राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नवीन ७०० बसगाड्या घेण्याची प्रक्रिया चालू ! – शंभूराज देसाई, मंत्री

विधान परिषद प्रश्नोत्तरे…

मंत्री शंभूराज देसाई

नागपूर, २८ डिसेंबर (वार्ता.) – राज्य परिवहन महामंडळाच्या वाहन ताफ्यात नवीन ७०० बसेस घेण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये २ सहस्र नवीन बसगाड्या खरेदीची निविदा प्रकिया चालू झाली आहे. यासाठी ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वर्ष २०१६ पासून भाडेतत्त्वावरील ५५६ शिवशाही बसगाड्या समाविष्ट झाल्या आहेत. महामंडळात नवीन १५० इलेक्ट्रिक बसगाड्या आणि ५०० साध्या बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी २८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नात दिली. सदस्य राजेश राठोड यांनी हा प्रश्न विचारला होता.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, एस्. टी. महामंडळात स्वमालकीची २ सहस्र ६१७ बसगाड्या आहेत. कोरोनानंतर सध्या एस्.टी. महामंडळ पूर्वपदावर येत आहे. शासन ४०० डिझेल, तर ५० सी.एन्.जी., तर २०० निमआराम बसगाड्या घेणार आहे. इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेणार आहे. सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतांना ते म्हणाले की, ग्रामीण भागांतील महाविद्यालय आणि शाळा येथील विद्यार्थ्यांना वेळेत बसगाड्या मिळण्यासाठी बसफेर्‍या चालू करण्याची आणि त्यांना पास देण्याची सूचना सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात येईल. राज्यात १७० ठिकाणी चार्जिंग स्थानके उभे करण्यात येतील.