवा. (१४.३.२०२२)

पू. (सौ.) अश्विनी पवार आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या सहवासातून चैतन्य मिळणे

पू. (सौ.) अश्विनी पवार

आश्रमात असतांना मला संतांच्या सहवासात सेवा करायला मिळत असे. मला त्यांच्यातील चैतन्याचा लाभ होत असे. ‘साधकांच्या चुका अल्प व्हाव्यात, तसेच त्यांना सेवेतून आनंद मिळावा आणि साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी पू. (सौ.) अश्विनी पवार अहोरात्र सेवारत असायच्या. त्यांची प्रकृती बरी नसली, तरीही त्या साधकांना चुका सांगून त्यातून बाहेर येण्यासाठी सतत प्रयत्न करत असत. सद्गुरु राजेंद्र शिंदे आश्रमातील सर्व साधकांसाठी चैतन्याचा खजिनाच आहेत. साधकांना आवश्यकता असतांना ते त्वरित साधकांच्या साहाय्याला येतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक