(म्हणे) ‘मी भारताच्या विरोधात नाही !’  

नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांचे प्रतिपादन !

नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’

काठमांडू (नेपाळ) – मी भारताच्या विरोधात नाही. मी जेव्हा पंतप्रधान म्हणून निवडलो आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थानातून बाहेर पडलो, तेव्हा सर्वप्रथम माझे  भारताच्या राजदूतांनी अभिनंदन केले. त्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून माझे अभिनंदन केले. ते पहिले पंतप्रधान होते ज्यांनी माझे अभिनंदन केले, असे वक्तव्य नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

पंतप्रधान प्रचंड पुढे म्हणाले की, शेवटच्या वेळी मी जेव्हा भारतात गेलो होतो, तेव्हा मी पंतप्रधान मोदी यांच्याशी अनेक सूत्रांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली पाहिजे. अशी अनेक सूत्रे आहेत, ज्यावर दोन्ही देशांनी एकत्र काम केले पाहिजे आणि याविषयावर भारताच्या नेत्यांशी आम्ही यापूर्वीच चर्चा केली आहे. मला वाटते की, दोन्ही देशांचे संबंध एका योग्य दिशेने पुढे गेले पाहिजेत.

संपादकीय भूमिका

  • पंतप्रधान प्रचंड हे साम्यवादी विचारसरणीचे आणि चीनच्या जवळचे आहेत. त्यामुळे भविष्यात चीनने भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी त्यांचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला, तर प्रचंड तसे करणार नाहीत, याची शाश्‍वती ते भारताला देऊ शकतील का ?
  • भारत समर्थक नेपाळी नेते देउबा यांच्या पक्षाशी युती करून नंतर त्यांचा विश्‍वासघात करून भारतविरोधी के.पी. ओली शर्मा यांच्याशी हातमिळवणी करून पंतप्रधान पदी बसलेले प्रचंड यांच्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?