काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्याकडून राहुल गांधी यांची श्रीरामाशी तुलना !

समस्त काँग्रेसजनांना ‘भरत’ संबोधले !

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद व काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची श्रीरामाशी तुलना केली, तर काँग्रेसजनांना ‘भरत’ असे संबोधले. ‘भारत जोडो’ यात्रेच्या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सलमान खुर्शीद यांनी हे वादग्रस्त विधान केले.

१. ते पुढे म्हणाले की, कडाक्याच्या थंडीमुळे सर्व गारठत आहेत. थंडीपासून रक्षण होण्यासाठी आपण जॅकट परिधान करत आहोत; मात्र राहुल गांधी अशा कडाक्याच्या थंडीतही केवळ टी-शर्ट परिधान करून ‘भारत जोडो यात्रा’ करत आहेत. राहुल गांधी स्वतः योगी आहेत.

२. ते पुढे असेही म्हणाले की, प्रभु श्रीराम नेहमीच सर्व ठिकाणी पोचू शकत नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणी श्रीराम पोचू शकत नाहीत, तेथे भरत त्यांच्या पादुका घेऊन जातात. आपण ‘पादुका’ घेऊन उत्तरप्रदेशात पोचलो आहोत. आता प्रभु रामही तिथे पोचतील’, असा आमचा विश्‍वास आहे.

३. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे राहुल गांधी स्वत: नेतृत्व करत आहेत. ७ सप्टेंबर या दिवशी कन्याकुमारी येथून चालू  झालेली ही यात्रा आतापर्यंत तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र , मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांमधून गेली आहे. सुमारे आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर ही यात्रा उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब आणि शेवटी जम्मू-काश्मीरकडे जाईल.

संपादकीय भूमिका

  • सलमान खुर्शीद यांना राहुल गांधी यांचे उदात्तीकरण करण्यासाठी हिंदूंच्या देवतांचा आधार का घ्यावा लागतो ? ते राहुल गांधी यांची तुलना स्वतःच्या पंथातील श्रद्धास्थानांशी का करत नाहीत ? ‘तसे केले, तर काय होईल ?’, हे त्यांना पुरते ठाऊक असल्यामुळे ते असे करण्यास टाळतात !
  • ‘श्रीराम काल्पनिक आहे’, असे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र लिहून देणार्‍या काँग्रेसवाल्यांना श्रीरामाच्या नावाचा वापर करण्याचा काय अधिकार ?